मतदार याद्यांमधील चुकांमुळे सर्वपक्षीयांमध्ये असंतोष वाढला, प्रत्येक प्रभागामध्ये गोंधळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2020 02:01 AM2020-03-15T02:01:54+5:302020-03-15T02:02:17+5:30

निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या असून पुढील दोन दिवसांत सूचना व हरकतींची संख्या वाढणार आहे.

Errors in voter lists have led to dissatisfaction among all parties, confusion in each Ward | मतदार याद्यांमधील चुकांमुळे सर्वपक्षीयांमध्ये असंतोष वाढला, प्रत्येक प्रभागामध्ये गोंधळ

मतदार याद्यांमधील चुकांमुळे सर्वपक्षीयांमध्ये असंतोष वाढला, प्रत्येक प्रभागामध्ये गोंधळ

Next

नवी मुंबई : निवडणुकीसाठीच्या प्रारूप मतदार याद्यांमधील गोंधळ वाढत चालला आहे. प्रत्येक प्रभागामधील याद्यांमध्ये चुका असून सर्व राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे. याविषयी निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या असून पुढील दोन दिवसांत सूचना व हरकतींची संख्या वाढणार आहे.
नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी ९ मार्चला प्रारूप मतदार यादी जाहीर करण्यात आली आहे. सर्वच राजकीय पक्षांच्या इच्छुक उमेदवारांनी त्यांच्या प्रभागामधील मतदारांची यादी तपासण्यास सुरुवात केली असून यादीमधील नावे पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे. वाशी प्रभाग ५८ मधील यादीमध्ये प्रभाग ६२ मधील ६३७ मतदार घुसविण्यात आले आहेत. प्रभाग ५८ मधील मतदार इतर प्रभागांमध्ये दाखविण्यात आले आहेत. स्थानिक नगरसेवक प्रकाश मोरे यांनी यास तीव्र आक्षेप नोंदविला आहे. ही चूक सुधारण्यासाठी त्यांनी रीतसर हरकत नोंद केली आहे. याच पद्धतीच्या चुका इतर सर्वच मतदार याद्यांमध्ये झाल्या आहेत. प्रभाग ६० मध्ये राहणाऱ्या माजी उपमहापौर अविनाश लाड यांचे नाव प्रभाग ६३ मध्ये दाखविण्यात आले आहे. एखाद्या प्रभागामधील ५०० ते ६०० मतदार दुसरीकडे वळविण्यात आले आहेत. या सर्व चुका प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे झाल्या की जाणीवपूर्वक कोणी केल्या यावरूनही आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. भाजपच्या नेत्यांनी प्रशासनास हाताशी धरून याद्यांमध्ये फेरफार केला असल्याचा आरोप शिवसेनेने केला आहे. भाजपने शिवसेनेवर पलटवार केला आहे. याद्यांमधील चुका सुधारण्यासाठी निवडणूक आयोगाकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत.
मतदार याद्यांवरून सर्वच राजकीय पक्षांमध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर प्रशासनाने सुट्टीच्या दिवशीही हरकती नोंदविण्यासाठी कार्यालय सुरू ठेवले आहे. राजकीय पक्षांनी त्यांच्या पदाधिकाऱ्यांना याद्यांमधील त्रुटी शोधून जास्तीत जास्त हरकती नोंदविण्याचे आवाहन केले आहे. शिवसेनेने वाशीमधील मध्यवर्ती कार्यालयामध्ये कक्ष सुरू केला आहे. याशिवाय उपनेते विजय नाहटा यांच्या कार्यालयात खासदार व पालकमंत्र्यांनी स्वतंत्र यंत्रणा उभारली आहे.
याद्यांमधील चुका सुधारल्या नाहीत तर निवडणुकांचा निकाल वेगळा लागेल, अशी भीती प्रत्येक इच्छुक उमेदवाराला वाटू लागली आहे.

एकाच घरामध्ये ५० पेक्षा जास्त मतदार
नवी मुंबईमधील काही सदनिका व दुकानामधील पत्त्यावर ५० पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी केली आहे. काही चाळींमध्ये व गृहनिर्माण सोसायटींमध्ये १०० पेक्षा जास्त बोगस नावे नोंद केली आहेत. ही नावेही निदर्शनास आणून देण्यात येत असून बोगस मतदारांची नोंदणी रद्द करण्याची मागणी केली जात आहे.

प्रशासनाचा निष्काळजीपणा
महापालिकेने प्रारूप मतदार यादी जाहीर केली आहे. इच्छुक उमेदवार रीतसर पैसे भरून या याद्या घेत आहेत. परंतु नागरिकांनी त्यांचे यादीमध्ये नाव आहे की नाही हे कसे तपासायचे? त्यांना याद्या कोठे मिळणार याविषयी काहीही माहिती प्रसारित केलेली नाही. निवडणूक विभागातून प्रत्येक पानासाठी दोन रुपये भरून माहिती पेन ड्राइव्हमध्ये घ्यावी लागत आहे. झेरॉक्स सेंटरमधून दोन रुपये देऊन प्रिंट काढावी लागत आहे.

मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ आहे. एक प्रभागामधील मतदार दुसºया प्रभागामध्ये दाखविण्यात आले आहेत. जाणीवपूर्वक याद्यांमध्ये फेरफार केला असण्याची शक्यता असून याविषयी आम्ही निवडणूक विभागाकडे तक्रार केली आहे.
- विठ्ठल मोरे, जिल्हाप्रमुख शिवसेना
मतदार याद्यांमधील गोंधळ व बोगस मतदान हे दोन्ही प्रकार गंभीर आहेत. वाशी सेक्टर १७ मधील काही सदनिकांमध्ये ५० पेक्षा जास्त मतदारांची नोंदणी केली आहे. प्रभाग ६० व ६२ मधील मतदारांची प्रभाग ६३ मध्ये नोंदणी दिसू लागली आहे.
- अनिल कौशिक, जिल्हाध्यक्ष काँगे्रस
प्रभाग ५८ मधील यादीमध्ये प्रभाग ६२ मधील तब्बल ६३७ मतदार दाखविण्यात आले आहेत. प्रभाग ५८ मधील मतदार इतर प्रभागांमधील यादीमध्ये दाखविले आहेत. या गोंधळाविषयी रीतसर हरकत नोंदविली असून याद्यांमधील चूक दुरुस्त करावी, अशी मागणी केली आहे.
- प्रकाश मोरे, प्रभाग ५८
याद्यांमध्ये आक्षेप नोंदविण्याच्या सूचना कार्यकर्त्यांना केल्या आहेत. प्रशासनानेही पारदर्शीपणे याद्यांमधील गोंधळ दूर करावा, अशी मागणी आम्ही केली असून निवडणूक आयोगाकडेही तक्रार केली आहे.
- अशोक गावडे,
जिल्हा अध्यक्ष, राष्ट्रवादी काँगे्रस

Web Title: Errors in voter lists have led to dissatisfaction among all parties, confusion in each Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.