एनएमएमटीचे बसथांबे गॅरेजला आंदण, वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 05:00 AM2019-12-02T05:00:09+5:302019-12-02T05:00:21+5:30

कोपरखैरणे येथील जीमी टॉवरसमोर असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळच एनएमएमटीचा बस थांबा आहे.

NMMT's bus stop garage | एनएमएमटीचे बसथांबे गॅरेजला आंदण, वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष

एनएमएमटीचे बसथांबे गॅरेजला आंदण, वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष

googlenewsNext

नवी मुंबई : बेकायदा पार्किंगमुळे शहरवासीय अगोदरच हैराण झाले आहेत. वाहतूककोंडीची मोठी समस्या भेडसावत आहे. आता यातच वाहनांची दुरुस्ती करणाऱ्या गॅरेजचालकांनी चक्क रस्त्यांवरच आपली दुकाने थाटल्याने रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. काही भागात तर एनएमएमटीच्या बसथांब्यासमोरच वाहने उभी करून दुरुस्तीची कामे केली जात असल्याने बसचालकांसह प्रवाशांची मोठी कसरत होत आहे. या प्रकाराकडे वाहतूक विभागाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्याचा आरोप रहिवाशांकडून केला जात आहे.
नवी मुंबईत वसाहतीअंतर्गत रस्त्यावरील बेकायदा पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनू लागला आहे. रस्त्यावर दुतर्फा उभ्या असणाºया वाहनांमुळे परिसरात वाहतूककोंडीची समस्या निर्माण झाली आहे. अगोदरच अरुंद असलेले रस्ते दुतर्फा वाहन पार्किंगमुळे आणखी निमुळते झाले आहेत. त्यामुळे एनएमएमटीसह स्कूल बसेसना अशा रस्त्यांतून मार्ग काढताना कसरत करावी लागत आहे. रुग्णवाहिकांचा तर अनेकदा खोळंबा झाल्याची उदाहरणे आहेत. रस्त्यांवरील दुतर्फा वाहन पार्किंग त्रासाचे ठरत असतानाच आता एनएमएमटीच्या बसथांब्यासमोर अगदी रस्त्यावर थाटलेल्या वाहन दुरुस्तीच्या बेकायदा व्यवसायाने शहरवासीयांची डोकेदुखी वाढविली आहे. शहरवासीयांना एनएमएमटीच्या प्रवासी सेवेचा अधिकाधिक लाभ व्हावा, यादृष्टीने परिवहन उपक्रमाचे प्रयत्न आहेत. त्यानुसार अनेक भागात गरजेनुसार एनएमएमटीच्या सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. त्यासाठी आवश्यक तेथे बस थांबे उभारले आहेत. मात्र, आता हेच बस थांबे अनधिकृत गॅरेज व्यावसायिकांना आंदण ठरू लागले आहेत.
कोपरखैरणे येथील जीमी टॉवरसमोर असलेल्या स्मशानभूमीच्या प्रवेशद्वाराजवळच एनएमएमटीचा बस थांबा आहे. या बसथांब्यावर नेहमीच रिक्षांच्या दुरुस्ती सुरू आहेत. समोरच गॅरेज असल्याने येथील कारागीर सर्रासपणे बस थांब्याच्या समोर रिक्षा उभ्या करून दुरुस्तीची कामे करतात. एका वेळी चार ते पाच रिक्षा उभ्या असतात. तसेच याच रस्त्याच्या अगदी समोरच्या बाजूलाही रिक्षांच्या रांगा लागलेल्या असतात. त्यामुळे येथे नेहमीच वाहतुकीची कोंडी होत असते. रिक्षांच्या दुरुस्तीचे काम अगदी बसथांब्याच्या समोरच केले जात असल्याने प्रवाशांची तारांबळ उडते. तसेच बसचालकांनाही बस थांब्याचा अंदाज येत नसल्याने रस्त्याच्या मधोमध बस उभी करावी लागते. अशा परिस्थितीत बसमध्ये चढताना किंवा उतरताना प्रवाशांचा जीव टांगणीला लागलेला असतो.
मागील दहा वर्षांत कोपरखैरणे नोडचा झपाट्याने विकास झाला आहे. येथील लोकसंख्याही वाढली आहे. विशेषत: या परिसरात मध्यमवर्गीयांची संख्या अधिक आहे. डी-मार्ट चौकातून सेक्टर २३ मार्गे पुढे जीमी टॉवरपासून तीन टाकीकडे जाणाºया चौकानात नागरी वसाहत मोठी आहे. या वसाहतींना जोडण्यासाठी एनएमएमटीने या मार्गावर विशेष बसेस सुरू केल्या आहेत. मागील काही वर्षांत बसेसच्या फेऱ्यांत वाढही करण्यात आली आहे. डी-मार्ट ते तीन टाकी या चौकोणी मार्गावर यशवंतराव चव्हाण विद्यालय, इंदिरा गांधी अभियांत्रिकी कॉलेज, वेदान्त हॉस्पिटल, महापालिकेचे माता बाल संगोपन केंद्र, ज्ञानविकास हायस्कूल तसेच हॉटेल्स रेस्टॉरेंट, बँका आणि राज्य उपनिबंधक कार्यालय आदीचा समावेश आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वाहनांची वर्दळ असते. दुतर्फा पार्किंग आणि बसथांब्यासमोर रिक्षा दुरुस्तीचा बेकायदा व्यवसाय आदीमुळे या संपूर्ण पट्ट्यात सकाळपासून रात्री उशिरापर्यंत वाहतूककोंडी झालेली असते. दिवसेंदिवस या प्रकारात वाढ होत असल्याने रहिवाशांमध्ये नाराजी आहे.

महानगरपालिकेसह एनएमएमटीची चुप्पी
एनएमएमटीचे बसथांबे गॅरेजचालकांनी बळकावले आहेत. कारवाईचा कोणताही मुलाहिजा न बाळगता सर्रासपणे बसथांब्याच्या समोरच वाहनांना जॅक लावून दुरुस्तीची कामे केली जातात.
कोपरखैरणेसह बोनकोडे येथील बालाजी टॉवर्सच्या समोरील थांब्यावरही असाच प्रकार सुरू असल्याचे दिसून येते. कोपरखैरणेसह शहरातील अनेक बसथांबे गॅरेजचालकांना आंदण दिल्यासारखी परिस्थिती आहे. यासंदर्भात महापालिकेसह एनएमएमटीचे व्यवस्थापन आणि वाहतूक विभागाने कारवाई करणे गरजेचे आहे. मात्र, या तिन्ही विभागाने अर्थपूर्ण चुप्पी साधल्याने रहिवाशांचे हाल होत आहेत.

Web Title: NMMT's bus stop garage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.