नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे; कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 08:06 AM2021-01-18T08:06:27+5:302021-01-18T08:07:33+5:30

२१ व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.  गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत.

International drug mafia network in Navi Mumbai | नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे; कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान 

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे; कोट्यवधींची उलाढाल, पोलिसांसमोर मोठे आव्हान 

Next

सूर्यकांत वाघमारे -

नवी मुंबई : स्मार्ट सिटीत आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे पसरत असून, त्यांच्याकडून तरुणाईला जाळ्यात ओढले जात आहे. मागील तीन वर्षांत पोलिसांनीअमली पदार्थांशी संबंधित २८९ कारवाया करून ५ कोटी ५० लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त केले आहे. त्यात सिन्थेटिक ड्रग्सचा (कृत्रिम) सर्वाधिक समावेश असून त्याच्या सेवनाने तरुणाई कायमची मनोविकृत होत आहे.

२१ व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे.  गांजा वगळता इतर इतर सर्व सिन्थेटिक (कृत्रिम) ड्रग्स असून, देश-विदेशात बनवले जात आहेत. हे ड्रग्स थेट मनोविकृतीवर गंभीर परिणामकारक आहेत. त्याची नशा करून अनेक गुन्हेगार गुन्हे करत आहेत. 

या ड्रग्सची नवी मुंबईत थेट विक्री वाढल्याने, नशा करणाऱ्याचेही प्रमाण वाढले आहे. पानटपरीवर, झोपड्यांमध्ये तसेच आहारी गेलेल्यांकडून त्याची विक्री होत आहे. आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांशी जोडल्या गेलेल्यांकडून त्यांना याचा पुरवठा होत आहे. त्यात नायझेरियन व्यक्तींचा सर्वाधिक समावेश असल्याचे आजवरच्या कारवाईमधून दिसले आहे. 

जून २०१९ मध्ये कोपरखैरणेत आफ्रिकन महिलेकडून ८५ लाखांची एमडी पावडर जप्त केली होती. पाकिस्तानमधून आफ्रिकामार्गे ही महिला नवी मुंबईत ड्रग्स घेऊन आली होती. त्याशिवाय वाशीतील अनेक महाविद्यालयांबाहेर ड्रग्सची विक्री करताना नायझेरियन व्यक्तींना अटक झालेली आहे. मागील तीन वर्षांत नवी मुंबईत २८९ कारवायांमध्ये तब्बल ५ कोटी ५० लाखांहून अधिक किमतीचे ड्रग्स जप्त करण्यात आले आहेत. त्यात सिन्थेटिक ड्रग्सचे प्रमाण सर्वाधिक आहे.

नवी मुंबईला ड्रग्स मुक्त करण्यासाठी २०१४ साली तत्कालीन पोलीस आयुक्त के. एल. प्रसाद यांनी उपायुक्तांमार्फत मोहीम राबवली होती. त्यानंतर कारवाया थंडावल्या असता २०१८ मध्ये संजय कुमार यांनी पुन्हा कारवाईंवर भर दिला. त्यानुसार गुन्हे शाखेचे अमली पदार्थ विरोधी पथक व दोन्ही परिमंडळचे विशेष पथक यांनी २०१९ मध्ये १५३ कारवायांमध्ये सुमारे साडेतीन कोटीचे ड्रग्स जप्त केले होते. त्यात परिमंडळ १ च्या कारवाया अधिक प्रभावी होत्या. परंतु लॉकडाऊन नंतर पुन्हा नवी मुंबईत ड्रग्स माफिया फैलावू लागला आहे. त्यामुळे विद्यमान पोलीस आयुक्त बिपीनकुमार सिंह यांनी गतमहिन्यात विशेष मोहीम राबवून १६ गुन्ह्यात ७७ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले. त्यानंतरही ठिकठिकाणी अमली पदार्थांची विक्री व सेवन सुरूच असल्याचे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झाले आहे.

२८९ गुन्ह्यांत ४१५ जणांना अटक
तीन वर्षांत नवी मुंबई पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात अमली पदार्थाच्या २८९ कारवाया झाल्या आहेत. त्यात अमली पदार्थ सोबत बाळगल्याप्रकरणी १११ गुन्हे दाखल आहेत, तर सेवन केल्याप्रकरणी १४७ कारवाया झाल्या आहेत. त्यामध्ये एकूण ४१५ जणांना अटक झालेली आहे.

तरुणांचे भवितव्य येेतेय धोक्यात 
अभ्यासासह इतर तणावातून मुक्त होण्याचा मार्ग म्हणून तरुणांना नशेच्या आहारी ढकलले जात आहे. त्यांना तणावाचा विसर पडावा, यासाठी मनावर परिणाम करणाऱ्या सिन्थेटिक ड्रग्सची लत लावली जात आहे. याचा परिणाम त्यांच्या मानसिकतेवर होत असल्याने अनेक जण गुन्हेगारीकडे वळत आहेत.

मुख्य सूत्रधार अद्याप मोकाट 
शहरात ड्रग्स विकणारे व सेवन करणाऱ्यांवर अनेकदा कारवाई होते. मात्र, मुख्य सूत्रधार अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. देशाच्या एखाद्या कोपऱ्यातून अथवा देशाबाहेरून वेगवेगळ्या टोळ्यांचे रॅकेट नवी मुंबईत चालत आहेत. त्यांच्याकडून करोडो रुपयांच्या ड्रग्सची विक्री होत असल्याने, आंतरराष्ट्रीय ड्रग्स माफियांचे जाळे नवी मुंबईत फैलावत आहे.

१० वर्षांपासून विक्री वाढली
२१ व्या शतकातली स्मार्ट सिटी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नवी मुंबईतले ड्रग्स विक्रीचे रॅकेट मोडीत काढण्याचे आव्हान पोलिसांपुढे आहे. मागील १० वर्षांपासून शहरात गांजा, चरस यासह केटामाईन, मॅथ्यूक्युलॉन, मेस्कॅलिन, एम्फेटामाईन, ब्राऊन शुगर, हेरॉईन, एमडी, एमडीए आदींची विक्री वाढली आहे.

Web Title: International drug mafia network in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.