खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2020 07:15 PM2020-01-14T19:15:47+5:302020-01-14T19:16:28+5:30

महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनीट ४४.७० सेकंद अशी वेळ देत जिंकताना वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले.

Khelo India: Pooja Danole won third gold medal for Maharashtra | खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक

खेलो इंडिया : महाराष्ट्राच्या पूजा दानोळेला तिसरे सुवर्णपदक

googlenewsNext

गुवाहटी : खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेच्या तिस-या पर्वात मंगळवारी सायकलिंगच्या वेलोड्रमवर महाराष्ट्राच्या सायकलपटूंनी पदकांचा सपाटा लावला. यामुळे स्पर्धेतील महाराष्ट्राच्या पदकांनीही वेग घेतला.

महाराष्ट्राच्या पूजा दानोळे हिने आज ५ कि.मी. स्क्रॅच शर्यत ८ मिनीट ४४.७० सेकंद अशी वेळ देत जिंकताना वैयक्तिक तिसरे सुवर्णपदक मिळविले. त्यानंतर तीला १७ वर्षांखालील गटात सांघिक स्प्रिंट  प्रकारात आदिती डोंगरेसह ब्रॉंझपदकावर समाधान मानावे लागले. त्यांनी ५४.७१ सेकंद अशी वेळ दिली. सांघिक स्प्रिंट प्रकारात महाराष्ट्राच्या मुलामुलींनी मक्तेदारी राखली. मुलांच्या अभिषेक काशिद, मयूर पवार, अश्विन पाटील यांनी १ मिनीट ०६.०९२ सेकंदासह सुवर्णपदक मिळविले. पाठोपाठ शुशिकला आगाशे आणि मयुरी लुटे यांनी ४९.७३६ सेकंद वेळासह सोनेरी यश मिळविले.

    महाराष्ट्राला आजच मयुरी लुटे हिने २१ वर्षांखालील गटात ५०० मीटर टाईम ट्रायल शर्यतीत वैयक्तिक रौप्यपदक मिळवून दिले. तिने ३८.४६२ सेकंद वेळ दिली. तिला दिल्लीची आंतरराष्ट्रीय सायकलपटू त्रियशा पॉल हिच्या वेगाचा सामना करता आला नाही. त्रियशाने अपेक्षित कामगिरी करताना ३८.९८१ सेकंदासह सुवर्णपदक मिळविले. महाराष्ट्राला आजचे आणखी एक ब्रॉंझपदक मंगेश ताकमोगे याने वैयिक्तक टाईम ट्रायलमध्ये मिळवून दिले.  त्याने ३६.१०० सेकंद अशी वेळ दिली. तो अंदमान निकोबारच्या  डेव्हिड बेकहॅम, मणिपूरच्या ख्वाराकपाम राहुल सिंग यांच्या वेगाला गाठण्यात अपयश आले.

    लक्ष्मीबाई राष्ट्रीय शारीरिक शिक्षण संस्थेच्या वेलोड्रमवर आज महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. कोल्हापूरच्या पूजाने आज सलग तिसरे सुवर्णपदक मिळविताना आपली छाप पाडली. स्पर्धेत तिने पाच सुवर्णपदकाचे उद्दिष्ट बाळगले होते. मात्र, तिला ते साधण्यात अपयश आले असले, तरी ती पदकापासून दूर राहिली नाही. सुवर्ण हुकले तरी तिने जिद्दीने ब्रॉंझपदकाची कमाई केली. मुलांच्या २१ वर्षांखालील संघातील मयूर पवार, अश्विन पाटिल आणि अभिषेक काशिद यांनी आपला अनुभव पणाला लावताना आपल्यावरील विश्वास ढळू दिला नाही. सातारा आणि भंडारा येथून आलेल्या या तिघांनी आपल्या आंतरराष्ट्रीय यशाचा लौकिक कायम राखताना निर्विवाद वर्चस्व राखताना शर्यत सहज जिंकली. या तिघांनी आतापर्यंत तीन वर्षात आशिया करंडक स्पर्धेत दोन आणि एक आशियाई अजिंक्यपद स्पर्धेत सुवर्णपदक मिळविले आहे. या तिघांनाही आता जागतिक स्तरावर आपले नाव कमवायचे आहे.

* आसामच्या मुख्यमंत्र्यांकडून महाराष्ट्राच्या पूजाचे कौतुक
    आसामचे मुख्यमंत्री सवार्नंद सोनोवाल यांनी आज येथील सायकलिंग स्पर्धेला भेट दिली. त्या वेळी भारतीय सायकलिंग महासंघाचे खजिनदार प्रताप जाधव यांनी महाराष्ट्राच्या खेळाडूंशी त्यांची भेट घडवून आणली. महाराष्ट्राच्या पूजाने तीन सुवर्णपदके मिळविल्याचे समजल्यावर सोनोवाल यांनी तिला जवळ बोलावून तिचे कौतुक करताना आवर्जुन तिच्याशी संवाद साधला. महाराष्ट्रातून कुठून आलीस, घरी कोण आहे, आई वडिल काय करतात असे विचारल्यावर त्यांनी तुझ्याबरोबर आई वडिलांचेही अभिनंदन करायला हवे असे सांगितले आणि भेटल्यावर त्यांना माझा नमस्कार सांग असेही त्यांनी सांगितले. अशी गुणी खेळाडू त्यांनी देशाला दिली त्यांचाही मला अभिमान वाटतो, असे सांगून सोनोवाल यांनी नंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंबरोबर फोटोही काढून घेतला.

Web Title: Khelo India: Pooja Danole won third gold medal for Maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.