आशियाई कुस्ती अजिंक्यपद: रौप्य यशासह जितेंदर ठरला ऑलिम्पिक चाचणीसाठी पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 24, 2020 01:29 AM2020-02-24T01:29:59+5:302020-02-24T01:30:23+5:30

मराठमोळ्या राहुल आवारेसह दीपक पूनियाचे कांस्य पदक

Asian wrestling title: Olympic test qualifier with silver success | आशियाई कुस्ती अजिंक्यपद: रौप्य यशासह जितेंदर ठरला ऑलिम्पिक चाचणीसाठी पात्र

आशियाई कुस्ती अजिंक्यपद: रौप्य यशासह जितेंदर ठरला ऑलिम्पिक चाचणीसाठी पात्र

googlenewsNext

नवी दिल्ली : भारतीय मल्ल जितेंदर कुमारला रविवारी येथे आशियाई कुस्ती अजिंक्यपदच्या ७४ किलो गट अंतिम फेरीत कजाखस्तानच्या गतविजेत्या दानियार कैसानोव्हविरुद्ध पराभव स्वीकारावा लागल्यामुळे रौप्यपदकावर समाधान मानावे लागले. फ्रीस्टाईल गटात दीपक पूनिया (८६) व महाराष्ट्राचा राहुल आवारे (६१) कांस्य पदकाचे मानकरी ठरले.

जितेंदरने या निकालामुळे भारतीय संघात स्थान निश्चित केले आणि यामुळे अनुभवी सुशीलकुमारसाठी टोकियो आॅलिम्पिकचे दरवाजे बंद होऊ शकतात. दोनदा आॅलिम्पिक पदकाचा मानकरी ठरलेला सुशील दुखापतीचे कारण देत या स्पर्धेत सहभागी झाला नाही. कजाखस्तानच्या गतविजेता दानियार कैसानोव्हविरुद्ध जितेंदरने बचावात्मक रणनीतीचा वापर केला, पण आक्रमकतेचा अभाव असल्यामुळे त्याला गत चॅम्पियनविरुद्ध १-३ ने पराभव स्वीकारावा लागला. पण त्याची कामगिरी राष्ट्रीय महासंघाला विश्वास देण्यासाठी पुरेशी ठरली. आॅलिम्पिक पात्रतेसाठी तो किर्गिस्तानच्या बिशकेकला जाणार असल्याचे निश्चित झाले. जितेंदर बिशकेकमध्ये कशी कामगिरी करतो याची सुशीलला प्रतीक्षा करावी लागणार आहे. अंतिम फेरी गाठणारा मल्ल टोकियो आॅलिम्पिकसाठी पात्र ठरेल. जितेंदर अंतिम फेरी गाठण्यात यशस्वी ठरला, तर सुशील कुमारचा टोकिओ आॅलिम्पिकचा मार्ग बंद होईल. त्याचवेळी जितेंदर अपयशी ठरला तर त्याला अखेरची संधी एप्रिलमध्ये विश्व पात्रता स्पर्धेच्या माध्यमातून मिळेल. (वृत्तसंस्था)

नूर सुल्तानमध्ये जागतिक अजिंक्यपदमध्ये कांस्यपदकाचा मानकरी ठरलेल्या राहुलने बिगर आॅलिम्पिक ६१ किलो वजन गटात उपांत्यपूर्व फेरीत उज्बेकिस्तानच्या जोहोंगीरमिर्झा तुरोबोव्हविरुद्ध ११-९ ने विजय मिळवला. पण, उपांत्य फेरीत किर्गिस्तानच्या उलुकबेक झोलदोशबेकोव्हविरुद्ध तो ३-५ असा पराभूत झाला. त्याने कांस्यपदकाच्या लढतीत इराणच्या माजिद अलमास दास्तानचा ४-२ ने पराभव केला.

दीपकने टाचेच्या दुखापतीमुळे विश्व अजिंक्यपदच्या अंतिम फेरीमध्ये इराणच्या हसन याजदानी याला पुढे चाल दिली होती. त्यानंतर त्याची ही पहिलीच स्पर्धा होती. इसा अब्दुलसलाम अब्दुलवहाब अल ओबेदीविरुद्ध कांस्यपदकाच्या लढतीत त्याने तांत्रिक श्रेष्ठतेच्या आधारावर बाजी मारली.
सतेंदरने १२५ किलो वजन गटात पात्रता लढत जिंकली, पण उपांत्यपूर्व फेरी व त्यानंतर रेपेचज फेरीत पराभूत झाला. सोमवारी ९२ किलो वजन गटात त्याचे आव्हान केवळ २४ सेकंद टिकले. तो उज्बेकिस्तानचा प्रतिस्पर्धी अजीनीयाज सापारनियाजोव्हविरुद्ध पराभूत झाला.

Web Title: Asian wrestling title: Olympic test qualifier with silver success

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.