Midnight MacDrill by Fire Brigade in Kharghar | खारघरमध्ये अग्निशमन दलाद्वारे मध्यरात्री मॉकड्रिल
खारघरमध्ये अग्निशमन दलाद्वारे मध्यरात्री मॉकड्रिल

-वैभव गायकर

पनवेल : खारघर सेक्टर १९ मधील रिजेन्सी क्रेस्ट या रहिवासी संकुलात खारघर अग्निशमन दलाकडून शनिवारी मध्यरात्री मॉकड्रिल राबविण्यात आले. आपत्कालीन परिस्थितीवर मात करण्यासाठी उपाययोजना राबविता येतील, याकरिता अशाप्रकारचे रात्री राबविलेले हे मॉकड्रिल प्रथमच महाराष्ट्रात खारघरमध्ये राबविण्यात आले.

सिडकोचे मुख्य अग्निशमन अधिकारी अरविंद मांडके यांच्या उपस्थितीत मॉकड्रिल घेण्यात आले. शनिवारी मध्यरात्री १२ च्या सुमारास बिल्डिंगमधील मीटररूममध्ये आग लावण्यात आली. या घटनेनंतर तत्काळ अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सायरन वाजवून बिल्डिंगमधील रहिवाशांना सुरक्षितस्थळी हलविले. त्यानंतर आगीवर नियत्रंण मिळविण्यासाठी कारवाईला सुरुवात झाली. संबंधित बिल्डिंगमधील अग्निशमन यंत्रणा कार्यान्वित आहे की नाही, याबाबत चाचपणी करून अग्निशमनच्या जवानांची आगीवर नियंत्रण मिळविले.

मॉकड्रिल राबविताना पोलीस, अग्निशमनचे कर्मचारी, महानगर गॅस, महावितरण, रुग्णवाहिका आदीना आपत्कालीन परिस्थितीत सतर्क राहण्याचे सूचना विंग कमांडरने दिल्या होत्या. आग विझविताना प्रत्येक फ्लॅटमधून बाहेर काढलेल्या सदस्यांची गणती करण्याचे काम काही अग्निशमन दलातील कर्मचारी करीत होते. घटना घडल्यावर एका फोनवर घटनास्थळ गाठून अवघ्या ६ ते १३ मिनिटांत मॉकड्रिल यशस्वीरीत्या राबविण्यात आले. या वेळी शैलेश पटेल, सुनील भाटिया, विशाल अग्रवाल, अरविंद प्रसाद, विष्णू पंचलगीया, जयेश गोगरी या रहिवाशांनी महत्त्वाचे योगदान दिले.

खारघर मधील रिजेन्सी क्रेस्ट सोसायटीमध्ये राबविण्यात आलेली नियोजित मॉकड्रिल यशस्वीरीत्या पार पडली. याकरिता रहिवाशांनी चांगले सहकार्य केले. रात्रीच्या वेळी करण्यात आलेली मॉकड्रिल महाराष्ट्रातील पहिलीच मॉकड्रिल आहे.
- अरविंद मांडके, मुख्य अग्निशमन अधिकारी, सिडको

आपत्कालीन परिस्थितीत काय करायला पाहिजे. याची माहिती मॉकड्रिलद्वारे मिळाली. अग्निशमन दलातील कर्मचाऱ्यांनी अत्यंत सहजतेने सर्व परिस्थितीत हाताळत हे मॉकड्रिल यशस्वी केले. अशाप्रकारे रात्रीच्या मॉकड्रिल राबविण्यासाठी आमच्या सोसायटीची महाराष्ट्रातून निवड झाली, ही अभिमानाची बाब आहे.
- शैलेश पटेल, अध्यक्ष, रिजेन्सी क्रेस्ट सोसायटी

Web Title: Midnight MacDrill by Fire Brigade in Kharghar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.