नवी मुंबई, पनवेल, उरण आंदोलनांनी दणाणले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2020 12:54 AM2020-11-27T00:54:11+5:302020-11-27T00:54:32+5:30

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, महाराष्ट्र राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे आंदोलन; बॅंका बंद असल्याने नागरिकांचे हाल

Navi Mumbai, Panvel, Uran agitations | नवी मुंबई, पनवेल, उरण आंदोलनांनी दणाणले

नवी मुंबई, पनवेल, उरण आंदोलनांनी दणाणले

Next
ठळक मुद्देवाढीव वीज बिलाचा तीव्र निषेध; विभागीय आयुक्तांना दिले निवेदन

लॉकडाऊनदरम्यान नागरिकांना भरमसाट वीज बिले आली. या बिलांबाबत बरेच वादंग झाले. आता या वीज प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून त्यांनी नवी मुंबई, पनवेल येथे मोर्चा काढत सरकारचा निषेध केला. तसेच केंद्र सरकारने कामगार व शेतकरीविरोधी केलेले कायदे रद्द करावेत यासाठी केंद्रीय श्रमिक संघटना, इंटक आणि विविध संघटनांनी गुरूवारी बंदची हाक दिली. नवी मुंबई, पनवेल, उरण परिसर गुरूवारी विविध आंदोलनांनी गाजला. 

कोकण भवनावर ४०० मनसैनिकांची धडक 

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या कालावधीत आकारलेल्या भरमसाट वीज बिलासंदर्भात सरकार ठोस भूमिका घेत नसल्याच्या निषेधार्थ नवी मुंबईतील मनसैनिकांनी कोकण भवन येथे गुरुवारी मोर्चा काढून आंदोलन केले. वाढीव वीज बिलांसंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा विषय राज्यपाल कोश्यारी यांच्यापर्यंत नेऊनही सरकार मूग गिळून बसल्यामुळे थेट आंदोलनाची भूमिका घ्यावी लागली, असे मनसेचे नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी सांगितले.

बेलापूर आग्रोळी तलाव येथे मनसैनिक एकत्रित आल्यानंतर नवी मुंबई पोलिसांनी सुरक्षेच्या कारणास्तव अर्बन हाटसमोरील मुख्य रस्त्यावर मोर्चा अडविला. तेथील वाहनतळाच्या जागेत सभा घेऊन राज्य सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी  २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या पोलीस आणि जवानांना  श्रद्धांजली अर्पण केली. सुमारे ४०० मनसैनिकांनी ‘महाराष्ट्र सरकारचा खोट्या आश्वासनांचा भडिमार, सर्वसामान्यांवर वीजबिलाचा भार’,  अशा घोषणा देऊन कोकण भवन परिसर दणाणून सोडला.

 सभेत नवी मुंबई शहर अध्यक्ष गजानन काळे, उप शहर अध्यक्ष नीलेश बाणखिले, विनोद पार्टे, सविनय म्हात्रे, प्रसाद घोरपडे, उप शहर अध्यक्ष अनिता नायडू आदींनी दरवाढीचा निषेध केला. तसेच वीज बिलात सवलत मिळाली नाही, तर पुढचे आंदोलन मंत्रालयात किंवा मंत्र्यांच्या घरी करू, असा इशारा दिला. राज ठाकरेंनी कोकण विभागीय आयुक्तांच्या नावे पत्र दिले होते. मनसेच्या शिष्टमंडळाने हे पत्र कोकण विभागीय आयुक्तांना सुपूर्द केले.

Web Title: Navi Mumbai, Panvel, Uran agitations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.