माथाडी चळवळीतील गुंडशाही थांबवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 11:35 PM2020-09-25T23:35:38+5:302020-09-25T23:36:06+5:30

कामगार नेत्यांची मागणी : मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेत्यांचे कारवाईचे आश्वासन; अण्णासाहेब पाटील यांच्या ८७व्या जयंतीनिमत्त कार्यक्रम

Stop the gang war in the Mathadi movement | माथाडी चळवळीतील गुंडशाही थांबवा

माथाडी चळवळीतील गुंडशाही थांबवा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : माथाडी चळवळीमध्ये गुंडांचा शिरकाव झाला आहे. संघटनांचे पदाधिकारीच ठेकेदारी करू लागले आहेत. ठेकेदारी व गुंडशाही खपवून घेतली जाणार नाही. पोलिसांना नावे देऊनही चळवळ बदनाम करणाऱ्यांवर कारवाई होत नाही. आवाज उठविल्यामुळे गुंडांकडून माझाच घातपात केला जाण्याची शक्यता असली, तरीही आम्ही त्यांना घाबरत नाही, असे मत माथाडी नेते नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले आहे.


महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनचे संस्थापक अण्णासाहेब पाटील यांच्या ८७व्या जयंतीनिमत्त माथाडी भवनमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या मेळाव्यास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी चित्रफितीच्या माध्यमातून व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून मार्गदर्शन केले. संघटनेचे सरचिटणीस नरेंद्र पाटील यांनी कामगारांच्या प्रश्नांवर उपस्थितांचे लक्ष वेधले.


एका वखारीत कामगारांची नोंदणी करायची व इतर ठिकाणी नोंदणी न करता स्वत:च ठेकेदार बनायचे, असे उद्योग सुरू आहेत. माथाडी बोर्डाच्या बैठकांना काही गुंड उपस्थित असल्याचेही निदर्शनास आले आहे. या गुुंडांच्या विरोधात नावासह पोलीस स्टेशनमध्ये तक्रारी करण्यात आल्या आहेत, परंतु संबंधितांवर काहीही कारवाई करण्यात आलेली नाही. चळवळीमधील गुंडगिरी व ठेकेदारी संपली पाहिजे. गुंडांपासून कामगारांचे रक्षण करण्याची गरज आहे. ठेकेदारी प्रवृत्तीच्या नेत्यांपासून सावध राहण्याची गरज आहे. ठेकेदारी संपुष्टात आणली पाहिजे. या गुंडशाहीच्या विरोधात आम्ही आवाज उठवित असताना, माझाच कार्यक्रम वाजण्याची शक्यता असल्याचे मतही नरेंद्र पाटील यांनी व्यक्त केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीही माथाडी चळवळ टिकविण्यासाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले व गुंडांचा बंदोबस्त करण्याचे आश्वासन दिले आहे.
माथाडी संघटनेचे नेते शशिकांत शिंदे यांनीही मेळाव्यात चळवळीसमोरील आव्हानांवर लक्ष वेधले. एपीएमसीचे व माथाडी चळवळीचे अस्तित्व टिकले पाहिजे. केंद्र सरकारच्या नवीन कायद्यामुळे भांडवलशाही वाढण्याची भीती आहे. नवीन कायद्याच्या आडून चोरीचा व्यापार करणाऱ्यांवर आळा घालण्याची गरज आहे. माथाडी बोर्डामधील काही अधिकारी मुजोर झाले आहेत. कामगारांचे प्रश्न सुटत नाहीत. येणाºया काळात माथाडी एकीने चळवळ जिवंत ठेवण्याचा प्रयत्न करू, असे मतही त्यांनी व्यक्त केले. गुलाबराव जगताप यांनीही माथाडी चळवळीमध्ये चुकीच्या प्रवृत्तीचा शिरकाव झाला असल्याकडे लक्ष वेधले.


चुकीचे काम करणाºयांमुळे कष्टकरी कामगार उद्ध्वस्त होण्याची शक्यता निर्माण झाली असल्याचे मत व्यक्त केले. मेळाव्यामध्ये सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, माजी मंत्री गणेश नाईक, आमदार प्रसाद लाड, माथाडी संघटनेचे अध्यक्ष एकनाथ जाधव, मुंबई कृषी उत्पन्न बाजारसमितीचे अध्यक्ष अशोक डक, धनंजय वाडकर,चंद्रकांत पाटील, ऋषिकांत शिंदे, रविकांत पाटील व इतर मान्यवर उपस्थित होते.

रुग्णालयासाठीही सहकार्य हवे
माथाडी कामगारांसाठी कोपरखैरणेमध्ये स्वतंत्र रुग्णालय आहे. कोरोना झालेल्या रुग्णांवरही येथे उपचार केले जात असून, आतापर्यंत ५००पेक्षा जास्त रुग्णांनी येथे उपचार घेतले आहेत. लॉकडाऊनमुळे व्यवसाय बंद असल्यामुळे कामगारांची लेव्ही उपलब्ध झालेली नाही. शासनाने रुग्णालयासाठी दहा कोटींच्या मदतीची मागणी करण्यात आली.


‘माथाडी भूषण’ पुरस्कारांचे वितरण
यावेळी ‘माथाडी भूषण’ पुरस्कारांचेही वितरण करण्यात आले. तानाजी चिकणे, लक्ष्मण कोंडीबा कदम, बाळू महादेव गाढवे, महादेव बाबा काळे, दिलीप काशिनाथ चोरमले, विठोबा बाबुराव जाधव, राजाराम बबन हसबे, अशोक सोपान बागल यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

Web Title: Stop the gang war in the Mathadi movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.