NMMT bus accident | एनएमएमटीच्या दोन बसचा अपघात
एनएमएमटीच्या दोन बसचा अपघात

नवी मुंबई : एनएमएमटीच्या दोन बसच्या अपघाताची घटना कोपरखैरणेत सोमवारी सकाळी घडली. यामध्ये बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असून, ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात ही दुर्घटना घडली आहे. सततच्या अशा घटनांवरून एनएमएमटीच्या प्रवाशांचा जीव टांगणीला लागला आहे.

महापालिकेच्या परिवहन उपक्रमातील बसच्या दर्जावरून यापूर्वी अनेकदा प्रश्न उपस्थित केले गेले आहेत. बस अर्ध्या प्रवासात बंद पडणे, ब्रेक फेल होणे, आग लागणे अशा अनेक घटना सातत्याने घडत आल्या आहेत. याचा फटका प्रवासी संख्येवरही बसत असल्याने परिणामी परिवहन उपक्रम तोट्यात चालवावा लागत आहे. अशातच एनएमएमटीच्या काही चालकांच्या बेजबाबदार कृत्यांमुळे देखील परिवहन उपक्रमावर तोटा सहन करण्याची वेळ ओढावू लागली आहे. कंत्राटी पध्दतीवर झालेल्या भरतीमधील बहुतांश चालक राजकारण्यांच्या वशिल्यातील असल्याने ते प्रशासनाला जुमानत नसल्याचेही वेळोवेळी दिसून आले आहे. तर या चालकांना शिस्तीच्या धड्यांसह वाहन चालवताना घ्यायच्या काळजीबाबत देखील प्रशिक्षण देऊनही त्यांच्यात सुधाराची चिन्हे दिसत नसल्याचाही आरोप होत आहे. परिणामी अपघाताच्या घटना घडत असून, त्यामध्ये प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. निश्चित ठिकाणी गाडी वेळेवर पोहचवून आपली ड्युटी संपवण्याच्या घाईत चालकांकडून अतिवेगात बस पळवली जात असल्याचे शहरातील रस्त्यांवर दिसून येत आहे. मुळात शहरातील रस्ते अरुंद असल्याने त्यांच्याकडून बस पळवण्याच्या प्रयत्नात अपघात होत आहेत. अशाच प्रकारातून कोपरखैरणे - वाशी मार्गावर सोमवारी सकाळी कोपरखैरणे येथे एनएमएमटीच्या एका बसने दुसऱ्या बसला पाठीमागून धडक दिली. यामध्ये दोन्ही बसचे नुकसान झाले असून काही प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. समोरील बस जात असताना तिला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न मागच्या बस चालकाने केल्याने हा अपघात घडल्याचे समजते. मात्र त्याच्या या जीवघेण्या प्रयत्नात प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. काही महिन्यांपूर्वी महिलांसाठी राखीव असलेल्या तेजस्विनी बसचा देखील अपघात घडला होता. तर उरणलगत एनएमएमटी व रिक्षाच्या धडकेत एकाचा प्राण देखील गेला आहे. त्यामुळे एनएमएमटीमधून प्रवास करण्यापूर्वी प्रवाशांना विचार करणे भाग पडत आहे.

एनएमएमटीच्या चालकांना अनेकदा प्रशिक्षण देऊनही वाहतुकीच्या नियमांबाबत त्यांच्यात जागरूकता झालेली नाही. तर प्रशासन देखील अशा बेशिस्त चालकांवर अंकुश लावण्यात ढिले पडत असल्याचे दिसत आहे. त्यामुळे सतत घडणाºया अपघातांच्या घटनांमुळे प्रवासी एनएमएमटीकडे पाठ फिरवत असल्याने उत्पन्नवाढीवर परिणाम होत आहे.
- समीर बागवान,
परिवहन सदस्य


Web Title: NMMT bus accident
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.