जागरणाच्या नावाखाली जुगार; गणेशोत्सव मंडपामधील प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 12:10 AM2019-09-08T00:10:10+5:302019-09-08T00:11:03+5:30

आडोशाच्या जागेत चालतोय खेळ

Gambling under the name of wakefulness; Types in Ganeshotsav Mandap | जागरणाच्या नावाखाली जुगार; गणेशोत्सव मंडपामधील प्रकार

जागरणाच्या नावाखाली जुगार; गणेशोत्सव मंडपामधील प्रकार

Next

सूर्यकांत वाघमारे 

नवी मुंबई : गणेशोत्सव मंडळांमध्ये मोठ्या प्रमाणात जुगार चालत असल्याचे दिसून येत आहे. त्याकरिता मंडळांकडूनच मंडपामध्ये आडोशाच्या जागा तयार करण्यात आल्या आहेत. यानंतरही त्या ठिकाणी कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्याने स्थानिक पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

गणेशोत्सव साजरा करताना अनेक सार्वजनिक मंडळांकडून जागरणाच्या नावाखाली जुगाराचे डाव भरवले जात आहेत, त्याकरिता परिसरातील जुगारींसाठी विशेष सोयही करून दिली जात आहे. असाच प्रकार शुक्रवारी मध्यरात्री कोपरखैरणे परिसरात पोलिसांच्या छाप्यात उघड झाला. सेक्टर १६ येथील अष्टविनायक गणेश मित्रमंडळाच्या गणेशोत्सवाच्या ठिकाणी जुगार चालत असल्याची माहिती सहायक आयुक्त सतीश गोवेकर यांना मिळाली होती. यानुसार त्यांनी विशेष पथकाद्वारे मध्यरात्रीच्या सुमारास त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली, या वेळी आठ ते दहा जुगारींना ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कोपरखैरणे पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मंडळात गणेशमूर्तीची स्थापना झाल्यापासून त्या ठिकाणी दिवस-रात्र जुगार चालत होता. यासाठी मुख्य मंडपाला लागूनच स्वतंत्र बंदिस्त मंडप घालण्यात आलेला आहे. यानंतरही त्यावर स्थानिक पोलिसांकडून कारवाई न झाल्याने त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. दोन वर्षांपूर्वी याच मंडळाविरोधात परिसरातील रहिवाशांनी पोलिसांकडे तक्रारही केली होती. रात्रभर चालणाऱ्या जुगारादरम्यान जुगारींकडून लघुशंकेसाठी मंडपामागील जागेचाच वापर केला जात होता. यानंतरही मंडळाला प्रतिवर्षी मिळत असलेली परवानगी व पोलिसांकडून कारवाईत होणारे दुर्लक्ष अर्थपूर्ण असल्याचा आरोप स्थानिकांकडून होत आहे.

शहरातील इतरही सार्वजनिक मंडळांच्या ठिकाणी अशा प्रकारे आडोशाच्या जागा तयार करण्यात आल्या आहेत. मात्र, या जागा गस्तीवरील पोलिसांसह परवानगी दिल्यानंतर पाहणी करणाºया पालिका अधिकाऱ्यांच्या निदर्शनास येत नाहीत हे संशयास्पद आहे. परिणामी, दोन्ही प्रशासनांच्या छुप्या पाठबळावर बहुतांश गणेशोत्सव मंडळांमध्ये जागरणाच्या नावाखाली जुगाराचे अड्डे चालत आहेत. त्याद्वारे प्रतिदिन लाखो रुपयांची उलाढाल होत असुन विजेत्यांकडून जिंकलेल्या रकमेचा ठरावीक हिस्सा मंडळाला जमा करून घेतला जात आहे. याच अटीवर इच्छुकांना त्या ठिकाणी जुगार खेळण्यात सहभागी करून घेतले जात आहे. मात्र, या प्रकारामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. शिवाय, गणेशभक्तांच्या भावनाही दुखावल्या जात आहेत. त्यामुळे उत्सवाच्या नावाखाली संस्कृतीला गालबोट लावण्याचा प्रयत्न करणाºया मंडळांवर ठोस कारवाईची मागणी होत आहे.

गणेशोत्सव मंडळांमध्ये जुगार खेळला जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत, त्यानुसार सर्व मंडळांची पाहणी करून जुगार चालत असलेल्या ठिकाणांवर कारवाया केल्या जात आहेत. त्यात मंडळांचाही हात आढळून आल्यास मंडळांवरही गुन्हे दाखल केले जाणार आहेत. - पंकज डहाणे, पोलीस उपआयुक्त

मंडळांवर कारवाईची मागणी
उत्सवाच्या नावाखाली जुगार खेळण्यासाठी गणेशोत्सव मंडळांकडूनच मंडपातच तशी आडोशाची जागा तयार करून दिली जात आहे. यामुळे अशा मंडळांवर ठोस कारवाई करून त्यांना पुन्हा परवानगी मिळणार नाही याची खबरदारी पोलीस व पालिका प्रशासनाकडून घेतली जाणे आवश्यक आहे. यानंतरही कोपरखैरणेतील प्रकरणात केवळ जुगार खेळणाºयांवर कारवाई करून तिथला जुगाराचा अड्डा चालवणाºया मंडळ व मंडळाच्या पदाधिकाºयांना कारवाईत ढिल देण्यात आली आहे.

Web Title: Gambling under the name of wakefulness; Types in Ganeshotsav Mandap

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.