महाराष्ट्राचे चेतन पाठारे जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2019 06:42 PM2019-05-08T18:42:17+5:302019-05-08T18:43:00+5:30

जागतिक शरीरसौष्ठव महासंघावर प्रथमच फडकला तिरंगा

Maharashtra's Chetan Pathare as the General Secretary of the World Body Society Federation | महाराष्ट्राचे चेतन पाठारे जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी

महाराष्ट्राचे चेतन पाठारे जागतिक शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी

 मुंबई :  भारतीयशरीरसौष्ठवाची ताकद अवघ्या जगाला दाखवणाऱ्या चेतन पाठारे यांनी इतिहास रचला. जागतिक शरीरसौष्ठव महासंघावर प्रथमच तिरंगा फडकला असून भारतीय शरीरसौष्ठव महासंघाचे सरचिटणीस असलेल्या पाठारे यांची जागतिक शरीरसौष्ठव आणि फिजीक स्पोर्टस् महासंघाच्या(डब्ल्यूबीपीएफ) सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. जागतिक शरीरसौष्ठवाच्या इतिहासात प्रथमच भारतीय संघटकाची सरचिटणीसपदी निवड झाल्याची अभिमानास्पद गोष्ट घडली आहे.
 
डब्ल्यूबीपीएफचे अध्यक्ष बुलात मर्गीलियेव्ह यांनी वैयक्तिक कारणांमुळे नुकताच आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर झालेल्या निवडणूकीमध्ये पॉल चुआ यांची अध्यक्षपदी तर चेतन पाठारे यांची सरचिटणीसपदी निवड करण्यात आली. गेली चार वर्षे डब्ल्यूबीपीएफचे संयुक्त सचिव असलेले पाठारे आता पुढील चार वर्षांसाठी जागतिक महासंघाच्या सरचिटणीसपदाची जबाबदारी सांभाळतील. 2011 सालापासून भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदाची धुरा सांभाळणाऱ्या चेतन यांनी गेल्या आठ वर्षात भारतीय शरीरसौष्ठवाचा चेहरामोहरा बदलण्याचा करिष्मा करून दाखविला आहे. पाठारे यांनीच शरीरसौष्ठव खेळाला आर्थिक श्रीमंती मिळवून दिल्यामुळेच आज जागतिक पातळीवर होणाऱया स्पर्धेत भारतीय शरीरसौष्ठवपटूंचा सर्वात मोठा संघ सहभागी होतोय. एवढेच नव्हे तर भारतीय शरीरसौष्ठवपटू सुवर्ण पदके जिंकून आपली ताकदही अवघ्या जगाला दाखवून देत आहेत. हा सारा बदल घडविणाऱ्या पाठारे यांनी गेल्याच वर्षी पुण्यात आशियाई शरीरसौष्ठव स्पर्धेचे दिमाखदार आयोजन करून सर्वांचेच लक्ष वेधले होते. त्याचबरोबर 2014 साली मुंबईत खासदार गजानन कीर्तीकर यांच्या मार्गदर्शनाखाली  मि. युनिव्हर्स जागतिक शरीरसौष्ठव स्पर्धेचे "न भूतो न भविष्यति" असे आयोजन करून जागतिक पातळीवर भारताचा दबदबा निर्माण केला होता. या दोन स्पर्धांसह चंदिगड येथे दक्षिण आशियाई स्पर्धेचेही आयोजन पाठारे यांच्याच नेतृत्वाखाली करण्यात आले होते.

चेतन पाठारे भारतीय शरीरसौष्ठव महासंघावर आल्यापासून महाराष्ट्र हे भारतीय शरीरसौष्ठवाचे मुख्य केंद्र बनले आहे. त्याचबरोबर जागतिक पातळीवर भारताचेही वर्चस्व दिसू लागलेय. अल्पावधीतच भारतीय शरीरसौष्ठवाचे सर्वेसर्वा बनलेल्या पाठारे यांनी महाराष्ट्रात मि. युनिव्हर्स आणि आशियाई श्री स्पर्धा आयोजित करून आपला दबदबा आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण केला. शरीरसौष्ठवाच्या तळागाळातील कार्यकर्त्यांना हाताशी घेऊन स्पर्धांचे देखणे आयोजन करण्याचा हातखंडा असलेल्या पाठारे यांच्या कल्पक आणि धडाडीच्या नेतृत्वामुळेच दुभंगलेली शरीरसौष्ठव संघटना आज जागोजागी एक होत आहे. अनेक संघटक पाठारे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहात आहेत. त्यामुळे अन्य शरीरसौष्ठव संघटनाचे बस्तान उदध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत.

शरीरसौष्ठवाचे भीष्माचार्य मनोहर पाठारे यांचे सुपुत्र असलेल्या चेतन पाठारे यांनी गेल्या दहा वर्षात आपली स्वताची ओळख अवघ्या शरीरसौष्ठवाला दाखवून दिली आहे. मुंबई शरीरसौष्ठव संघटनेचे केवळ सदस्य असलेल्या चेतन पाठारे यांची आपल्या उच्च शिक्षण आणि मितभाषी वृत्तीमुळे 2011 साली भारतीय शरीरसौष्ठव महासंघाच्या सरचिटणीसपदी थेट नियुक्ती झाली. पाठारे यांना शरीरसौष्ठवपटू घडविण्याचे बाळकडू घरातच मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रीय संघटनेवर येताच खेळ आणि खेळाडू शारिरीकदृष्ट्या आणि आर्थिकदृष्ट्या श्रीमंत कसे होतील, हेच ध्येय उराशी बाळगले. गेल्या आठ वर्षांत त्यांनी हे ध्येय साकारले असून आता जागतिक शरीरसौष्ठवावर भारताचे वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नव्या अध्यायाला त्यांच्या सरचिटणीसपदाने प्रारंभ होत आहे. पाठारे यांच्या निवडीमुळे भारतीय शरीरसौष्ठव क्षेत्रात सर्वत्र आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण पसरले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शरीरसौष्ठव खेळ जागतिक पातळीवर सर्वोच्च उंची गाठेल, असा विश्वास शरीरसौष्ठवाच्या दिग्गजांनी व्यक्त केला आहे.

Web Title: Maharashtra's Chetan Pathare as the General Secretary of the World Body Society Federation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.