बाहेरील रुग्णांचा नवी मुंबईवर भार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2021 12:41 AM2021-04-23T00:41:34+5:302021-04-23T00:41:42+5:30

स्थानिकांची होतेय परवड : राजकीय शिफारशीमुळे प्रशासन हतबल

Outpatient burden on Navi Mumbai | बाहेरील रुग्णांचा नवी मुंबईवर भार

बाहेरील रुग्णांचा नवी मुंबईवर भार

Next



कमलाकर कांबळे
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : नवी मुंबईतील खासगी व महापालिकेच्या रुग्णालयांत शहराबाहेरील रुग्णांचा अतिरिक्त भार वाढल्याने स्थानिक रुग्णांची परवड होताना दिसत आहे. मुंबई, ठाणे आणि पनवेल परिसरातील रुग्ण मोठ्या प्रमाणात नवी मुंबईतील विविध रुग्णालयांत उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे करदात्या नवी मुंबईकरांनाच बेडसह इतर आरोग्य सुविधांसाठी वणवण करावी लागत आहे.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने सर्वत्र हाहाकार माजविला आहे. ऑक्सिजन व व्हेंटिलेटर्स बेड‌्सची संख्या अपुरी पडू लागली आहे, तर ऑक्सिजन आणि आवश्यक औषधांचाही मोठ्या प्रमाणात तुटवडा निर्माण झाला आहे. बेड मिळविण्यासाठी नवी मुंबईकरांना कसरत करावी लागत आहे. विविध स्तरावर प्रयत्न करूनही वेळेत बेड उपलब्ध न झाल्याने अनेक रुग्णांना जीव गमवावा लागला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने दर्जेदार सुविधा उपलब्ध केल्या आहेत. विशेष म्हणजे महापालिकेकडे सध्या २३०० ऑक्सिजन बेड‌्स आहेत, तर ५०५ आयसीयू आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. सुमारे चार हजार साध्या खाटा आहेत. रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन येत्या काळात आवश्यकतेनुसार खाटांची संख्या वाढविण्याची तयारी महापालिकेने सुरू केली आहे. तसेच खासगी रुग्णालयांतसुद्धा मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन आणि व्हेंटिलेटर बेड आहेत. असे असतानाही नवी मुंबईकरांना बेड मिळविण्यासाठी मोठे श्रम करावे लागत आहेत. शेजारच्या शहरातील रुग्णांचे अतिक्रमण हे यामागचे कारण असल्याचा आरोप नवी मुंबईकर करू लागले आहेत.
निवडणुका रखडल्याने महापालिकेवर सध्या प्रशासकाची नियुक्ती करण्यात आली आहे. अभिजित बांगर हे महापालिकेचे आयुक्त व प्रशासक म्हणून काम पाहत आहेत. कोरोनाच्या महामारीत त्यांचे काम उल्लेखनीय ठरले आहे. त्यांच्या मार्फत राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनासुद्धा तितक्याच प्रभावी ठरताना दिसत आहेत. परंतु सत्ताधारी पक्षातील आमदार, खासदारांच्या दबावाखाली महापालिका प्रशासन काम करीत असल्याचा आरोप केला जात आहे. कारण शहराबाहेरील रुग्णांना नवी मुंबईत सर्रास बेड उपलब्ध करून दिले जात आहेत. महापालिकेच्याच नव्हे, तर खासगी रुग्णालयांतसुद्धा शेजारच्या शहरातील रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे पहावयास मिळते. त्यामुळे स्थानिक रुग्णांना बेड आणि इतर वैद्यकीय सुविधांसाठी भटकंती करावी लागत आहे. विशेष म्हणजे ऐरोलीचे आमदार गणेश नाईक यांनीसुद्धा यासंदर्भात प्रशासनाला खडे बोल सुनावले आहेत. नवी मुंबईतील ऑक्सिजनचा साठा परस्पर शेजारच्या शहरात वळविला जात असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे.

सोशल मीडियावर चर्चा
नवी मुंबई महापालिकेत सध्या लोकनियुक्त प्रतिनिधी नाहीत. त्यामुळे सत्ताधाऱ्यांची मनमानी सुरू आहे. महापालिका आयुक्त त्याला बळी पडत आहेत. परंतु हे अधिक काळ चालणार नाही. नवी मुंबईतील जनता हा अन्याय कदापी खपवून घेणार नाही, अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

नवी मुंबईत साधारण १० ते १५ टक्के रुग्ण गोवंडी, मानखुर्द, चेंबूर तसेच ठाण्याच्या मुंब्रा परिसरातील आहेत. राजकीय दबावामुळे बाहेरील रुग्णांना अधिक प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे नवी मुंबईतील नागरिकांना बेडसाठी वणवण करावी लागत आहे. या प्रकाराकडे माजी नगरसेवक आणि शहरातील आमदार हतबल होऊन पाहत आहेत, ही नवी मुंबईकरांची मोठी शोकांतिका आहे.
- प्रदीप नामदेव म्हात्रे, 
अध्यक्ष, दिव्यादीप फाउण्डेशन, नवी मुंबई
 

Web Title: Outpatient burden on Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.