महाविकास आघाडीची जागावाटपात कसोटी; शिवसेनेमध्ये सर्वाधिक अस्वस्थता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2020 11:07 PM2020-02-25T23:07:02+5:302020-02-25T23:07:12+5:30

उमेदवारी न मिळाल्यास बंडखोरी अटळ; जागावाटपाचा फॉर्म्युलाही गुलदस्त्यात

Leadership Test for Development Leadership; The highest discomfort in the Shiv Sena | महाविकास आघाडीची जागावाटपात कसोटी; शिवसेनेमध्ये सर्वाधिक अस्वस्थता

महाविकास आघाडीची जागावाटपात कसोटी; शिवसेनेमध्ये सर्वाधिक अस्वस्थता

Next

नवी मुंबई : राज्यातील महाविकास आघाडीचा प्रयोग नवी मुंबई महानगरपालिकेमध्येही करण्यात येणार आहे. सत्ता मिळविण्यासाठी तीनही पक्ष एकत्र लढणार असले तरी या निर्णयामुळे अनेकांना उमेदवारीपासून वंचित राहवे लागणार आहे. शिवसेनेमध्ये सर्वाधिक अस्वस्थता निर्माण झाली असून, तिकीट गमवावे लागणाऱ्या अनेकांनी बंडखोरी करण्याची तयारी सुरू केली आहे. सीवूड, जुईनगर, सानपाडा व इतर काही ठिकाणी जागावाटपाचाही तिढा निर्माण होणार असून, यामधून मार्ग काढताना महाविकास आघाडीच्या नेत्यांना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीचे बिगूल वाजले असून, सर्वच राजकीय पक्षांनी महापालिकेवर सत्ता मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना, काँगे्रस व राष्ट्रवादीने या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याचे निश्चित केले आहे. भाजपच्या विशेषत: माजी मंत्री गणेश नाईक यांच्या हातातून महापालिकेची सत्ता हिसकावण्याचा निर्धार केला असून, तीनही पक्षांनी संयुक्त मेळावा घेऊन एकप्रकारे प्रचाराची सुरुवातही केली आहे. महाविकास आघाडीच्या मेळाव्यानंतर भाजपने राज्य अधिवेशन नवी मुंबईमध्ये घेऊन नवी मुंबईमध्ये सत्ता मिळविण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. अधिवेशनाच्या दुसºयाच दिवशी शिवसेनेने भाजपचे चार नगरसेवक फोडून त्यांना धक्का दिला आहे. शिवसेना व राष्ट्रवादी काँगे्रसच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादीला नाईक परिवारास धडा शिकवायचा असून, शिवसेनेला पुन्हा महापालिकेवर सत्ता मिळविण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे. यामुळे दोन्ही पक्षांनी काँगे्रसला सोबत घेऊन निवडणुकीला सामोरे जाण्याचा निर्धार केला आहे; परंतु जागावाटपावरून काही विभागामध्ये तिढा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राष्ट्रवादीला आघाडीमध्ये जास्त जागा पदरात पाडून घ्यायच्या आहेत. शिवसेनेची ताकद असलेल्या काही प्रभागांमध्ये राष्ट्रवादीला उमेदवारी हवी आहे. महाविकास आघाडी झाल्यास सीवूड, सानपाडा, दारावे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली व इतर काही प्रभागांमध्ये शिवसेनेच्या इच्छूक पदाधिकाऱ्यांची निराशा होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. जुईनगरमध्ये शिवसेनेचे दोन नगरसेवक आहेत; परंतु येथील एक जागेवर काँगे्रसनेही दावा करण्यास सुरुवात केली आहे. काँगे्रसच्या रवींद्र सावंत यांनी येथील एक जागा काँगे्रसला मिळावी, यासाठी आग्रह धरला आहे. इतरही काही ठिकाणी अशीच स्थिती आहे. संभाव्य बंडखोरी रोखण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांनी आतापासूनच तयारी सुरू केली आहे. त्यांना कितपत यश मिळते हे थोड्या दिवसांत स्पष्ट होईल.

महापालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी केली जाणार आहे. काही जागांवर इच्छुकांची संख्या जास्त असून समंजसपणे त्यामधून मार्ग काढला जाणार आहे. ज्यांना उमेदवारी मिळणार नाही, अशा महत्त्वाच्या पदाधिकाºयांना इतर ठिकाणीही संधी दिली जाणार असून पक्षात कोणाचीही नाराजी राहणार नाही.
- विठ्ठल मोरे, शिवसेना जिल्हाप्रमुख, बेलापूर

प्रसंगी जागांची अदलाबदल
शिवसेना उपनेते विजय नाहटा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने निवडणुकीला सामोरी जाणार आहे. या वेळी परिवर्तन नक्की होणार आहे. जागावाटप समंजसपणे व सर्वांना विश्वासात घेऊन केले जाईल. वेळ पडल्यास काही ठिकाणी जागांची अदलाबदल करण्याचाही आमचा प्रयत्न राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

शशिकांत शिंदे यांच्याशी संपर्क नाही
राष्ट्रवादी काँग्रेसने नवी मुंबई महानगरपालिकेची जबाबदारी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांच्यावर सोपविली आहे. शिंदे यांच्यावर माथाडी कामगार संघटना, मूळ कोरेगाव मतदारसंघ व पक्षाच्या इतर जबाबदाºयाही आहेत. यामुळे अनेकदा त्यांचा संपर्क होत नाही. महाविकास आघाडीच्या जागावाटप व संभाव्य नाराजीविषयी माहिती घेण्यासाठी शशिकांत शिंदे यांच्याशी वारंवार संपर्क साधला; परंतु संपर्क होऊ शकला नाही.

२०१५ मध्येही बंडखोरी
महापालिकेच्या २०१५ मध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये शिवसेना व भाजपची युती झाली होती. युतीमुळे शिवसेनेमध्ये प्रचंड असंतोष निर्माण होऊन नेरुळ पश्चिम, सानपाडा, दारावे व इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात बंडखोरी झाली. युतीच्या जवळपास नऊ जागा बंडखोरांमुळे पडल्या होत्या. या वेळी पुन्हा बंडखोरीचा फटका बसू नये, यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी प्रयत्न सुरू केले आहेत.

Web Title: Leadership Test for Development Leadership; The highest discomfort in the Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.