In Thane, Maval the voice of Shivsena | ठाणे, मावळमध्ये आवाज शिवसेनेचाच
ठाणे, मावळमध्ये आवाज शिवसेनेचाच

- नारायण जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : जिल्ह्यातील लोकसभेच्या ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदारसंघांवर शिवसेना-भाजप-रिपाइं महायुतीने अपेक्षेप्रमाणे वर्चस्व कायम राखले आहे. पक्ष कार्यकर्त्यांचे मजबूत जाळे अन् नरेंद्र मोदीलाटेची लाभलेली जोड यामुळे प्रतिस्पर्धी काँगे्रस-राष्ट्रवादी महाआघाडीच्या उमेदवारांचा २०१४ पेक्षा जास्त मतांनी दणदणीत पराभव झाला. मतदारांनी उमेदवारांपेक्षा प्रखर राष्ट्रवादावर स्वार झालेल्या नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान करण्यासाठी युतीच्या पारड्यात मत टाकल्याचे निकालावरून दिसत आहे. बहुजन वंचित आघाडीने महाआघाडीच्या उमेदवारांना अपशकून केला, असे म्हणण्यास वाव नाही.

ठाण्यात शिवसेनेचे राजन विचारे यांनी राष्ट्रवादीच्या आनंद परांजपे यांचा चार लाखांहून अधिक मतांनी, कल्याणमध्ये शिवसेनेचे श्रीकांत शिंदे यांनी राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांचा साडेतीन लाखांहून अधिक मतांनी, तर भिवंडीतून भाजपचे कपिल पाटील यांनी काँगे्रसच्या सुरेश टावरे यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी पराभव करून विरोधकांचे अंदाज ठाणे खाडीत बुडवले आहेत. राज ठाकरे यांचा करिष्मा जिल्ह्यात कुठेच चालला नसल्याचे निवडणूक निकालावरून दिसत आहे.


या निकालांनी आगामी विधानसभा निवडणुकीत बेलापूर, ऐरोली, कळवा-मुंब्रा, शहापूर या राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यांना भगदाड पडण्याची भीती निर्माण झाल्याने तेथील विद्यमान आमदार संदीप नाईक, जितेंद्र आव्हाड, पांडुरंग बरोरांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्ह्यातील सर्वेसर्वा माजी मंत्री गणेश नाईक यांची चिंता वाढवली आहे.


ठाणे मतदारसंघात सुरुवातीपासून राष्ट्रवादीला उमेदवार मिळत नव्हता. गणेश नाईक आणि त्यांचे पुत्र संजीव नाईक यांनी शरद पवार यांच्या आग्रहानंतरही रिंंगणातून माघार घेतली. यामुळे शिवसेना-भाजप युतीने सोशल मीडियावरून विरोधकांना उमेदवारच मिळत नसल्याचा जोरदार प्रचार केला. राजन विचारे यांनी उमेदवारी जाहीर होण्याआधीच आपला प्रचार सुरू केला होता. त्यांच्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी पूर्ण झाल्यानंतर राष्ट्रवादीने ठाणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष आनंद परांजपे यांची उमेदवारी जाहीर केली. स्वत: गणेश नाईक यांनीच त्यांच्या प्रचाराची धुरा आपल्या खांद्यावर घेतली. नवी मुंबई, मीरा-भार्इंदरमध्ये नाईकांनी जोरदार जोर लावला.

भार्इंदरमध्ये त्यांना काँगे्रसच्या मुझफ्फर हुसेन यांची चांगली साथ मिळाली. परांजपे यांनी सोशल मीडियासह जोरदार प्रचार सुरू केला.
उमेदवाराचे शिक्षण, गुन्हेगारी पार्श्वभूमी या मुुद्द्यांचा त्यांनी खुबीने प्रचार केला. त्याचा त्यांना प्रचारात फायदा दिसत होता. मात्र, ठाणे शहरातील नाईक-आव्हाड गटांतील दुफळी आणि संघटनात्मकदृष्ट्या कमजोर बांधणी, याचा त्यांना फटका बसला. भाजपच्या नगरसेवकांनी प्रारंभी विचारे यांना असहकार पुकारला होता. मात्र ठाणे, नवी मुंबईतील शिवसैनिकांनी घेतलेली मेहनत, पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचे ठाणे शहरावरील वर्चस्व आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा त्यांच्या मदतीला धावून आल्याने विचारे हे दणदणीत मतांनी विजयी झाले.

