खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या मुष्टियोद्धांचा सुवर्ण षटकार

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2020 09:18 PM2020-01-21T21:18:21+5:302020-01-21T21:19:49+5:30

बॅडमिंटनमध्ये रियाला रौप्य

Khelo India: six Gold medals for Boxer of Maharashtra Boxer | खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या मुष्टियोद्धांचा सुवर्ण षटकार

खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या मुष्टियोद्धांचा सुवर्ण षटकार

Next

गुवाहटी : खेलो इंडिया युथ गेम्समध्ये मुष्टीयुद्धात महाराष्ट्राच्या मुष्टियोद्ध्यांनी सुवर्णपदकांचा षटकार ठोकला. स्पर्धेतील १७ वर्षांखालील गटात मुलांच्या विभागातून अंतिम फेरी गाठलेल्या पाचही खेळाडूंनी सुवर्णपदकांची कमाई केली. मुलींच्या गटात गतविजेत्या देविका घोरपडे हिचे अपयश ६३ किलो वजनी गटात जळगावच्या दिशा पाटिलने धुवून काढले. मुलांच्या विभागात, संजित, विजयदीप, सईखोम, याईपाबा यांच्यासह जयदिप रावत यांनी सुवर्ण पदक पटकाविले. सुवर्णपदकाचे पाचही शिलेदार पुण्यात एएसआय येथे सराव करतात.

    सकाळच्या सत्रात संजित, विजयदीप, सईखोम, याईबापा यांच्या सुवर्ण ठोशांनंतर दुपारच्या सत्रात जयदिप रावत याने ६६ किलो वजन गटात हरियानाच्या हर्षित राठी याचा सफाया करताना पाचही जज्जेसना आपल्या बाजूने कौल देणे भाग पाडले. कमालीचा आक्रमक खेळणा-या जयदिपच्या ठोशांना हर्षितकडे उत्तरच नव्हते. त्यापूर्वी सुरवातीला आक्रमक असणार्या हरियानाच्या रुद्रिकाला दुस-या फेरीपासून दिशाने कोंडित पकडण्यास सुरवात केली. दुस-या फेरीत दोघींचा खेळ समान राहिला. मात्र, बचाव आणि अचूक ठोशांमुळे दिशाचे एक पाऊल पुढे राहिले. अखेरच्या तिस-या फेरीत दिशा कमालीची वेगवान खेळली. याचा फायदा तिला झाला. दिशाच्या या बदललेल्या पवित्र्यामुळे रुद्रिका पुरती गोंधळून गेली आणि तिला आपला खेळ दाखविण्यासाठी वेळच मिळाला नाही. जज्जेसने दिशाच्या बाजूने कौल दिल्यावर हॉल गणपती बाप्पा मोरया आणि छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणांनी निनादून गेला.

    सर्वप्रथम ४८ किलो वजन गटात संजित सिंगने मणिपूरच्या सोईबाम याईपाबा याचा पराभव करताना जज्जेसना विचार करण्याची फारशी संधी दिली नाही. त्यानंतर विजयदीपने ५० किलो वजन गटात हरियानाच्या हरदीप सिंगचा असाच एकतर्फी लढतीत पराभव केला. पुढे सईखोम याने ५२ किलो वजन गटात दमण आणि दीवच्या हर्षला पराभूत केले. याईपाबा मैताई याने तर ५४ किलो वजन गटाची लढत जिंकताना हिमाचल प्रदेशाच्या नवराज चौहानला साफ निष्प्रभ केले. या चौघांच्याही खेळाचे वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी राखलेली आक्रमकता. पहिल्या फेरीत जम बसवताना प्रतिस्पध्यार्चा अंदाज घ्यायचा आणि नंतर त्याच्यावर जणू तुटून पडायचे अशा नियोजनानेच या चौघांनी खेळ केला. पंचेस, अप्पर, लोअर कटच्या फटक्यांमधील अचूकतेबरोबर त्यांनी रिंगमध्ये दाखवलेली चपळताही विलक्षण होती. विजयदीपविरुद्ध तर एकदा पंचाना हरदीपसाठी काऊंट घ्यावे लागले.

    मुलींच्या ४६ किलो वजन गटातील अंतिम लढतीत देविकाला हरियानाच्या कल्पनाविरुद्ध तिस-या फेरीतील संथपणा महागात पडला. त्यामुळे तिला या स्पधेर्तील गतविजेतेपद राखण्यात अपयश आले. आशियाई विजेत्या कल्पनाविरुद्ध खेळताना दडपणाचा सामना करण्यात कमी पडल्याचे देविकाने मान्य केले. निर्णायक तिस-या फेरीत खेळ उंचावण्यात मला यश आले नाही. माझी हाताची हालचाल म्हणावी तशी झाली नाही. जसा खेळ व्हायला हवा तसा झाला नाही असेही तिने सांगितले. त्या वेळी सुवर्ण लढत हरल्याची खंत तिच्या बोलण्यातून जाणवत होती.

    महाराष्ट्रासाठी देविकाच्या अपयशाची सल नक्कीच राहिल. तिचे वैयक्तिक प्रशिक्षक मनोज पिंगळे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी देखील तिस-या फेरीत ती कमी पडल्याचे मान्य केले. अर्थात, सुवर्णपदकाच्या लढतीचे दडपणही तिला दुस-या राज्यात खेळताना जाणवले असावे, असे सांगितले. आपले खेळाडू तंत्र आणि कौशल्यात कुठेच कमी पडत नाहीत. ते हरियानाच्या एकतर्फी वर्चस्वाचा सामना करू शकत नाहीत हे देखील मान्य करायला हवे. यासाठी संघटनेने आपल्या खेळाडूंना राष्ट्रीय पातळीवर स्पर्धात्मक अनुभव अधिक मिळावा यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले. अशा स्पर्धात्मक अनुभवातूनच खेळाडू स्वत:हून दडपणाचा सामना करायला शिकतील असे मतही त्यांनी मांडले.



* बॅडमिंटनमध्ये रियाला रौप्य
    महाराष्ट्राच्या रिया हब्बूला बॅडमिंटनमध्ये १७ वर्षांखालील गटात रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. अंतिम लढतीत रियाला राजस्थानच्या साक्षी फोगटविरुद्ध १६-२१, २१-२३ अशा पराभवाचा सामना करावा लागला. फटक्यात अचूकता राखण्यात आलेले अपयश आणि सातत्याचा अभाव यामुळे तिला पराभव पत्करावा लागला. पहिल्या गेममध्ये १५-१५ गुणांपर्यंत बरोबरीनंतर रियाला केवळ एकच गुण मिळविता आला. दुस-या गेमला रियाने सातत्याने एक-दोन गुणांची आघाडी राखली होती. मात्र, साक्षीनेही तिच्या खेळाचा असलेला अभ्यास दाखवून देत तिच्यावर सतत बरोबरीची टांगती तलवार ठेवली. याचमुळे कदाचित १८-२० असा स्थितीत रियाला गेम पॉइंट साधण्यात तीनवेळा अपयश आले. त्यानंतर २०-२१  या स्थिततही चौथ्यांदा ती गेम पॉइंट साधू शकली नाही. साक्षीने मात्र २१-२१ अशी बरोबरी साधून २२-२१ अशी आघाडी घेतली आणि पहिल्याच मॅच पॉइंटला सुवर्णपदक खिशात घातले.

Web Title: Khelo India: six Gold medals for Boxer of Maharashtra Boxer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.