शहरातील खड्ड्यांचे स्थायीत पडसाद; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 11:42 PM2019-09-09T23:42:17+5:302019-09-09T23:42:36+5:30

प्रशासन कायमस्वरूपी तोडगा काढत नसल्याचा आरोप; नागरिकांमध्येही नाराजी

Settlements in the city pits; Officers caught on edge | शहरातील खड्ड्यांचे स्थायीत पडसाद; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

शहरातील खड्ड्यांचे स्थायीत पडसाद; अधिकाऱ्यांना धरले धारेवर

Next

नवी मुंबई : शहरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत लोकमतमध्ये सोमवारी वृत्त प्रसिद्ध होताच स्थायी समिती सभेतही त्याचे पडसाद उमटले. लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांना धारेवर धरत प्रशासनाला खड्डे बुजविण्यात अपयश आल्याचा आरोप यावेळी केला.

स्मार्ट सिटी म्हणून ओळख असलेल्या नवी मुंबई शहरातून जाणारे महामार्गा, मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते मोठ्या प्रमाणात खड्डेमय झाले आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालविताना कसरत करावी लागत असून वाहने खड्ड्यातून उसळत असल्याने पाठदुखी, मणक्याच्या आजार वाढू लागल्या आहेत. रस्त्यांच्या दुरवस्थेवर महापालिका प्रशासनाकडून कायमस्वरुपी तोडग काढण्यात येत नसल्याने नागरिक आणि वाहनचालकांना कमालीचे त्रस्त आहेत.

स्थायी समिती सभेत सभागृह नेते रवींद्र इथापे यांनी सोमवारी लोकमतमध्ये प्रसिध्द झालेल्या बातमीची दखल घेत चर्चा केली. नवी मुंबई शहरातील एपीएमसी मार्केट, माथाडी भवन चौक, अशा अनेक ठिकाणी १00 मिलीमीटर पाऊस झाला तरी पाणी तुंबते, पाणी निचºयाची व्यवस्था याठिकाणी करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.

एमआयडीसीतील रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून त्यांच्या दुरुस्तीचे आदेश मागील सभेत सभापतींनी प्रशासनाला दिले होते, परंतु प्रशासन याकडे दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप नगरसेवक बहादूर बिस्ट यांनी केला. शहरातील अनेक प्रभागातील रस्त्यांची दुरवस्था झाली असून रस्त्यांची वार्षिक देखभाल दुरु स्ती करण्याचे कंत्राट दिलेल्या कंत्राटदाराकडून काम होत नसल्याचा आरोप नगरसेविका सरोज पाटील यांनी केला. तर नगरसेवक डॉ. जयाजी नाथ यांनी सीबीडी चौकात याच वर्षी मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांची दुरु स्ती करण्याची मागणी केली. नगरसेवक ज्ञानेश्वर सुतार यांनी जुईनगर रेल्वे स्थानकाकडे जाणाºया मार्गावरील नैसर्गिक नाल्यांची रु ंदी कमी केल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी साचत असल्याचे यावेळी लक्षात आणून दिले.

1) मुख्य तसेच वसाहतीअंतर्गत रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे नवी मुंबईकर त्रस्त झाले आहेत. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूककोंडी होत असून पाणी साचल्याने अपघाताच्या घटना घडत आहेत. पावसाळ्यापूवी शहरातील रस्त्यांची डागडुजी केली असली तरी अल्पावधीतच अवस्था जैसे थे झाल्याने कामाच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. सायन-पनवेल मार्गावर तसेच शहरातील प्रत्येक नोडमधील रस्त्यांवर खड्डे पडल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. या खड्ड्यांमध्ये पावसाचे पाणी साचून खड्ड्यांची व्याप्ती वाढतच चालली आहे. याचा सर्वाधिक त्रास सदर मार्गाने प्रवास करणाºया प्रवाशांसह वाहन चालकांना सहन करावा लागत आहे. तर खड्ड्यांमुळे त्याठिकाणी वाहनांची गती मंदावत असल्याने वाहतूककोंडीचीही डोकेदुखी वाढत चालली आहे. खड्ड्यामध्ये साचलेल्या पाण्यामुळे तो नजरेस न पडल्याने दुचाकीस्वारांच्या छोट्या-मोठ्या अपघातांच्याही घटना घडत आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.

