Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2020 10:27 AM2020-04-20T10:27:23+5:302020-04-20T10:28:07+5:30

भारतीय संघाचा माजी सलामीवीर आणि भाजपाचा खासदार गौतम गंभीर यानंही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

Palghar Mob Lynching: Babita Phogat criticised Maharashtra government on Palghar Mob Lynching svg | Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

Palghar Mob Lynching: ठाकरे सरकार झोपा काढत आहे का?; बबिता फोगाटची टीका

googlenewsNext

पालघरमधील सामूहिक हत्याकांडाने राज्यात खळबळ माजली आहे. चोर समजून जमावाने तिघांची हत्या केल्याने राज्य सरकारबद्दल संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. प्रसारमाध्यमांवर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओत जमाव अत्यंत क्रुरपणे मारहाण करत असल्याचे पाहायला मिळत आहे. विरोधकांनीही राज्यात कायदा-सुव्यवस्था आहे की नाही? असा सवाल उपस्थित केला आहे. दंगल गर्ल बबिता फोगाटनंही या आखाड्यात उडी मारली आहे. तिनं महाराष्ट्र सरकारवर टीका केली आहे.

मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत; गौतम गंभीरकडून तीव्र शब्दात निषेध

''पालघर येथे घडलेल्या घटनेवर कारवाई करण्यात आली आहे. ज्या दिवशी गुन्हा घडला, त्याच दिवशी पोलिसांनी २ साधू, १ ड्रायव्हर आणि पोलिस कर्मचार्‍यांवर हल्ला करणाऱ्या सर्व आरोपींना अटक केली आहे. या गुन्ह्यातील आणि लज्जास्पद कृत्यातील आरोपींना शक्य तितकी कडक शिक्षा करण्यात येईल,'' अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.


''मानवी कातडी घालून प्राणी फिरत आहेत. त्यांच्याकडून अमानुष, जंगली आणि निंदनीय प्रकार घडला. त्यांनी तीन लोकांचा जीव घेतला आणि त्यांनी 70 वर्षांच्या म्हाताऱ्याची विनवणीपण ऐकली नाही. अशा लोकांची लाज वाटते,'' अशी संतप्त प्रतिक्रिया गंभीरनं दिली.  

तबलिगी जमातवर वादग्रस्त विधान करून चर्चेत असलेल्या कुस्तीपटू बबिता फोगाटनेही पालघरच्या घटनेवर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. तिनं म्हटले की,''पोलिसांदेखत महाराष्ट्रातील पालघर येथे तीन संतांची हत्या करण्यात आली. उद्धव ठाकरे सरकार झोपा काढत आहे का? लाज वाटली पाहीजे. सर्व दोषी कॅमेरात दिसत आहेत आणि त्यांच्यावर कठोर कारवाई झालीच पाहीजे.''

बबितानं 2014च्या राष्ट्रकुल स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आहे. त्याशिवाय 2010 आणि 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेत तिच्या नावावर रौप्यपदकं आहेत. 2012च्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिनं कांस्य, तर 2013च्या आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत कांस्यपदक पटकावले. 

पालघरमध्ये नेमकं काय घडलं?

डहाणू तालुक्यातील कासा पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोर आल्याच्या संशयाने ग्रामस्थांच्या जमावाने तिघांची हत्या केल्याची घटना गेल्या आठवड्यात गुरुवारी रात्री घडली. यावेळी समजूत घालण्यासाठी आलेल्या पोलिसांवर जमावाने हल्ला केला. या प्रकरणी कासा पोलिसांनी ११० जणांना अटक केली. हा हल्ला गावात चोर आल्याच्या अफवेमुळे झाल्याचे समजते.

हल्ल्यात सुशीलगिरी महाराज (३०), चिकने महाराज कल्पवृक्षगिरी (७०, रा. कांदिवली आश्रम) व चालक नीलेश तेलगडे (३०) या तिघांचा जागीच मृत्यू झाला. तालुक्यातील दिवशी या ग्रामपंचायतमधील गडचिंचले येथे हा प्रकार घडला. मुंबईतील कांदिवली येथून सुरतकडे कारने जाणाऱ्या तिघांना गुरुवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील गडचिंचले येथे चोर समजून २५० ते ३०० च्या जमावाने रोखले. जमावाने त्यांच्यावर कोयती, कुऱ्हाडी आणि दगडांच्या सहाय्याने हल्ला केला. येथील वनचौकीवर कार्यरत वनरक्षकाने याची माहिती पोलिसांना दिली. तिथे आलेल्या पोलिसांवरही जमावाने हल्ला केला. त्यात चार पोलीस जखमी झाले आहेत. पोलिसांच्या चार गाड्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

Web Title: Palghar Mob Lynching: Babita Phogat criticised Maharashtra government on Palghar Mob Lynching svg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.