Coronavirus: देशात सराव कधी आणि केव्हा सुरू करायचा? आयओएने मागितल्या सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: May 6, 2020 12:20 AM2020-05-06T00:20:59+5:302020-05-06T00:21:09+5:30

या फीडबॅकमध्ये ज्या सूचनांवर मत मागविण्यात आले त्यात कोरोनानंतर जे बदल होतील, ते स्वीकारण्यास तयार आहात का, खासगी सुरक्षा, स्वच्छता, सोशल डिस्टन्स, खबरदारीचे उपाय आणि स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियमच्या आत प्रवेश द्यायचा की नाही आदींचा समावेश आहे

Coronavirus: When and when to start training in the country? Suggestions requested by the IOA | Coronavirus: देशात सराव कधी आणि केव्हा सुरू करायचा? आयओएने मागितल्या सूचना

Coronavirus: देशात सराव कधी आणि केव्हा सुरू करायचा? आयओएने मागितल्या सूचना

Next

नवी दिल्ली : कोरोनामुळे देशात १७ मेपर्यंत लॉकडाऊन कायम आहे. अशा स्थितीत राष्ट्रीय शिबिरांना सुरुवात करण्यासंदर्भात भारतीय ऑलिम्पिक संघटनेने (आयओए) खेळाडू, कोचेस आणि अन्य हितधारकांकडून सूचना मागविल्या आहेत. राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि राज्य आॅलिम्पिक संघटनांकडे या सूचना पाठविण्यात आल्या असून त्यांनी खेळाडू, कोचेस, सहयोगी स्टाफ, केंद्र आणि राज्य शासनांमधील मंत्री, सामनाधिकारी, क्रीडा प्रशासक आदींकडून क्रीडा सराव कसा आणि कधी सुरू करण्यात यावा, या बाबत मागोवा घेण्यास सांगितले आहे. देशभरातील सर्व सूचना एकत्रित करण्यात येणार आहेत.

क्रीडामंत्री किरेन रिजिजू यांनी या महिन्याअखेर राष्ट्रीय शिबिरांचे आयोजन टप्प्याटप्प्याने सुरू करण्याची योजना असल्याचे म्हटले होते. आयओने मात्र केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य नियमानुसार खेळ सुरू करण्यास प्राधान्य दिले जाईल, असे म्हटले आहे. मंगळवारी जे दस्तावेज प्रसिद्ध करण्यात आले त्यात, ‘लॉकडाऊन सुरू झाल्यापासून खेळाडूंना स्वत:चा सराव संपवावा लागला. यामुळे खेळाडू आणि कोचेसवर विपरीत परिणाम होण्याचा धोका आहे. पुढचा मार्ग कसा प्रशस्त करता येईल, याबाबत सर्वांच्या सूचना विचारात घेण्यात येतील,’ असे म्हटले आहे. एकूण १८ राष्ट्रीय क्रीडा महासंघ आणि १६ राज्य आॅलिम्पिक संघटनांना फीडबॅक फॉर्म पाठविण्यात आले आहेत. २० मेच्या आत खेळाडू, कोचेस आणि हितधारकांचे मत जाणून घ्या, असे सांगण्यात आले आहे. महासंघ आणि राज्य संघटना ३१ मेपर्यंत स्वत:चे मत कळवणार आहेत. जूनपर्यंत अंतिम गोषवारा तयार केला जाणार आहे.

या फीडबॅकमध्ये ज्या सूचनांवर मत मागविण्यात आले त्यात कोरोनानंतर जे बदल होतील, ते स्वीकारण्यास तयार आहात का, खासगी सुरक्षा, स्वच्छता, सोशल डिस्टन्स, खबरदारीचे उपाय आणि स्पर्धेदरम्यान प्रेक्षकांना स्टेडियमच्या आत प्रवेश द्यायचा की नाही आदींचा समावेश आहे. आयओए अध्यक्ष, महासचिव आणि आणि तज्ज्ञांचा समावेश असलेली समिती सर्व सूचनांवर अंमल करण्यासाठी सरकारकडे आग्रह धरतील. 

Web Title: Coronavirus: When and when to start training in the country? Suggestions requested by the IOA

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.