तणावपूर्ण लढतीत मेरीकोमची झरीनवर मात

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2019 01:19 AM2019-12-29T01:19:49+5:302019-12-29T06:38:59+5:30

ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेसाठी भारतीय संघात पटकावले स्थान

Maricom defeats Zarin in a stressful fight | तणावपूर्ण लढतीत मेरीकोमची झरीनवर मात

तणावपूर्ण लढतीत मेरीकोमची झरीनवर मात

Next

नवी दिल्ली : सहावेळा जागतिक विजेती एम. सी. मेरीकोम आणि माजी कनिष्ठ विश्वविजेती निकहत झरीन यांच्यातील बहुचर्चित बॉक्सिंग लढत शनिवारी तणावपूर्ण वातावरणात पार पडली. त्यात मेरीकोमने निकहतवर ९-१ अशा गुणफरकाने सहज मात करीत ५१ किलो वजन गटात ऑलिम्पिक पात्रता स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करण्याचा मान मिळविला.

या लढतीत ३६ वर्षांच्या मेरीने दमदार ठोशांचा निकहतवर प्रहार करीत गुण संपादन केले. २३ वर्षांच्या झरीनने चाचणी घेण्याची मागणी करीत वाद निर्माण केल्यामुळे या लढतीच्या वेळी मोठा तणाव निर्माण झाला होता. लढतीच्या आधी रिंकबाहेरदेखील दोन्ही खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक झाली. लढतीचा निकाल झाला तेव्हादेखील निकहतचे राज्य असलेल्या तेलंगणा राज्य बॉक्सिंग संघटनेच्या काही प्रतिनिधींनी विरोध दर्शविला. बॉक्सिंग फेडरेशनचे अध्यक्ष अजयसिंग यांनी मध्यस्थी करीत परिस्थिती नियंत्रणात आणली. लढतीनंतर दोन्ही खेळाडूंनी हस्तांदोलनदेखील केले नाही. झरीनने गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला; पण मेरीकोमने मुद्दाम दुर्लक्ष केले. आॅलिम्पिक पात्रता फेरीचे आयोजन चीनमध्ये ३ ते १४ फेब्रुवारीदरम्यान होणार आहे.

अन्य लढतीत दोनवेळेची जागतिक रौप्यविजेती सोनिया लाठेर हिला ५७ किलो गटात साक्षी चौधरीने नमविले. ६० किलो गटात माजी विश्वविजेती एल. सरितादेवी ही राष्ट्रीय विजेती सिमरनजित कौर हिच्याकडून पराभूत झाली. सिमरनने सरितावर जोरदार प्रहार करीत तिला सावरण्यास वेळदेखील दिला नाही. जागतिक स्पर्धेत दोनदा कांस्य विजेती असलेली लवलिना बोरगोहेन हिने ६९ किलो गटात ललितावर मात केली. आशियाई स्पर्धेची माजी कांस्य विजेती पूजा राणी हिने नूपुरवर मात करीत ७५ किलो गटात खेळण्याचा मान मिळविला. (वृत्तसंस्था)

भारतीय संघ असा :
एम. सी. मेरीकाम (५१ किलो), साक्षी चौधरी (५७ किलो), सिमरनजित कौर (६० किलो), लवलीना बोरगोहेन (६९ किलो) आणि पूजा राणी (७५ किलो).

चाचणी निष्पक्ष झाली
लढत निष्पक्ष पार पडली. निकहतचे चाहते थोडे निराश झाले. मी मात्र सामना निर्विघ्नपणे पार पडल्याबद्दल आनंदी आहे. कुणीही पूर्वग्रहदूषित असू नये. चाचणीच्या वेळी प्रत्येकाने जे पाहिले तोच निकाल पुढे आला. जे जिंकले ते सर्वोत्तम होते. मात्र, जे पराभूत झाले ते कमी नव्हतेच. त्यांना पुढे संधी मिळणारच आहे, असे स्पष्टीकरण भारतीय मुष्ठीयोद्धा संघटनेचे अध्यक्ष (बीएफआय) अजयसिंग यांनी दिले.

मी तिच्याशी हस्तांदोलन का करावे? मी तिचा आदर करावा, असे वाटत असेल तर तिनेही दुसऱ्याचा आदर ठेवायला हवा. कोण श्रेष्ठ आहे, याचा निर्णय लागला आहे. बोलण्यापेक्षा कामगिरी करून दाखवा, इतकेच मला सांगयाचे आहे. मी वाद उत्पन्न केला नव्हता. मी चाचणीला येणार नाही, असे कधीही बोलले नव्हते.
- एम. सी. मेरीकोम

मेरीने जो व्यवहार केला त्यामुळे दुख: झाले. रिंकमध्येही मेरीने माझ्याविरुद्ध शिवराळ भाषा वापरली. मात्र, मी हे सहन केले. ती मला म्हणाली, तू ज्युनियर आहेस. लढत संपल्यानंतरही मी गळाभेट घेण्याचा प्रयत्न केला. तिने प्रतिसाद दिला असता तर बरे वाटले असते. मात्र, यावर मी काही भाष्य करणार नाही.
- निकहत झरीन.

Web Title: Maricom defeats Zarin in a stressful fight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.