माथेरानमधील अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये पूरस्थिती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2019 12:19 AM2019-09-15T00:19:29+5:302019-09-15T00:19:37+5:30

रायगड जिल्ह्यात सर्वांत जास्त अतिवृष्टी माथेरानमध्ये झाली आहे. ९ सप्टेंबरपर्यंत माथेरान तालुक्यात तब्बल ६४९७.४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे.

Flooding in Panvel due to heavy rainfall in Matheran | माथेरानमधील अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये पूरस्थिती

माथेरानमधील अतिवृष्टीमुळे पनवेलमध्ये पूरस्थिती

googlenewsNext

- वैभव गायकर

पनवेल : रायगड जिल्ह्यात सर्वांत जास्त अतिवृष्टी माथेरानमध्ये झाली आहे. ९ सप्टेंबरपर्यंत माथेरान तालुक्यात तब्बल ६४९७.४४ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. या पर्जन्यमानाची तुलनात्मक दैनंदिन टक्केवारी काढल्यास माथेरानमध्ये २१३.८६ टक्के पाऊस पडल्याचे स्पष्ट होते. माथेरानच्या पर्वतरांगांमध्ये उगम असलेल्या नद्या पनवेल तालुक्यातून वाहत असल्याने येथील पूरस्थितीस माथेरानची अतिवृष्टी कारणीभूत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पनवेलमधील कासाडी, गाढी, काळुंद्रे या नद्या माथेरानच्या पर्वतरांगांमधून उगम पावतात. माथेरानमध्ये यंदा अतिवृष्टी सुरू असून हे पाणी नद्यांमधून थेट पनवेलमध्ये दाखल होत आहे. विशेषत: गाढी नदीमधून मोठ्या प्रमाणात पाणी पनवेल तालुक्यात दाखल झाल्याने एकदा नव्हे तर तीन वेळा पनवेल गाढी नदीपात्राजवळील परिसर पाण्याखाली गेला होता. पनवेल तालुक्यातही गतवर्षाच्या तुलनेत तब्बल १४०० मिमीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाल्याने माथेरान व पनवेलमधील पावसाच्या पाण्यामुळे पनवेल शहरासह आजूबाजूची गावे पाण्याखाली गेली.
पनवेल शहरालगत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या भरावाचे काम मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. हजारो हेक्टर जागेवर भराव झाल्याने पाणी निचरा होण्यात अडथळा निर्माण झाला असून विमानतळ परिसरातील गावांना मोठा फटका बसला आहे. पनवेलमध्ये उद्भवलेल्या पूरस्थितीमुळे नदी किनाऱ्यालगतच्या घरांचे मोठे नुकसान झाले आहे. शेतीही पाण्याखाली गेल्याने नुकसानीत आणखीन भर पडली आहे. शासनामार्फत संबंधितांचे पंचनामे करून भरपाई देण्यात आली असली तरी अनेकांचे संसार अद्याप सावरलेले नाहीत. त्यामुळे माथेरानमध्ये असाच पाऊस सुरू राहिल्यास पनवेलमध्ये पुन्हा पूरसदृश स्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
>माथेरानच्या पर्वतरांगांमध्ये पडणारे जवळपास ७० टक्के पावसाचे पाणी गाढी नदीला मिळते. माथेरानच्या डोंगरातील वेताळाकडा धबधब्यावरून हे पाणी गाढी नदीला मिळते. त्यामुळे गाढी नदीला आलेल्या पुराला माथेरानमध्ये झालेली अतिवृष्टी कारणीभूत आहे. त्याचबरोबरच गाढी नदीकिनारी होंडिग्ल पाँडचा अभाव, संरक्षण भिंत नसल्यानेही पाणी किनारी भागांतील लोकवस्तील शिरते.
- सचिन शिंदे, अध्यक्ष, निसर्ग मित्र संस्था, पनवेल

Web Title: Flooding in Panvel due to heavy rainfall in Matheran

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.