"नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या"

By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2021 08:06 AM2021-01-03T08:06:48+5:302021-01-03T08:07:53+5:30

navi mumbai airport : यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

give the name of di ba patil for navi mumbai airport not balasaheb thackeray, demanded mns | "नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या"

"नवी मुंबई विमानतळाला बाळासाहेबांचे नाही तर दि. बा. पाटलांचे नाव द्या"

googlenewsNext
ठळक मुद्देशिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला मनसेने विरोध केला आहे.

नवी मुंबई : एकीकडे औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरू असताना आता नवी मुंबई आतंरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पाच्या नावावरून वाद निर्माण झाला आहे. या विमानतळाला रायगडचे प्रकल्पग्रस्त नेते दिवंगत दि. बा.  पाटील यांचे नाव द्या, अशी मागणी मनसेने केली आहे. यापूर्वी शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली होती. त्यामुळे या विमानतळाच्या नामकरणावरून वाद निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे.

शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी केल्यानंतर याला मनसेने विरोध केला आहे. नवी मुंबईतील पनवेलमध्ये उभे राहत असलेले आंतरराष्ट्रीय विमानतळ रायगड जिल्ह्यात आहे. या भूमीला प्रकल्पग्रस्त चळवळीचा इतिहास आहे. प्रकल्पग्रस्तांसाठी संपुर्ण आयुष्य वेचणाऱ्या दिवंगत दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी मनसेने पत्रकार परिषद घेत केली आहे. रायगड आणि नवी मुंबई मनसेकडून ही मागणी करण्यात आली आहे.

महाराष्ट्रातील एखादया भव्य प्रकल्पाला हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्यावे. मात्र, लोकभावना लक्षात घेता नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते, आगरी कोळी समाजाचे दैवत स्व. दि. बा. पाटील यांचेच नाव द्यावे, अशी मागणी मनसे नवी मुंबई प्रमुख गजानन काळे यांनी केली आहे. तसेच, दि. बा. पाटील यांचे नाव द्यायची मागणी असताना अचानक एकनाथ शिंदे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची मागणी करत जे राजकारण केले आहे, ते निंदनीय आहे, असेही गजानन काळे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे करण्याच्या मुद्द्यावर राजकीय कलगीतुरा सुरूच आहे. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम आहे, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले. शिवसेनेचे नेते खा. संजय राऊत यांनी औरंगजेबापेक्षा छत्रपती संभाजी महाराजांवर काँग्रेस नेत्यांचे अधिक प्रेम आणि श्रद्धा असणार, याची मला खात्री आहे, असे सांगून भाजपचे कान टोचले. तर २६ जानेवारीपूर्वी हे नामांतर केले नाही, तर आंदोलन करणार असल्याची भूमिका मनसेने घेतली. 

नामांतराचा प्रस्ताव दुय्यम : अशोक चव्हाण
औरंगाबादचे नाव बदलून ते संभाजीनगर करण्याबाबत सरकारकडे कुठलाच प्रस्ताव नाही. सध्यातरी या नामांतराच्या मुद्द्याला अग्रक्रम नसून, तो दुय्यम असल्याची माहिती राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना दिली.तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे वेगवेगळे मतप्रवाह हे राहणारच; परंतु सरकार स्थापन करताना किमान समान कार्यक्रम ठरलेला आहे. त्यानुसार हे सरकार चालविले जात आहे, असे सांगून सर्व आलबेल असल्याचे चव्हाण यांनी सूचित केले. 

अहमदनगरचेही नाव ‘अंबिकानगर’ करा
औरंगाबादप्रमाणेच अहमदनगरचे नावही ‘अंबिकानगर’ करावे, अशी मागणी शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केली आहे. मराठा ठोक क्रांती मोर्चाचे आंदोलन औरंगाबाद नामांतराच्या प्रस्तावाला विरोध दर्शविणारे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याविरोधात शनिवारी मराठा ठोक क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी औरंगाबादमध्ये जोरदार आंदोलन केले. यावेळी जमलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केली. 

Web Title: give the name of di ba patil for navi mumbai airport not balasaheb thackeray, demanded mns

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.