कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे स्थलांतर होणार पडीक इमारतीत!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2020 02:17 AM2020-02-16T02:17:41+5:302020-02-16T02:17:48+5:30

डागडुजीचे काम सुरू । घणसोलीतील बंद पडलेली सिडकोची शाळा भाडेतत्त्वावर

Police station will be shifted to corner building | कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे स्थलांतर होणार पडीक इमारतीत!

कोपरखैरणे पोलीस ठाण्याचे स्थलांतर होणार पडीक इमारतीत!

googlenewsNext

नवी मुंबई : कोपरखैरणे पोलीस ठाण्याचा व्याप वाढला आहे, त्यामुळे पोलीस ठाण्याची सध्याची जागा अपुरी पडू लागली आहे. तसेच ही वास्तू पूर्णत: मोडकळीस आल्याने घणसोली येथील सिडकोच्या एका पडक्या इमारतीत पोलीस ठाण्याचा कारभार स्थलांतरित करण्यात येणार आहे. पोलीस विभागाकडून सध्या या जागेच्या डागडुजीचे काम हाती घेण्यात आले आहे.

कोपरखैरणे सेक्टर ६ येथील सिडकोच्या जीर्ण झालेल्या मार्केटच्या पहिल्या मजल्यावर सध्या पोलीस ठाण्याचा कारभार चालत आहे. कामकाजाच्या दृष्टीने ही जागा अत्यंत गैरसोयीची ठरली आहे. विशेष म्हणजे, कोपरखैरणे पोलीस ठाण्याच्या स्वतंत्र इमारतीचा प्रश्न मागील अनेक वर्षे रेंगाळला आहे. नवीन इमारत बांधून होईपर्यंत पोलीस ठाण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपात पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, असा प्रस्ताव पोलीस विभागाकडून सिडकोला देण्यात आला होता. त्यासाठी घणसोली येथील सेक्टर ४ मध्ये वापराविना पडून असलेली शाळेची इमारत पोलीस ठाण्यासाठी उपयुक्त असल्याचेही पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले होते, त्यानुसार सिडकोने या इमारतीतील काही भाग भाडेतत्त्वावर पोलीस ठाण्यासाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. या इमारतीचा भूखंड सिडकोने शाळेसाठी दिला होता. संबंधित संस्थाचालकाने नियम व अटींचे उल्लंघन केल्याने सिडकोने सदर भूखंड परत घेतला आहे. या प्रकरणी संस्थाचालकाने न्यायालयात दावा ठोकला असून, सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. असे असतानाही सिडकोने ही इमारत भाडेतत्त्वावर पोलीस ठाण्यासाठी देऊ केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. दरम्यान, नियमानुसार सिडकोने ही इमारत ताब्यात घेतली आहे. संबंधित शिक्षण संस्थेने न्यायालयात याचिका दाखल केली असली तरी त्यावर सुनावणी सुरू आहे. न्यायालयाने या प्रकरणी कोणतेही स्थगितीचे आदेश दिलेले नाहीत. या संबंधीच्या संपूर्ण कायदेविषयक बाबी तपासूनच ही इमारत पोलीस ठाण्याला भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय घेतल्याचे सिडकोच्या वसाहत विभागाचे व्यवस्थापक करण शिंदे यांनी स्पष्ट केले आहे.

पोलीस ठाण्याच्या उभारणीसाठी हालचाली
कोपरखैरणे पोलीस ठाण्यासाठी सिडकोने सेक्टर १९ येथील पेट्रोल पंपाच्या शेजारी भूखंड आरक्षित करून ठेवला आहे. विविध कारणांमुळे पोलीस ठाण्याची इमारत बांधण्याचा प्रश्न रेंगाळला आहे. मात्र, यासंदर्भात सिडकोने सकारात्मक पावले उचलायला सुरुवात केली आहे. पुढील दीड-दोन वर्षांत पोलीस ठाण्याची नवीन इमारत बांधून तयार होईल, असा विश्वास सिडकोच्या संबंधित विभागाकडून व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान, या भूखंडावर तात्पुरते शेड उभारून सध्या वाहतूक चौकी सुरू करण्यात आली आहे.
 

Web Title: Police station will be shifted to corner building

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.