पहिल्या टप्प्यात १० हजार ५०० सेवकांना मिळेल लस

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2021 12:37 AM2021-01-15T00:37:44+5:302021-01-15T00:38:03+5:30

उद्यापासून होणार सुरुवात ; नवी मुंबईत लसीकरणासाठी १९ हजार आरोग्यसेवकांची नोंदणी

In the first phase, 10,500 workers will get the vaccine | पहिल्या टप्प्यात १० हजार ५०० सेवकांना मिळेल लस

पहिल्या टप्प्यात १० हजार ५०० सेवकांना मिळेल लस

Next

योगेश पिंगळे

नवी मुंबई : कोरोनावरील  ‘कोविशिल्ड’ या लसीचा आरोग्यसेवकांना देण्यात येणाऱ्या पहिल्या टप्प्यातील साठा बुधवारी १३ जानेवारी रोजी नवी मुंबईमध्ये दाखल झाला आहे. शहरात सुमारे १९ हजार आरोग्य सेवकांची नोंदणी झाली असून, पहिल्या टप्प्यात १० हजार ५०० सेवकांनाच लस मिळणार आहे. शनिवार, दि. १६ जानेवारीपासून प्रत्यक्षात लसीकरणाला सुरुवात केली जाणार आहे.

लसीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून नवी मुंबई शहरातील महापालिका तसेच खासगी रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आदी सर्वच फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी करण्यात आली आहे. शहरात महापालिकेच्या माध्यमातून दररोज विविध पाच ठिकाणी लसीकरण बूथचे नियोजन करण्यात आले आहे. दरम्यान, महानगरपालिकेच्या नेरुळ येथील माँसाहेब मीनाताई ठाकरे रुग्णालयात लसीकरणाची रंगीत तालीम घेण्यात आली होती. लसीकरणाची माहिती ‘कोविन ॲप’च्या माध्यमातून देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. लसीकरणस्थळी प्रतीक्षा कक्ष, लसीकरण कक्ष व निरीक्षण कक्ष अशा स्वतंत्र कक्षांची रचना केली असून, केंद्रावर नियुक्त पथकामध्ये ४ व्हॅक्सिनेशन ऑफिसर व २ व्हॅक्सिनेटर ऑफिसर यांचा समावेश करण्यात आला आहे. नवी मुंबई शहरात खासगी आणि महापालिका रुग्णालयातील सुमारे १९ हजार फ्रंटलाईन वर्कर्सची नोंदणी झाली आहे.  लसीचा पहिला डेस घेतल्यावर काही दिवसांच्या अंतराने दुसरा डोस घ्यावा लागणार असल्याने पहिल्या टप्प्यात प्राप्त झालेल्या डोसमधून १० हजार ५०० आरोग्य सेवकांनाच लस देता येणार आहे.

नवी मुंबई महापालिकेसाठी २१ हजार लसीचे डोस प्राप्त झाले आहेत. त्यामुळे १० हजार ५०० सेवकांना लस देऊ शकणार आहोत. लसीकरणासाठी दररोज पाच ठिकाणी लसीकरण केंद्रांचे नियोजन करण्यात आले असून, प्रत्येक लसीकरण केंद्रावर दररोज १०० जणांचे लसीकरण केले जाणार आहे.
    - अभिजित बांगर (आयुक्त, न. मुं. म. पा)

 

Web Title: In the first phase, 10,500 workers will get the vaccine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.