भ्रष्टाचाराचा पैसा, घराणेशाहीला नाकारलं
पिंपरी :मावळची निवडणूक ही जनतेने हातात घेतली होती. राष्टÑवादीचे नेते अजित पवार यांचा भ्रष्टाचाराचा पैसा आणि घराणेशाहीला मतदारांनी नाकारले आहे, असे खासदार श्रीरंग बारणे यांनी सांगितले. विजयी झाल्यानंतर बारणे यांच्याशी साधलेला हा संवाद.
प्रश्न : निवडणूक निकालाचे विश्लेषण काय?
उत्तर : निकाल हा जनतेने दिलेला कौल आहे. भ्रष्टाचाराविरोधात, घराणेशाहीपेक्षा विकासाला मत दिले आहे. भाजपा आणि शिवसेनेच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाचे चीज झाले आहे. मी सामान्य कार्यकर्ता आणि आमच्या कुटुंबात कोणी खासदार, आमदार नाही. कामाच्या जोरावर मला यश मिळाले. त्यात सर्वांची साथ लाभली.
पवार घराण्याविरोधात लढताना दडपण होते का?
मला कोणतेही दडपण नव्हते. दडपण होते ते अजित पवार यांना. पवार यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीत जेवढे फोन केले नसतील, तेवढे या वेळी केले होते. हा पार्थ यांचा पराभव नसून, अजित पवार यांचा पराभव आहे. जनतेने पवारांना त्यांची जागा दाखविली आहे. घराणेशाही नाकारली आहे.
यश आणि मताधिक्य अपेक्षित होते?
दोन लाख मतांनी विजयी होऊ असा आत्मविश्वास होता. कारण मावळच्या जनतेला लादलेला उमेदवार नको होता. महापालिकेत गेल्या काही वर्षांपासून राष्टÑवादीचा भ्रष्टाचार पिंपरी-चिंचवडकरांनी पाहिला होता. भ्रष्टाचाराचा पैसा घेऊन राष्टÑवादी मतदारसंघात उतरली होती. भ्रष्टाचाराच्या पैशाला जनतेने नाकारले आहे.


अपूर्ण प्रकल्प पूर्ण करणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे :ठाणे मतदारसंघात विद्यमान खासदार राजन विचारे यांच्या बाजूने मतदारांनी पुन्हा एकदा कौल दिला आहे. तब्बल ४,०८,८४३ मतांनी विजयी झाल्यावर साधलेला संवाद
प्रश्न : निवडणूक निकालाचे विश्लेषण काय?
उत्तर : मागील पाच वर्षांत जी विकासकामे केलेली आहेत, त्यांची पोचपावती मतदारांनी दिलेली आहे. त्यामुळे पुढील पाच वर्षांत जनतेचा विश्वास संपादन करून त्यांच्या विश्वासाला कोणत्याही स्वरूपाचा तडा न जाऊ देता, विकासकामे करणार आहे. यामध्ये ठाण्यासह नवी मुंबई आणि मीरा-भार्इंदरमध्ये जे काही प्रकल्प मंजूर झाले आहेत किंवा जे काही प्रकल्प सुरूहोणार आहेत, ते पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करणार आहे.
रखडलेले प्रकल्प मार्गी लागल्याचा फायदा झाला का?
केंद्रात मोदी सरकार, राज्य सरकारच्या माध्यमातून आणि ठाणे, मीरा-भार्इंदर आणि नवी मुंबई महापालिकांच्या माध्यमातून जी काही विकासकामे करायची आहेत, ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करत आहे. सीआरझेडचा प्रश्न मागील कित्येक वर्षे प्रलंबित आहे, तो सोडवला जाईल. ठाण्यातील प्रस्तावित नवीन रेल्वेस्टेशन, पूर्वेतील सॅटीस, कोपरी पुलाचे रखडलेले काम, मेट्रोचे काम आदींसह इतर महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार आहे. शिवाय, नवी मुंबईतील एलिव्हेटेड प्रकल्प असतील किंवा जे काही इतर प्रकल्प असतील, ते मार्गी लावले जाणार आहेत. पक्षाबरोबरच, जनतेचे जो काही विश्वास दाखवून पुन्हा उमेदवारी दिली, त्यांच्या विश्वासाला कुठेही तडा जाऊ देणार नाही.

