Terrorist activities growing in Panvel | पनवेलमध्ये वाढताहेत दहशतवादी कारवाया
पनवेलमध्ये वाढताहेत दहशतवादी कारवाया

- वैभव गायकर 

पनवेल : कळंबोलीत बॉम्ब सापडल्याने पनवेल परिसरात खळबळ उडाली आहे. येथील शाळेतील सुरक्षारक्षकांच्या सतर्कतेमुळे ही घटना निदर्शनास आल्याने अनुचित प्रकार टळला. मात्र, पनवेल शहराची मेट्रो सिटीकडे होणारी वाटचाल लक्षात घेता, नजीकच्या काळात दहशतवादी कारवाया वाढत चालल्याचे दिसून येत आहे.

फेब्रुवारी महिन्यात पनवेल तालुक्यातील आपटा याठिकाणी जिवंत आयईडी बॉम्ब सापडल्यावर संपूर्ण देशाचे लक्ष या घटनेकडे लागले होते. कर्जत-आपटा या बसमध्ये हे बॉम्ब सापडले होते. त्यानंतर कळंबोलीमधील हा प्रकार लक्षात घेता दहशतवादी पनवेल परिसरात सक्रिय तर नाहीत ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

इसिसच्या दहशतवाद्यांनी तीन ते चार वर्षांपूर्वी कर्नाळा परिसराची रेकी केली होती. दहशतवाद्यांना कर्नाळा परिसरात त्यांचे ट्रेनिंग कॅम्प बनवायचे होते असा याच्यामागे तर्क-वितर्क लावला जात होता. सध्या पनवेल शहराचा झपाट्याने विकास होत असून आंतराष्ट्रीय विमानतळ, विकासाची अनेक कामे, रेल्वेचा विस्तार, मेट्रो, अनेक मोठमोठे गृहप्रकल्प या ठिकाणी उभे राहत आहेत. त्यामुळे रोजगाराच्या संधीही निर्माण झाल्या आहेत. या संधी लक्षात घेता देशभरातील नागरिक या परिसरात स्थायिक होत आहेत.

कळंबोलीत सापडलेला बॉम्ब सुधागड शाळेच्या परिसरात आढळला असून सर्वच तपास यंत्रणांकडून शोध सुरू आहे. पनवेल शिक्षणाचे माहेरघर म्हणून नव्याने उदयास येत आहे. तालुक्यात मोठ्या शिक्षण संस्था कार्यरत आहेत. खासगी शाळांची संख्या मोठी आहे. त्यातच एखाद्या शाळेच्या आवारात बॉम्बसदृश वस्तू सापडणे चिंताजनक आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत राज्याचे एटीएसचे प्रमुख देवेन भारती हे मंगळवारी कळंबोलीत दाखल झाले होते. त्यांनी संपूर्ण घटनेचा आढावा नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांच्याकडून घेतला.

पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात बांगलादेशी नागरिक वास्तव्यास आहेत. पोलिसांच्या वेळोवेळी कारवाईत हे बाब सिद्ध झाली आहे. अशा अनधिकृतरीत्या राहत असलेल्या बांगलादेशी नागरिकांवर आवर घालण्याची आवश्यकता आहे. भविष्यात पनवेलमधील लोकसंख्या आणखी वाढणार असून शहर प्रचंड व्यस्त होणार आहे. अशा परिस्थितीत शहराच्या जडणघडणीतच पोलीस प्रशासनाने सर्व बाबींवर बारकाईने लक्ष दिल्यास भविष्यातील धोका टाळता येईल.


Web Title: Terrorist activities growing in Panvel
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.