Jitendra awhad in Maha Vikas aghadi meeting vashi | "शरद पवार यांच्या हृदयावरील जखम भरून काढा", जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांना आवाहन

"शरद पवार यांच्या हृदयावरील जखम भरून काढा", जितेंद्र आव्हाडांचं कार्यकर्त्यांना आवाहन

नवी मुंबई : मीरा भाईंदरचे नगरसेवक ज्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेले त्याचवेळी मी, गणेश नाईक राष्ट्रवादी काँग्रेस सोडून जाणार असल्याचे ओळखले होते आणि शरद पवार यांना याबाबत कल्पना दिली होती, परंतु त्यांच्यावर पवारांचा प्रचंड विश्वास होता. काही काळातच नाईक यांनी राष्ट्रवादी सोडली. ही जखम पवार यांच्या हृदयावर आजही आहे. ही जखम भरून काढण्याचे काम महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी करावे, असे आवाहन गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केले. नवी मुंबई महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने रविवारी, दि. १७ जानेवारी रोजी नवी मुंबई महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांची  वाशी येथील विष्णुदास भावे नाट्यगृहात बैठक आयोजित केली होती. त्यावेळी ते  बोलत होते.

 विकास कशाला म्हणतात हे मला माहीत नाही, परंतु दुसऱ्याने केलेली कामे आपल्या नावावर कशी खपवायची हे जर शिकायचे असेल तर नाईकांकडे जाऊन शिका, असा टोला त्यांनी लगावला. प्रत्येक सभेला शरद पवार यांच्याशेजारी नाईक बसायचे, परंतु भाजपच्या पहिल्याच सभेत त्यांना खाली जागा मिळाली नाही. त्याचे वाईट वाटत असल्याचे सांगत त्यांच्यात स्वाभिमान उरलेला नसल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे विकास करत आहेत. रस्त्याच्या रुंदीकरणावर आधारित एफएसआय देण्यात आलेला आहे. नवी मुंबईतील सुमारे तीन लाख लोकांना याचा फायदा होणार असून, पुनर्बांधणीसाठी चांगला एफएसआय मिळणार असल्याने विकासाच्या सर्व वाटा उघड्या झाल्या असल्याचे त्यांनी सांगितले. 

महाविकास आघाडी सरकारकडून भूमिपुत्रांचे पुन्हा एकदा सीमांकन केले जाईल, गरजेपोटी बांधलेली घरे अधिकृत करून गावठाणाला चार एफएसआय देण्यात येईल, असे आश्वासन देत असल्याचे आव्हाड म्हणाले. गणेश नाईक यांच्याकडे मंत्रिपद असताना त्यांना हे प्रश्न सोडविता आले नाहीत. त्यांची एकूण वाटचाल बघता ते वैराग्याकडे वाटचाल करतात असा टोला आव्हाड यांनी लगावला. 

मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री अस्लम शेख यांनी भ्रष्टाचार आणि किडनॅप करून आलेला पक्ष म्हणजे भाजप असल्याची टीका केली.  पालिका निवडणुकीत पक्षासाठी मतदान करू नका, देशासाठी मतदान करा असे आवाहन कार्यकर्त्यांना केले. गेल्या २५ वर्षांत यांना भूमिपुत्रांवरील अन्याय दूर करता आला नाही त्यामुळे त्यांना दूर करण्याची वेळ आल्याचे सांगत महाविकास आघाडीचा महापौर बसविण्याचे आवाहन खासदार राजन विचारे यांनी केले. धनशक्तीपुढे जनशक्ती जिंकते हा इतिहास भाजपला दाखविण्याची वेळ आल्याचे माजी मंत्री शशिकांत शिंदे म्हणाले. महाविकास आघाडीत कोणतेही वाद किंवा मतभेद नसल्याचे सांगत तथाकथित शिल्पकारांची नवी मुंबईसाठी शून्य योगदान असल्याचा टोला शिवसेनेचे उपनेते विजय नाहाटा यांनी लगावला. भ्रष्टाचाराची कीड कायमची घालविण्याची संधी आली असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले. 

बैठकीत माजी नगरसेवक चंद्रकांत पाटील उपस्थित होते. त्यामुळे पाटीलही भाजपला सोडचिट्ठी देत महाविकास आघाडीत सहभागी होण्याच्या चर्चेला उधाण आले आहे. यावेळी माजी खासदार आनंद परांजपे, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसचे सचिव संतोष शेट्टी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशिक, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अशोक गावडे, निरीक्षक प्रशांत पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विठ्ठल मोरे आदी पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

ससून डॉक नवी मुंबईत आणा -
नौसेनेची हद्द येत असल्याने मुंबईतील ससून डॉक बंद करावा, डॉक नवी मुंबईत आणावा आणि यामध्ये येथील आगरी कोळी भूमिपुत्रांना प्रथम स्थान द्यावे, अशी मागणी माजी मंत्री शशिकांत शिंदे यांनी केली. ऐरोलीजवळ मोठी जागा आहे. खाडीची खोली चांगली असेल आणि त्याठिकाणी मोठ्या बोटी येऊ शकत असतील तर ससून डॉक ऐरोली येथे आणावा, अशी मागणी गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केली. मत्स्यव्यवसाय व बंदरेमंत्री अस्लम शेख यांनी सदर मागणी रास्त असून, लवकरच याबाबतीत सकारात्मक कार्यवाही करणार असल्याचे सांगितले.

महिला पदाधिकाऱ्यांची नाराजी -
पालिकेच्या निवडणुकीत आम्ही सर्व एकत्रितपणे काम करणार आहोत. परंतु आजच्या बैठकीत तिन्ही पक्षांच्या प्रमुख महिला पदाधिकारी होत्या, त्यामधील किमान एका महिलेला तरी बोलण्याची संधी देणे गरजेचे होते. परंतु बोलू न दिल्याची खंत असल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या प्रवक्ता लीना लिमये यांनी व्यक्त केली. वरिष्ठांनी याची दाखल घ्यायला हवी असल्याचे लिमये यांनी सांगितले.

Web Title: Jitendra awhad in Maha Vikas aghadi meeting vashi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.