पुलांच्या दुरुस्तीचा वाहतुकीला फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2019 11:39 PM2019-11-17T23:39:11+5:302019-11-17T23:39:21+5:30

ठिकठिकाणी वाहतूककोंडी; वाहनचालकांची कसरत

Repair of bridges | पुलांच्या दुरुस्तीचा वाहतुकीला फटका

पुलांच्या दुरुस्तीचा वाहतुकीला फटका

Next

नवी मुंबई : सायन-पनवेल मार्गावर दोन ठिकाणी सुरू असलेल्या पुलांच्या दुरुस्तीकामाचा फटका वाहतुकीला बसत आहे. परिणामी, रहदारीच्या वेळेस वाहतूककोंडी वाढत असल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्याच्या प्रयत्नात वाहतूक पोलिसांवरील ताणही वाढत चालला आहे. अशातच ठाणे बेलापूर मार्गावरही रबाळे येथे रस्त्याच्या दुरुस्तीकामामुळे वाहतूक वळवण्यात आल्यानेही नोडअंतर्गतच्या रस्त्यावरील वर्दळ वाढली आहे.

सायन-पनवेल मार्गावरील वाशी खाडीपूल व सानपाडा पूल येथील एका लेनचे काम हाती घेण्यात आले आहे. वाशी खाडीपुलावर मुंबईकडे जाणाऱ्या लेनवर तर सानपाडा पुलावर पनवेलकडे जाणाºया लेनवर ही कामे सुरू आहेत. त्या ठिकाणी सातत्याने खड्डे पडून होणारे अपघात टाळण्यासाठी रस्त्याचे काँक्रीटीकरण केले जात आहे. त्याकरिता एकच लेन सुरू ठेवण्यात आलेली आहे. मात्र, मुंबई-पुणे मार्गावरील सायन-पनवेल हा महत्त्वाचा मार्ग असल्याने त्यावर सतत वाहनांची वर्दळ असते. सकाळ-संध्याकाळच्या वेळी त्यात अधिकच भर पडलेली असते. त्यामुळे दोन्ही पुलांच्या ठिकाणी सकाळ-संध्याकाळ मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत आहे. त्यात रुग्णवाहिकांसह इतर अत्यावश्यक सुविधांचीही वाहने अडकून पडत आहेत. तर सानपाडा येथील पुलावरील कामाला पर्याय म्हणून पुलाखालील रस्त्याने वाहने वळवली जात आहेत. तर पुलावरून एका लेनमध्येच वाहने सोडण्यात येत आहेत. याचा परिणाम सानपाडा पुलाखालील जंक्शनवरील वाहतुकीवर होत आहे. सदर एपीएमसी मार्केटला जोडणारा हा महत्त्वाचा चौक असल्याने अगोदरच त्या ठिकाणी सतत वाहतूककोंडी असते.

अशातच पुलावरील निम्मी वाहतूक पुलाखालून वळवली जात असल्याने तिथल्या कोंडीत अधिकच वाढ होताना दिसत आहे. यामुळे वाहनचालकांच्या पुढे जाण्याच्या घाईत त्यांच्यात वादही उद्भवत आहेत. यामुळे वाशी ते तुर्भे दरम्यानच्या सर्व जंक्शन व वाहतूककोंडी होणाºया ठिकाणी वाहतूक पोलिसांचा बंदोबस्त नेमण्यात आला आहे. अशातच सानपाडा पुलाखालील खासगी ट्रॅव्हल्सचे अवैध थांबे वाहतूककोंडीत अधिकच भर टाकत आहेत. यानंतरही कारवाईत होत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

यामुळे अगोदरच अरुंद असलेल्या रस्त्यांवर वाहनांची संख्या वाढल्याने नोड अंतर्गतच्या रस्त्यांवरही वाहतूककोंडी वाढत चालली आहे. एकाच वेळी दोन्ही महत्त्वाच्या मार्गांवर सुरू असलेल्या या दुरुस्तीकामांमुळे शहराच्या दोन्ही टोकाच्या मार्गावर वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे. याचा त्रास वाहनचालकांसह प्रवाशांना सहन करावा लागत आहे.

अंतर्गत वाहतूक विस्कळीत
ठाणे-बेलापूर मार्गावर रबाळे येथे ऐरोलीत प्रवेशाच्या मार्गावर रस्त्याचे दुरुस्तीकाम हाती घेण्यात आले आहे. याकरिता तिथली वाहतूक वळवण्यात आली आहे. परिणामी, ऐरोली मार्गे मुलुंडकडे जाणारी छोटी वाहने घणसोली, रबाळे, गोठीवली येथील अंतर्गतच्या मार्गाने जात आहेत.

Web Title: Repair of bridges

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.