गणेशमूर्तींचा या वर्षी भासणार तुटवडा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 24, 2020 12:44 AM2020-06-24T00:44:26+5:302020-06-24T00:44:33+5:30

दोन महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने सहा महिन्यांचे काम दोन महिन्यांत उरकावे लागणार असल्याने मूर्तींची निर्मितीही निम्म्यापर्यंत घटण्याची शक्यता आहे.

There will be a shortage of Ganesh idols this year | गणेशमूर्तींचा या वर्षी भासणार तुटवडा

गणेशमूर्तींचा या वर्षी भासणार तुटवडा

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : लॉकडाऊनमुळे मूर्तिकारांवर ओढावलेल्या संकटामुळे यंदा गणेशमूर्तींचा तुटवडा भासणार आहे. कोरोनामुळे कारागीर मिळत नसल्याने अनेक कारखानदार चिंतेत आहेत. अशातच दोन महिन्यांवर गणेशोत्सव आल्याने सहा महिन्यांचे काम दोन महिन्यांत उरकावे लागणार असल्याने मूर्तींची निर्मितीही निम्म्यापर्यंत घटण्याची शक्यता आहे.
नवी मुंबईसह पनवेल परिसरात दरवर्षी मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असतो. त्यानुसार, प्रतिवर्षी साधारण ६२ हजार घरगुती तर सुमारे ८२० सार्वजनिक मंडळांकडून मूर्तींची मागणी होत असते. त्यांना नवी मुंबईतील, तसेच पनवेल परिसरातील मूर्तिकार मूर्ती पुरवत असतात. परंतु सध्या राज्यात फैलावत असलेल्या कोरोनामुळे सर्वच उद्योग व्यवसायांवर संकट कोसळले आहे. त्यात गणेश मूर्तिकारांचाही समावेश असल्याचे दिसून येत आहे. दरवर्षी गणेशोत्सवाच्या साधारण सहा महिने अगोदर मूर्ती बनविण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. त्याकरिता पेण परिसरातले कारागीर बोलावले जातात. मागील अनेक वर्षांपासून पेणच्या विविध भागांतील मूर्ती कारागीर नवी मुंबई, मुंबई, ठाणे परिसरातील मूर्ती कारखान्यांमध्ये कामासाठी येत असतात, परंतु मागील तीन महिन्यांपासून मुंबईसह नवी मुंबई व ठाण्यामध्ये कोरोना मोठ्या प्रमाणात फैलावत आहे. मूर्तिकारांनी या शहरांकडे पाठ फिरवली आहे. याचा परिणाम नवी मुंबईतील सुमारे १३० तर पनवेल परिसरातील सुमारे ७० कारखानदारांवर झाला आहे.
लॉकडाऊनमुळे मागील तीन महिने मूर्ती बनविण्याचे सर्व कारखाने बंद होते. नुकतेच अनलॉकच्या पहिल्या टप्प्यात सूट मिळाल्यानंतर हे कारखाने सुरू झाले आहेत, परंतु उत्सवाला अवघे दोन महिने शिल्लक असल्याने, उपलब्ध कालावधीत मागणीइतका मूर्तींचा पुरवठा करण्याचे मोठे आव्हान आहे.
नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गतवर्षी साधारण २५ हजार घरगुती, तर ५०० सार्वजनिक मूर्तींची स्थापना झाली होती, तर पनवेल परिसरात साधारण ३७ हजार घरगुती व ३२० सार्वजनिक मूर्तींची स्थापना झाली होती. त्यानुसार, नवी मुंबईसह पनवेलमधून यंदाही गणेशभक्तांकडून तेवढ्याच मूर्तींची मागणी आहे. तशा प्रकारे नियमित मूर्तिकारांकडे बुकिंगही येऊ लागल्या आहेत, परंतु उपलब्ध अल्प कालावधी व कारागिरांची कमतरता, यामुळे मागणीप्रमाणे
मूर्तींची निर्मिती करण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. परिणामी, यंदा प्रथमच मूर्तींचा तुटवडा भासणार
आहे.
>सार्वजनिक मंडळांना आवाहन
सार्वजनिक मंडळांकडून होणाऱ्या मागणीनुसार ६ पेक्षा जास्त फूट उंचीच्या मूर्ती पेणमधून मागविल्या जातात, परंतु यंदा पेणमध्येही उंच मूर्ती निर्मितीला अडचणी असल्याने, सार्वजनिक मंडळांनी ५ फुटांच्या आतीलच मूर्तींची स्थापना करावी, असे आवाहन श्री गणेश मूर्तिकार संघटनेने केले आहे.
>लॉकडाऊनमध्ये बंद असलेले गणेशमूर्तींचे कारखाने नुकतेच सुरू झाले आहेत, परंतु गणेशोत्सव अवघ्या दोन महिन्यांवर आला आहे. त्यातच कोरोनाच्या भीतीमुळे मूर्ती कारागीर मिळत नसल्याने, उपलब्ध कालावधीमध्ये मागणीप्रमाणे मूर्ती बनविणे शक्य नसल्याने मूर्तींचा तुटवडा भासणार आहे.
- संतोष चौलकर, अध्यक्ष, श्री गणेश मूर्तिकार संघटना,
नवी मुंबई.
>दरवर्षीप्रमाणे यंदाही घरगुती गणेशमूर्तींची मागणी आहे, परंतु वेळेची कमतरता व मूर्तिकारांची कमी, यामुळे निर्मिती निम्म्यापर्यंत घटणार आहे. याचा परिणाम मूर्तींच्या पुरवठ्यावर, तसेच मूर्तिकारांच्या उत्पन्नावरही होणार आहे.
- मनीष म्हात्रे, मूर्ती कारखानदार, कोपर खैरणे.

Web Title: There will be a shortage of Ganesh idols this year

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.