हॉकी विश्वविजयाचे आणि विजेत्यांचेही देशाला विस्मरण, १५ मार्च १९७५ ला जिंकला होता विश्वचषक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:46+5:302021-03-16T06:54:27+5:30

पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो.

The country forgets the Hockey World Cup winners, had won the World Cup on March 15, 1975 | हॉकी विश्वविजयाचे आणि विजेत्यांचेही देशाला विस्मरण, १५ मार्च १९७५ ला जिंकला होता विश्वचषक

हॉकी विश्वविजयाचे आणि विजेत्यांचेही देशाला विस्मरण, १५ मार्च १९७५ ला जिंकला होता विश्वचषक

Next

नवी दिल्ली : १५ मार्च १९७५ चा तो दिवस...पारंपरिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला २-१ अशा गोलफरकाने लोळवून भारतीयहॉकी संघाने मलेशियाची राजधानी क्वालालम्पूर येथे विश्वविजयी पताका फडकाविली होती. या ऐतिहासिक घटनेला आज ४६ वर्षे झाली. हॉकीचा एकमेव विश्वचषक जिंकलेला तो दिवस दुर्दैवाने कुणाच्याही स्मरणात नाही. चाहतेदेखील त्या जेतेपदाच्या नायकांना विसरले आहेत. (The country forgets the Hockey World Cup winners, had won the World Cup on March 15, 1975)

पाकिस्तानविरुद्ध फायनलमध्ये विजयी गोल नोंदविणारे ध्यानचंद यांचे पुत्र अशोक कुमार यांनी या दिवसाचे महत्त्व नजरेआड केल्याबद्दल नाराज दिसले. ‘आम्ही राष्ट्रवादाची भाषा करतो, पण त्यावेळी संपूर्ण देशाला राष्ट्रभक्तीत गुंफणाऱ्या त्या विजयाला मात्र विसरतो. सकाळपासून अभिनेत्री आलिया भटच्या वाढदिवसाच्या बातम्या टीव्ही चॅनल्सवर विशेष कार्यक्रमाच्या रूपाने झळकत आहेत; पण १९७५ च्या विश्वविजयाचा साधा उल्लेख देखील नाही,’ अशा शब्दांत त्यांनी स्वत:च्या मनातील सल व्यक्त केली.

‘त्यावेळी राष्ट्रवाद हॉकीशी निगडित होता. प्रत्येक विजयानंतर संपूर्ण देश आनंदात आणि उत्साहात न्हावून जात असे. विश्वचषकाच्या अंतिम सामन्याचे रेडिओवरील समालोचन अनेकांच्या स्मरणात आहे. राजकपूर यांनी वानखेडे स्टेडियमवर बॉलिवूड आणि विश्वविजेत्या हॉकी संघादरम्यान मैत्री सामन्याचे आयोजन केले होते. संपूर्ण बॉलिवूड हा सामना पाहण्यासाठी स्टेडियममध्ये उपस्थित होते. १९३६ च्या बर्लिन ऑलिम्पिकनंतर सर्वांत प्रभावी विजय कुठला असेल तर तो १९७५ च्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यातील जेतेपद हेच होते. भावी पिढी मात्र या विजयाचे महत्त्व ओळखू शकली नाही,’ अशी खंत अशोककुमार यांनी व्यक्त केली आहे.

त्या संघातील अन्य एक सदस्य अशोक दिवाण म्हणाले, ‘देशाने जिंकलेला तो पहिला विश्वचषक होता. त्यावेळी क्रिकेट विश्वचषकही जिंकला नव्हता. त्या जेतेपदाला पूर्ण सन्मान मिळायला हवा. भारताने २०२३ ला पुन्हा विश्वचषक जिंकावा, अशी मी अपेक्षा बाळगतो. १९७५ च्या विश्वचषक विजयाचा दरवर्षी जल्लोष करण्याचे आम्ही काही खेळाडूंनी ठरविले होते, असे १९७६ च्या माँट्रियल ऑलिम्पिक हॉकी संघाचे सदस्य राहिलेले वरिंदरसिंग यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, ‘२०१८ ला भुवनेश्वर येथे विश्वचषक हॉकीचे आयोजन झाले त्यावेळी आम्ही सर्वजण आठवडाभर सोबत होतो. जुन्या आठवणींना त्यावेळी उजाळा दिला. सोबत बसून  सामन्यांचा आनंद लुटला. त्यानंतर मात्र एकत्र येणे जमले नाही. ज्या पद्धतीने बीसीसीआयने माजी खेळाडूंना जोडून ठेवले आहे तशीच व्यवस्था हॉकीत असायला हवी.  आयपीएलसारखी हॉकीत लीगची व्यवस्था करण्यात आली होती. यामुळे जुनेजाणते खेळाडू एकत्र यायचे. मात्र, लीग बंद पडली. भविष्यात असा प्रयत्न पुन्हा व्हावा.’ 

‘भारताचा हा पहिलाच विश्वचषक होता. आजपर्यंत आम्ही दुसऱ्या जेतेपदाची प्रतीक्षा करीत आहोत. १५ मार्चला दरवर्षी आम्ही त्या संघातील जीवित सदस्य, तसेच हॉकी समुदायातील लोक एकमेकांचे अभिनंदन करतो. अन्य कोणाला त्या ऐतिहासिक क्षणांचे स्मरण होत नसावे. काही देणेघेणे नाही. असेच होत राहिल्यास भावी पिढीला काही कळणार नाही.’
- अशोक दिवाण, विश्वविजेत्या संघाचे सदस्य
 

Web Title: The country forgets the Hockey World Cup winners, had won the World Cup on March 15, 1975

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.