गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; पावसाची हजेरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:02 AM2019-09-08T00:02:56+5:302019-09-08T00:03:29+5:30

नवी मुंबईसह पनवेलमध्ये विसर्जन; पोलिसांची चोख व्यवस्था

Gauri-Ganapati's passionate message; | गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; पावसाची हजेरी

गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप; पावसाची हजेरी

Next

नवी मुंबई : नवी मुंबईसह पनवेल परिसरात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, अशा जयघोषात आपल्या लाडक्या बाप्पासह गौरीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात गौरी-गणपतीमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. तर पनवेल महापालिका क्षेत्रातील दुपारनंतर गौरी-गणपतीमूर्तींचे भावपूर्ण विसर्जन करण्यात आले.

गौरी-गणपती विसर्जनाला दुपारनंतर सुरुवात झाली. रिमझिम कोसळणाऱ्या पावसाची तमा न बाळगता वाजतगाजत बाप्पाची मिरवणूक काढण्यात आली. रात्री उशिरापर्यंत गणपती विसर्जन सुरू होते. विसर्जनासाठी कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. रस्ते वाहतुकीत बदल करण्यात आले होते. महापालिकेच्या वतीने ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांवर जवळपास ७०० स्वयंसेवक तैनात करण्यात आले होते. त्याचप्रमाणे महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारीही उपस्थित होते. महापालिका क्षेत्रातील २३ तलावांवर रात्री उशिरापर्यंत विसर्जन सुरू होते. दिवाळे कोळीवाडा, घणसोली, वाशी, कोपरखैरणे आणि दिघा तलावांवर भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. संध्याकाळी ४ वाजल्यानंतर गणपती विसर्जनाला सुरुवात झाली. ढोल-ताशाच्या गजरात फटाक्यांची आतशबाजी करीत उत्साहात; तितक्याच भावपूर्ण वातावरणात गौरी-गणपतीला निरोप देण्यात आला. पोलिसांनी वाहतुकीचे उत्तम नियोजन केले होते. महापौर जयवंत सुतार आणि महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ ठिकठिकाणच्या विसर्जन तलावांना भेटी देऊन विसर्जन व्यवस्थेच्या कामावर लक्ष ठेवून होते.

उरणमध्ये मोरा सागरी पोलीस, उरण पोलीस आणि न्हावा-शेवा बंदर पोलीस ठाणे आदी तीन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुमारे साडेपाच हजार गौरी-गणपतीमूर्तींच्या विसर्जनासाठी दुपारपासूनच सुरुवात झाली होती. फुले, तोरणांनी सजविण्यात आलेल्या विविध गाड्यातून वाजत-गाजत गौरी-गणपती विसर्जनासाठी निघाले होते. उरण परिसरातील घारापुरी, मोरा, न्हावा, गव्हाण हनुमान कोळीवाडा, करंजा, पीरवाडी, माणकेश्वर आदी समुद्राच्या खाडीत तर परिसरातील विविध गावांतील तलावात गौरी-गणपतीमूर्तींना भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. विसर्जनादरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली होती. उरण शहरातील विमला तलावात हजारो गौरी-गणपतींचे भावपूर्ण वातावरणात विसर्जन करण्यात आले. रात्री उशिरापर्यंत विसर्जन केले जात होते.

पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवल्याने उरण परिसरात शांततेत विसर्जन झाल्याची माहिती उरण वपोनि जगदीश कुलकर्णी यांनी दिली. पनवेल शहरासह ग्रामीण भागात गौरी-गणपतीला भावपूर्ण निरोप देण्यात आला. महापालिकेच्या वतीने विसर्जनस्थळांवर विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आल्या होत्या.

सहा दिवसांच्या गणपतीसह गौरीमूर्तींचेही विसर्जन करण्यात आले. सहा दिवसांच्या गणपतीला जड अंत:करणाने निरोप देण्यात आला. यात घरगुती गणपती डोक्यावर घेऊन तर कित्येकांनी खासगी गाडीतून जयघोष करीत बाप्पाची मिरवणूक काढली.
या मिरवणुकीत लहान मुलांसह, महिला, पुरु ष, प्रौढांनीही सहभाग घेतला होता. संपूर्ण पनवेल परिसरात श्रींच्या मिरवणुका निघाल्या होत्या.

गुलालाची उधळण करत, तालुक्यातील गावांमध्ये गाढी नदीमध्ये गौराई व गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले.
पालिका हद्दीत ठिकठिकाणच्या तलावात, कोळीवाडा-गाढी नदी, पनवेल बंदर, वडाले तलाव, तक्का, पोदी, आदई तलाव, सुकापूर, खिडूकपाडा स्टील मार्केट, खांदेश्वर शिव मंदिर आदी ठिकाणी विसर्जन करण्यात आले.

Web Title: Gauri-Ganapati's passionate message;

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.