खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळेचे दुसरे सुवर्णपदक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2020 08:02 PM2020-01-13T20:02:19+5:302020-01-13T20:04:06+5:30

Khelo India : रोड रेसमध्ये मुलींच्या १७ वर्षांखालील गटात पूजा दानोळे हिने सलग दुस-या दिवशी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांच्या याच वयोगटातून सिद्धेश पाटीलने ब्रॉंझ पदकाची कमाई केली.

Khelo India: Kolhapur's pooja won second gold medal in cycling | खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळेचे दुसरे सुवर्णपदक

खेलो इंडिया : सायकलिंगमध्ये कोल्हापूरच्या पूजा दानोळेचे दुसरे सुवर्णपदक

googlenewsNext
ठळक मुद्देसिद्धेश पाटील याला ब्रॉंझ

आसाम, गुवाहटी : खेलो इंडिया युवा स्पर्धेच्या तिस-या पर्वाच्या पाचव्या दिवशी सोमवारी कोल्हापूरच्या मल्लांनी नव्हे, तर सायकलपटूंनी छाप पाडली. रोड रेसमध्ये मुलींच्या १७ वर्षांखालील गटात पूजा दानोळे हिने सलग दुस-या दिवशी सुवर्णपदकाला गवसणी घातली, तर मुलांच्या याच वयोगटातून सिद्धेश पाटीलने ब्रॉंझ पदकाची कमाई केली.

    सोनापूर हमरस्त्यावर झालेल्या या स्पर्धेत मुलींच्या ३० कि.मी. शर्यतीत पूजाने आपल्या लहान वयातच मिळविलेल्या अनुभवाच्या जोरावर वर्चस्व राखले. शर्यतीत तिस-या टप्प्यापर्यंत बहुतेक स्पर्धक एकत्रच आगेकूच करत होते. अखेरच्या एक कि.मी. अंतरावर पूजा या स्पर्धकांमधून थोडू पुढे आली आणि अखेरच्या शंभर मीटरला तिने वेग वाढवताना थाटात अंतिम रेषा गाठली. तिने ताशी ३५ कि.मी. वेगाने सायकलिंग करताना ५५ मिनीट ४२.३२ सेकंद अशी वेळ दिली. तिने गुजरातच्या मुस्कान गुप्ताला (५५ मिनीट ४२.४७ सेकंद) दशांश पंधरा सेकंदाने मागे टाकले. तिस-या क्रमांकासाठी मात्र चुरस झाली. दिल्लीची इशिका गुप्ता, चंडिगडची रीत कपूर या दोघींनी ५५ मिनीट ४२.७१ सेकंद अशी वेळ देत एकत्रच अंतिम रेषा गाठली. पण, फोटो फिनीशमध्ये इशिकाने बाजी मारल्याचे स्पष्ट झाले.

    मुलांच्या ५० कि.मी. अंतराच्या शर्यतीत बहुतेक स्पर्धकांच्या सायकिलंगचा वेग पाहून थक्क होण्यासारखे झाले. लहान वयातही या मुलांनी पाच टप्प्याच्या शर्यतीत ताशी ४० ते ४५ कि.मी. वेग राखला होता. यात दिल्लीच्या अर्शद फरिदी याने (१ तास ९ मिनीट ३६.२५ सेकंद) सहज बाजी मारली. त्याच्यानंतर हरियानाच्या रवी सिंगने १ तास ९ मिनीट३६.४३ सेकंद वेल देत रौप्यपदक पटकावले. महाराष्ट्राच्या सिद्धेश पाटीलने त्याला गाठण्याचा खूप प्रयत्न केला. पण, सिद्धेश (१तास ९ मिनीट ३६.४९ सेकंद) दशांश सहा सेकंदाने मागे राहिल्याने त्याला ब्रॉंझ पदकावर समाधान मानावे लागले.



* दोन कसली पूर्ण पाच पदके मिळवायची - पूजा


    सलग दुस-या दिवशी सुवर्ण पदकाला गवसणी घातल्यानंतर  पूजाचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला होता. या दोन सुवर्णपदकांवर मी समाधानी नाही. मी आता ट्रॅकच्या आणखी तीन प्रकारात सहभागी होणार आहे. या तीनही प्रकारात यश मिळवून मला पाच सुवर्णपदकांची कमाई करायची आहे, असे पूजाने सांगितले. कोल्हापूरला आई वडिलांना भेटण्याची खूप इच्छा असते. पण, कारकिर्दपण घडवायची असल्यामुळे मी ते दु:ख विसरते. दिल्लीत अ‍ॅकॅडमीतील प्रशिक्षक अनिलकुमारच माझे आई वडिल असल्याची भावन व्यक्त करताना पूजाने या स्पर्धेत त्यांचीच सायकल घेऊन आल्याचे सांगितले. माझी स्वत:ची सायकल वडिलांनी कर्ज काढून घेतली आहे. माज्यासाठी तीचे महत्व खूप आहे. ती अ‍ॅकॅडमीत सरावासाठी वापरत असल्याचे सांगितले.



* गावच्या जत्रेतून राष्ट्रीय ट्रॅकवर
    कोल्हापूरमध्ये पन्हाळा येथील शिंगणापूरचा सिद्धेश गावच्या जत्रेतील सायकलिंग स्पर्धेत सहभागी व्हायचा. पण, एक दिवस हीच जत्रेतील सायकलिंग करण्याची आवड आपल्याला राष्ट्रीय स्तरावर नाव मिळवून देईल असे त्यालाही वाटले नसेल. पण, कपिल कोळी या त्याच्या शाळेतील सरांनी त्याची क्षमता ओळखली आणि त्याला सायकलिंगचे धडे देण्यास सुरवात केली.

    त्यांच्याकडून धडे घेत असताना गेली दोन वर्षे तो पुण्यात क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला आणि त्याच्यातील सायकलपटूला पैलू पडत गेले. दीपाली पाटिल यांच्याकडून मार्गदर्शन घेत सिद्धेश प्रथमच खेलो इंडियात सहभागी झाला आणि पहिल्याच प्रयत्नात त्याने ब्रॉंझपदकाची कमाई केली. तो म्हणाला, अंतिम रेषेवर बिनधास्त राहायची आणि मागे बघण्याची सवय मला नेहमीच मारक ठरते. या वेळीही ठरली. नाही, तर रौप्यपदक मिळविले असते. यंदाच्या पावसाळ्यात सिद्धेशचे घर सात दिवस पाण्यात होते. ऊसाच्या पिकाचेही नुकसान झाले. त्यानंतरही  हे दु:ख विसरून कुटुंबिय पाठिंबा देत आहेत. त्यांच्यासाठी मला मोठे व्हायचे आहे, असेही सिद्धेशने सांगितले. या पदकाचे वडिलांना कळविले, तेव्हा आता पुढचा दिवस चांगला जाईल, ही त्यांची भावना माज्यासाठी पदकापेक्षा मोठी वाटते, अशी भावनाही त्याने व्यक्त केली.

Web Title: Khelo India: Kolhapur's pooja won second gold medal in cycling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.