mumbai Shri competition starting from today; Around two hundred stars will shine in the bodybuilding | 'मुंबई-श्री'चा धमाका आजपासून; शरीरसौष्ठवाच्या नभांगणात सुमारे अडीचशे तारे चमकणार

'मुंबई-श्री'चा धमाका आजपासून; शरीरसौष्ठवाच्या नभांगणात सुमारे अडीचशे तारे चमकणार

मुंबई - भारतातील सर्वात प्रतिष्ठेची आणि ग्लॅमरस स्पर्धा म्हणजेच स्पार्टन मुंबई श्री. जिल्हास्तरीय स्पर्धा असूनही एकाच मंचावर अडीचशेपेक्षा अधिक खेळाडू सहभागी होणारी एकमेव शरीरसौष्ठव स्पर्धा म्हणजे स्पार्टन मुंबई श्री. शरीरसौष्ठवातील ऑस्कर असलेल्या या स्पर्धेत एकंदर 12 गट खेळणार असून शरीरसौष्ठवाच्या नभांगणातील शेकडो तारे आपल्या पीळदार बाहूंनी क्रीडाप्रेमींवर मोहिनी घालण्यासाठी सज्ज झालेत. पामी शरीरसौष्ठवपटूंचा सहभाग अपेक्षित असल्यामुळे पावारी 28 फेब्रूवारीला सायंकाळी 4 वाजल्यापासूनच स्पर्धेची प्राथमिक फेरी सुरू होईल. गेली काही वर्षे स्पार्टन मुंबई श्री होण्याचे स्वप्न पाहणारे भास्कर कांबळी, सुशील मुरकर, उमेश गुप्ता, नीलेश दगडे, दिपक तांबीटकर, सुशांत रांजणकरसारखे फार्मात असलेले खेळाडू पुन्हा एकदा सज्ज झाले आहेत. पुरूषांच्या फिटनेस फिजीक प्रकारातही शंभरपेक्षा अधिक खेळाडूंच्या सहभागामुळे हा गटही जजेसचे कौशल्यपणाला लावणार हे निश्चित. प्राथमिक फेरीतून पात्र ठरणारे खेळाडू उद्या शनिवारी लोखंडवाला कॉम्पलेक्स येथील सेलिब्रेशन स्पोर्टस् क्लबच्या मंचावर उतरतील.

बृहन्मुंबई शरीरसौष्ठव संघटना आणि मुंबई उपनगर शरीरसौष्ठव व फिटनेस संघटनेने आर्थिक संकंटांवर मात करीत पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दर्जाला साजेशा स्पार्टन मुंबई श्री स्पर्धेच्या आयोजनाचे शिवधनुष्य पेलले आहे. खेळाडूंना श्रीमंत करणाऱया या स्पर्धेत तब्बल आठ लाखांची रोख बक्षीसे खेळाडूंना दिली जाणार आहेत. स्पार्टन न्यूट्रिशनच्या ऋषभ चोक्सी यांनी आपले शरीरसौष्ठव प्रेम दाखवत स्पर्धेला पुरस्कृत केले असून क्रीडाप्रेमी सुबोध मेनन, सिद्धेश रामदास कदम यांनीही आपले सहकार्य करून आपले कर्तव्य बजावले आहे. तसेच भारतीय आयुर्विमा महामंडळ, इएन न्यूट्रिशन, जीएनसी, हेल्थ बूस्टर यांनीही मदत केल्यामुळे स्पार्टन मुंबई श्रीला आपला सोहळा दिमाखदारपणे आयोजित करणे शक्य झाल्याचे संघटनेचे अध्यक्ष अजय खानविलकर यांनी सांगितले.

स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंमध्ये इतकी प्रचंड चुरस पाहायला मिळत आहे की यंदा स्पर्धेत सहभागी होणाऱ्या पीळदार खेळाडूंची संख्या आजवरची विक्रमी संख्या असेल. मुंबई श्री स्पर्धेत पदक जिंकणे जसे प्रत्येकाचे स्वप्न असते तसेच स्पर्धेत सहभागी होणेही प्रत्येकाची इच्छा असल्यामुळे प्राथमिक फेरीत मुख्य शरीरसौष्ठव स्पर्धेत दीडशेपेक्षा अधिक स्पर्धक उतरले तरी आश्चर्य वाटणार नाही. त्याचप्रमाणे फिजीक फिटनेसची वाढती क्रेझ पाहाता या प्रकाराच्या दोन गटातला खेळाडूंचा आकडा शंभरीच्या पलीकडे असेल, असा विश्वास संघटनेचे सरचिटणीस राजेश सावंत यांनी बोलून दाखविला. यंदा स्पार्टन मुंबई श्री मध्ये 55, 60, 65, 70, 75, 80, 85, 90 आणि 90 किलोवरील असे नऊ गट पुरूषांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत असतील तर महिलांसाठी शरीरसौष्ठवाचा एक खुला गट असेल. फिटनेस फिजीक प्रकारात पुरूषांचे दोन आणि महिलांचा एक गट खेळेल.

स्वप्नपूर्तीसाठी सारेच सज्ज

गतवर्षी सुशील मुरकरकडे संभाव्य विजेता म्हणून पाहिले जात होते. त्या दिशेने झेप घेताना त्याने पाच स्पर्धाही जिंकल्या होत्या, पण स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत त्याची गाठ अनपेक्षितपणे आलेल्या अनिल बिलावाशी पडली आणि सुशीलचे स्वप्न गटातच भंगले. गेल्यावेळच्या पराभवाचे दुख विसरून तो पुन्हा सज्ज झाला आहे. भीमकाय देहयष्टीचा नीलेश दगडेही स्पार्टन मुंबई श्री मान मिळविण्यासाठी गेले दोन महिने मेहनत करतोय. जे गेल्या चार वर्षात करू शकलो नाही, ते करून दाखविण्याचे ध्येय त्याच्यासमोर आहे. त्याचप्रमाणे सध्या सुपर फॉर्मात असलेला भास्कर कांबळीही सर्वस्व पणाला लावून मुंबई श्रीमध्ये उतरणार आहे. सध्या छोट्या चणीच्या उमेश गुप्तानेही सर्वांचे लक्ष वेधले आहे. गेल्या चार स्पर्धांमध्ये त्याची कामगिरी स्फूर्तीदायक असल्यामुळे या छोट्या बॉम्बकडूनही धमाका होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवोदित मुंबई श्रीचा मानकरी गणेश उपाध्याय, ज्यूनियर मुंबई श्री वैभव जाधव हेसुद्धा आपल्या गटात काहीही करण्याची क्षमता राखून आहेत. एवढेच नव्हे तर सुशांत रांजणकर, दिपक तांबीटकरसारखे खेळाडूही चांगल्या तयारीत असल्यामुळे स्पार्टन मुंबई श्रीचे वैभव कुणाला लाभणार, याकडे समस्त मुंबईकरांच लक्ष लागले आहे.

Web Title: mumbai Shri competition starting from today; Around two hundred stars will shine in the bodybuilding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.