Badminton star Lee Chong announced his retirement | बॅडमिंटन स्टार ली चोंगने जाहीर केली निवृत्ती
बॅडमिंटन स्टार ली चोंगने जाहीर केली निवृत्ती

लिया पुत्राजाया (मलेशिया) : कर्करोगाशी कडवी झुंज देत असलेला मलेशियाचा बॅडमिंटन स्टार ली चोंग वेई याने गुरुवारी निवृत्ती जाहीर केली. कारकीर्दीत अनेक जेतेपदाचा मानकरी राहिलेल्या ३६ वर्षांच्या लीची आॅलिम्पिक सुवर्ण जिंकण्याची इच्छा मात्र अपूर्णच राहिली. निवृत्तीची घोषणा करतेवेळी ली भावुक झाला. त्याला अश्रू रोखणे अनावर होत होते.

ली म्हणाला, ‘मी जड अंत:करणाने निवृत्ती जाहीर करीत आहे. मी या खेळावर फार प्रेम करतो, पण या खेळात ताकद आणि फिटनेसला महत्त्व आहे. गेल्या १९ वर्षांत मिळालेल्या पाठिंब्याबद्दल मी मलेशियातील प्रत्येक नागरिकाचा आभारी आहे.’ दोन मुलांचा पिता असलेल्या ली याला मागच्यावर्षी नाकाचा कर्करोग असल्याचे निष्पन्न झाले होते. प्राथमिक स्तरावर असलेल्या कर्करोगावर त्याने तैवानमध्ये उपचार करून घेतले. कोर्टवर पुनरागमनासाठी तो फारच उत्सुक होता. एप्रिल महिन्यापासून सराव करण्याची त्याची योजना होती. ही योजना पूर्ण होत नसल्याचे पाहून पुढीलवर्षी टोकियो आॅलिम्पिक खेळण्याच्या त्याच्या स्वप्नांवर पाणी फेरले गेले.


आॅलिम्पिकचा तीनवेळा रौप्य विजेता असलेल्या ली ने आता विश्रांती घेणे आणि कुटुंबीयांसोबत वेळ घालविणे इतकेच काम असेल, असे सांगितले. २०१२ ला माझे लग्न झाले पण तेव्हापासून मी पत्नीला फिरायला नेलेले नाही. वेळेअभावी ते राहून गेले. आता नक्की तिला फिरायला घेऊन जाणार असल्याचे ली याने शेवटी सांगितले. (वृत्तसंस्था)

03
वेळा आॅलिम्पिक रौप्य पदक

03
जागतिक अजिंक्यपद रौप्य पदक

349
आठवडे जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान.

46
जागतिक सुपरसिरिज जेतेपद
निवृत्तीची घोषणा करताना ली याला अश्रू रोखणे अनावर झाले.

आंतरराष्ट्रीय स्पर्धा जेतेपद


Web Title: Badminton star Lee Chong announced his retirement
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.