2) वाशी-कोपरखैरणे मार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. ब्ल्यू डायमंड चौक, नाल्यावरील पूल तसेच वाशी प्लाझा येथील पुलाखाली मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. तर कोपरखैरणे रेल्वेस्थानकालगत भुयारी मार्गातला संपूर्ण रस्ताच उखडला आहे. जास्त पाऊस पडल्यास त्याठिकाणी पाणी साचून रस्त्याची चाळण झाली आहे. अशातच त्याठिकाणी मोठमोठी खडी व पेव्हर ब्लॉकचे तुकडे टाकण्यात आले आहेत. यामुळे त्याठिकाणचे खड्डे आणि सर्वत्र पसरलेले खडी यातून वाहन चालवताना चालकांना कसरत करावी लागते तर दुचाकीस्वारांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. सायन-पनवेल मार्गावर वाशीतील पूल तसेच वाशी गाव, शिरवणे पूल, उरण फाटा येथे पडलेल्या खड्ड्यांमुळेही प्रवासी त्रस्त आहेत. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच सायन-पनवेल मार्गासह प्रत्येक नोडमधील रस्त्यांच्या दुरुस्तीची कामे करण्यात आली आहेत. यानंतरही त्यावर पडत असलेल्या खड्ड्यांमुळे कामांच्या दर्जाबाबत संशय व्यक्त होत आहे.पहिल्याच पावसात पडणाºया खड्ड्यांमुळे रस्त्याची चाळण झाल्याचे चित्र आहे. पावसाची संततधार सुरूच असल्याने रस्ते उखडण्याची कारणे अधिकारीवर्ग देत आहेत.

गणेश विसर्जनापूर्वी करा रस्त्यांची दुरुस्ती
शहरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांची कसरत होत आहे. ऐन गणेशोत्सवात रस्ते शरपंजरी झाल्याने गणेशोत्सव मंडळांसह भाविकांच्या उत्साहावर पाणी फेरले गेले आहे. यासंदर्भात लोकमतमध्ये सोमवारी प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची गंभीर दखल घेत महापालिका आयुक्तांनी शहरातील सर्व रस्ते गणेश विसर्जनापूर्वी दुरुस्त करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच या कामात हलगर्जीपणा करणारे ठेकेदार आणि संबंधित कंत्राटदारांवर कारवाईचे संकेत दिले आहेत.

नवी मुंबईतील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरातील खड्डेमय रस्त्यांचा सविस्तर आढावा घेणारे वृत्त लोकमत हॅलो नवी मुंबईत प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी गंभीर दखल घेतली आहे. अनंत चतुर्दशीला सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या श्रींच्या मोठ्या आकाराच्या मूर्तींचे विसर्जन केले जाते. खड्ड्यांमुळे या मूर्तींना नुकसान पोहचण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे विसर्जनापूर्वी रस्त्यांवरील खड्डे बुजविण्याचे काम युद्धपातळीवर करावे, असे निर्देश आयुक्तांनी संबंधित विभागाला दिले आहेत.

नवी मुंबई शहर खड्डेमुक्त करण्याच्या दृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न आहेत. मागील दहा दिवसांत अविरत कोसळणाºया पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. पावसाने उसंत घेताच खड्डे बुजविण्यात आले. मात्र पावसामुळे ते पुन्हा उखडले आहेत. परंतु नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, तसेच गणेश विसर्जनापर्यंत चांगल्या प्रतिचे साहित्य व तंत्रज्ञान वापरून खड्डे बुजवावेत, असे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. दरम्यान, या कामात हयगय करणारे ठेकेदार आणि संबंधित विभागाच्या अभियंत्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असे संकेत सुद्धा आयुक्तांनी दिले आहेत.

Web Title: Settlements in the city pits; Officers caught on edge

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.