दहा हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 11:07 PM2019-11-14T23:07:40+5:302019-11-14T23:08:06+5:30

अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत.

Tens of thousands of investors cheat | दहा हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

दहा हजार गुंतवणूकदारांची फसवणूक

googlenewsNext

सूर्यकांत वाघमारे 
नवी मुंबई : अधिक नफ्याचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणाऱ्या मार्केटिंग कंपन्या शहरात मोठ्या संख्येने सक्रिय आहेत. त्यांच्याकडून दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. त्या माध्यमातून जवळपास ३३ कोटींचा अपहार झाला असून, अनेकांना अटकही करण्यात आली आहे.
झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी अनेकांकडून सोयीचे मार्ग निवडले जात आहेत. याचा फायदा घेऊन मल्टिलेवल मार्केटिंगच्या कंपन्यांनी सर्वत्र त्यांचे जाळे पसरवले आहे. त्यांनी नेमलेल्या एजंटकडून अधिक नफ्याचे आमिष दाखवून नागरिकांना गुंतवणुकीला भाग पाडले जात आहे. त्यानुसार अनेक जण अशा कंपन्यांमध्ये पाच ते दहा हजार रुपयांपासून ते लाखो रुपयांपर्यंतची गुंतवणूक केली जात आहे. तर गुंतवणूकदारांचा आकडा वाढवण्यासाठी कंपन्यांकडून सुरुवातीच्या गुंतवणूकदारांना काही प्रमाणात नफाही मिळवून दिला जातो. मात्र, गुंतवणूकदार वाढल्यानंतर जमा झालेले कोट्यवधी रुपये घेऊन कंपनीचालकांकडून पोबारा केला जात आहे. मुळात आरबीआयच्या नियमावलीनुसारच गुंतवणूक करून घेणे व नफा देणे बंधनकारक आहे. त्यानंतरही केवळ फसवणुकीच्या उद्देशाने कंपन्यांची स्थापना करून आरबीआयच्या नियमांची पायमल्ली करून पैशाची गुंतवणूक करून घेणाºया कंपन्या चालवल्या जात आहेत. अशा कंपन्यांकडून नवी मुंबईत मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अधिक गुंतवणूकदारांची फसवणूक झाली आहे. पोलिसांच्या नोंदीनुसार त्यांची ३३ कोटी रुपयांहून अधिक रकमेची फसवणूक झाली आहे. त्यामध्ये राईस पुलर, शक्ती मल्टिपर्पज सोसायटी, एम. पिक्चर्स व कॅपिटल क्लब अशा कंपन्यांचा समावेश आहे. त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल असून या कंपन्यांच्या प्रमुख व्यक्तींसह दलालांनाही अटक करण्यात आलेली आहे.
भाड्याची कार्यालये घेऊन आलिशान कार्यालय थाटल्यानंतर त्या ठिकाणी नागरिकांना भुरळ घालणारे सेमिनार घेतले जातात. त्यामध्ये थोड्या फार रकमेच्या गुंतवणुकीवर जास्तीत जास्त नफा मिळवून देण्याची फसवी आमिषे दाखवली जातात. त्याशिवाय सोन्याचे सिक्के, कार व इतर वस्तू भेट स्वरूपात देण्याचेही आमिष दाखवले जाते. हे पाहून सर्वसामान्य व्यक्तीचे डोळे दीपत असल्याने, त्यांच्याकडून झटपट श्रीमंतीच्या मोहापोटी लाखो रुपयांची गुंतवणूक केली जात आहे. अशा कंपन्यांकडून फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांच्याकडून पोलिसांकडे धाव घेतली जाते. मात्र, तोपर्यंत संबंधितांनी जमा रकमेचा अपहार करून पळ काढलेला असतो. यामुळे अनेकांपर्यंत पोहोचण्यात पोलिसांनाही अपयश येत आहे.
मार्केटिंग कंपन्यांपाठोपाठ आभासी चलनाद्वारे गुंतवणूक करून घेणाºयाही कंपन्या शहरात धुमाकूळ घालत आहेत. अशा काही कंपन्यांच्या दलालांनाही यापूर्वी पोलिसांनी अटक केलेली आहे. इंटरनेटच्या माध्यमातून या कंपन्यांचा संपूर्ण व्यवहार व प्रचार होत आहे. तर हे जाळे चालवणाºया व्यक्ती परराज्यातून सूत्रे हाताळत असतात, यामुळे त्यांच्यापर्यंत पोलीस पोहोचू शकलेले नाहीत.
>पोलिसांच्या आवाहनाकडेही दुर्लक्ष
जादा नफ्याचे आमिष दाखवणाºया तसेच इतर बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक न करण्याचे आवाहन पोलिसांकडून मागील अनेक वर्षांपासून सातत्याने केले जात आहे. त्यानंतरही दलालांकडून दिली जाणारी हमी व अधिक नफ्याचे आश्वासन याला अनेक जण बळी पडत आहेत. त्यामुळे मागील दहा महिन्यांत दहा हजारांहून अनेकांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांची ३३ कोटींहून अधिक रकमेची फसवणूक झालेली आहे.
>झटपट श्रीमंतीचा मोह पडतोय महागात
सध्याच्या स्पर्धेच्या काळात अनेकांकडून एक दुसऱ्यांच्या आर्थिक परिस्थितीशीही स्पर्धा केली जात आहे. त्यामुळे इतरांप्रमाणेच आपणही श्रीमंत व्हावे, या उद्देशाने कमी कालावधीत जादा नफा देणाºया कंपन्यांमधून गुंतवणूक करण्यावर भर दिला जात आहे; परंतु अशा कंपन्यांच्या व्यवहाराला कोणताही कायदेशीर आधार नसल्याने ठरावीक कालावधीनंतर गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचे समोर येत आहे.
>नागरिकांनी कष्टाचा पैसा गुंतवणूक करण्यासाठी अधिकृत मार्गाचाच वापर केला पाहिजे; परंतु फसव्या कंपन्यांच्या आमिषाला बळी पडून अनेक जण वेगवेगळ्या बेकायदेशीर कंपन्यांमध्ये गुंतवणूक करत आहेत. त्यांची फसवणूक झाल्यानंतर पोलिसांकडे धाव घेतली जाते. त्यानुसार अनेक कंपन्यांविरोधात गुन्हा दाखल करून संबंधितांवर कारवाईही केलेली आहे; परंतु नागरिकांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडता, योग्य पडताळणी करूनच पैशाची गुंतवणूक केली पाहिजे.
- प्रवीणकुमार पाटील,
पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा.

Web Title: Tens of thousands of investors cheat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.