मोदींच्या सुप्त लाटेने श्रीरंग बारणे विजयी
हणमंत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क ।
पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव करीत शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दणदणीत विजय मिळविला. मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संपर्क व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुप्त लाटेने सुमारे दीड लाखांचे मताधिक्य घेत गड राखला.
मावळ लोकसभा मतदारसंघाची भौगोलिक रचना घाटावरील पिंपरी, चिंचवड व मावळ विधानसभा मतदारसंघ, तसेच घाटाखालील कर्जत, उरण व पनवेल असे सहा मतदारसंघाची आहे. यामध्ये शहरी आणि ग्रामीण असा दोन्ही प्रकारचा मतदार आहे. मावळचा गड राखण्यासाठी अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना रिंगणात उतरविण्याचा मनोदय व्यक्त केला. त्यामुळे ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे.
महाराष्ट्रातील तीन टप्प्यातील निवडणुका झाल्यानंतर राज्यभरातून अजित पवार समर्थक राष्ट्रवादीचे आजी-माजी मंत्री, आमदार हे मावळ मतदारसंघात शेवटच्या टप्प्यात कार्यरत झाले होते. राष्ट्रवादीने मावळात मोठी ताकद लावली होती. उमेदवार नवखा असल्याचा फायदा विरोधी उमेदवार असलेल्या श्रीरंग बारणे यांना झाला.
गेल्या पाच वर्षांतील बारणे यांचा मतदारसंघातील कार्यकर्त्यांशी वैयक्तिक संपर्क होता. तसेच, त्यांनी थेट मतदारांना नरेंद्र मोदींना पंतप्रधान करण्यासाठी निवडून देण्याचे भावनिक आवाहन मतदारांना केले. मावळ लोकसभेतील स्थानिक उमेदवार असल्याने सर्व विधानसभेत त्यांचा चांगला संपर्क होता. शिवाय स्वच्छ प्रतिमा आणि त्यांच्याविरोधात कोणताही नकारात्मक मुद्दा नसल्याने मतदारांनी त्यांना कौल दिल्याचे निकालावरून दिसून येत आहे. निकालाच्या पहिल्या फेरीपासून बारणे यांना सर्वच विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळत गेले. राष्ट्रवादीची शेतकरी कामगार पक्षाशी युती असल्याने कर्जत, उरण व पनवेल मतदारसंघातून पार्थ पवार यांना मताधिक्य मिळण्याची आशा होती. मात्र, या तिन्ही ठिकाणी बारणे यांना मताधिक्य मिळाले.


पवार यांच्या तिसऱ्या पिढीला नाकारले
आताचा मावळ लोकसभा मतदारसंघ पूर्वीच्या खेड व बारामती मतदारसंघाला जोडलेला होता. त्या वेळी बारामती लोकसभा मतदारसंघात असलेल्या पिंपरी-चिंचवडचे नेतृत्त्व राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, दुसºया पिढीतील अजित पवार यांनी केले आहे. दरम्यान, २००९ मध्ये मतदारसंघाची पुनर्रचना झाल्यानंतर स्वतंत्र मावळ लोकसभा मतदारसंघ तयार झाला.
मतदारसंघाच्या पुनर्रचनेनंतर २००९ व २०१४ या दोन निवडणुकांमध्ये शिवसेनेचे उमेदवार गजानन बाबर व श्रीरंग बारणे हे खासदार झाले. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत शिवसेनेचा गड रोखण्यासाठी अजित पवार यांनी मुलगा पार्थ पवार यांना थेट निवडणूक रिंगणात उतरविले. मात्र, पिंपरी-चिंचवडच्या मतदारांनी पवार यांच्या तिसºया पिढीला निवडणुकीत नाकारल्याचे दिसत आहे.
 

ज्या ज्या मतदारांनी मला मतदान केले, त्या सर्वांचे मी आभार मानतो. दरम्यान, आमच्याकडून काही त्रुटी राहिल्या असतील तर त्या भविष्यात सुधारण्याचा प्रयत्न करेन. मोदी सरकारला जनतेने स्वीकारले आहे. निवडून आलेल्या सगळ्या उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करतो.
- पार्थ पवार

 

Web Title: In Thane, Maval the voice of Shivsena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.