grouping in MNS before Municipal elections; gajanan kale City Chief resigns | पालिका निवडणुकीपूर्वीच मनसेत गटबाजी; शहराध्यक्षांचा राजीनामा

पालिका निवडणुकीपूर्वीच मनसेत गटबाजी; शहराध्यक्षांचा राजीनामा

नवी मुंबई : वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून मनस्ताप होत असल्याचे कारण देत मनसेचे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी शुक्रवारी आपल्या पदाचा राजीनामा दिला. यामुळे इतर पदाधिकाºयांनीही दिवसभर राजीनाम्याचे सत्र सुरू केले होते.

गतमहिन्यात मनसेच्या तीन पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी अचानकपणे दिलेल्या राजीनाम्याची दखल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी घेतली. यामुळे त्यांच्या निर्देशानुसार मनसे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी राजीनामा दिलेल्या तिघांचीही राज ठाकरे व अमित ठाकरे यांच्यासोबत बैठक घडवून आणली. त्यानंतर मनसेतून राष्ट्रवादीत गेलेल्या संदीप गलुगडे यांनी मनसेत पुनरागमन केले. तर घडलेल्या प्रकरणाचा आढावा घेण्यासाठी राज ठाकरे यांनी शनिवारी काळे यांना भेटीला बोलवले. तत्पूर्वीच शुक्रवारी काळे यांनी वरिष्ठांप्रति नाराजी व्यक्त करत आपल्या पदाचा राजीनामा दिला.

जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव व नेते अभिजित पानसे यांनी नवी मुंबईत लक्ष घातल्यापासून गटबाजी वाढल्याचाही आरोप काळे यांनी केला आहे. तसेच तिघांनी मनसे सोडल्याच्या कारणाला आपल्याला विनाकारण जबाबदार धरल्याचीही नाराजी व्यक्त केली. काळे यांनी राजीनाम्याची प्रत सोशल मीडियावर प्रसिद्ध करताच इतर पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे द्यायला सुरुवात केली. यामुळे मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे व अमित ठाकरे यांचे स्वीय सहायक महेश ओवे यांनी काळे यांची भेट घेतली. त्यांच्यात झालेल्या बैठकीत काळे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न झाला. मात्र, या संदर्भात अविनाश जाधव व गजानन काळे यांच्याशी संपर्क साधला असता तो होऊ शकला नाही.

निवडणुकीत बसणार फटका

या प्रकरणावरून नवी मुंबई मनसेत दोन गट पडले असून, त्याचा फटका तीन महिन्यांवर आलेल्या महापालिका निवडणुकीत बसण्याची चिन्हे दिसत आहेत. संदीप गलुगडे, नितीन चव्हाण व श्रीकांत माने हे तिघेही काळे यांचे अत्यंत निकटवर्तीय म्हणून परिचित आहेत.
त्यापैकी गलुगडे यांनी मनसेत पुनरागमन केले आहे. मात्र, गतमहिन्यातल्या नाराजी नाट्यामुळे काळे व गलुगडे यांच्यात वैचारिक दरी निर्माण झाली आहे. अशातच गलुगडे यांच्या पाठीशी ठाण्यातील पदाधिकारी राहू लागल्याच्या कारणावरून काळे यांनी राजीनामा दिल्याचीही चर्चा आहे.

Web Title: grouping in MNS before Municipal elections; gajanan kale City Chief resigns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.