तळोजामधील उद्योजकांना हवे पनवेल विभागीय कार्यालय, महापेमधील कार्यालय गैरसोयीचे  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2021 10:06 AM2021-05-14T10:06:50+5:302021-05-14T10:07:39+5:30

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये १६२२ युनिट सुरू आहेत. येथील उद्योजकांना भूखंड खरेदी-विक्री, भाडेकरार, कर्जतारण व इतर कामे करण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागते.

Entrepreneurs in Taloja want Panvel divisional office, office in Mahape is inconvenient | तळोजामधील उद्योजकांना हवे पनवेल विभागीय कार्यालय, महापेमधील कार्यालय गैरसोयीचे  

तळोजामधील उद्योजकांना हवे पनवेल विभागीय कार्यालय, महापेमधील कार्यालय गैरसोयीचे  

googlenewsNext

नामदेव मोरे -

नवी मुंबई : एमआयडीसीचे पनवेलमध्ये विभागीय कार्यालय असताना तळोजा औद्योगिक वसाहतीचे कामकाज महापे विभागीय कार्यालयामधून सुरू आहे. यामुळे उद्योजकांचा प्रवासासाठी जास्त वेळ जात आहे. शिवाय महापे कार्यालयामध्ये नवी मुंबई एमआयडीसीचा ताण जास्त असल्यामुळे कामेही वेळेत होत नाहीत. यामुळे तळोजा पनवेल कार्यालयाशी जोडावे, अशी मागणी टीआयए संघटनेने केली आहे. 

तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये १६२२ युनिट सुरू आहेत. येथील उद्योजकांना भूखंड खरेदी-विक्री, भाडेकरार, कर्जतारण व इतर कामे करण्यासाठी विभागीय कार्यालयांमध्ये जावे लागते. एमआयडीसीचे खांदा कॉलनीमध्ये विभागीय कार्यालय आहे. तळोजापासून ९ किलोमीटर अंतरावरील कार्यालय उद्योजकांच्या सोयीचे आहे; परंतु शासनाने तळोजा महापे कार्यालयाशी जोडले आहे. यामुळे उद्योजकांना २५ किलोमीटरचा प्रवास करून महापेला जावे लागते. वास्तविक महापे कार्यालयात ठाणे, बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील ५५०४ युनिट, तळोजाचे १६२२, पातळगंगाचे १०६ व विस्तारित पातळगंगाचे ५२७ युनिट असे एकूण ७७५८ उद्योगांशी संबंधित काम चालत आहे. यामुळे कार्यालयीन कामे वेळेत होत नाहीत. उद्योजकांशी संवाद साधण्यासाठी अधिकारी, कर्मचारी यांना पुरेसा वेळ मिळत नाही. यामुळे कामे वेळेत होत नाहीत व उद्योजकांना वारंवार कार्यालयात यावे लागत आहे.

पनवेल विभागीय कार्यालयांमधून महाड, अतिरिक्त महाड, रोहा, बागड, औसार, नागोठणे एमआयडीसीमधील १८०७ उद्योगांचे काम चालत आहे. याठिकाणी कामाचा ताण कमी आहे. यामुळे तळोजाला पनवेल विभागाशी जोडल्यास महापे कार्यालयावरील ताण कमी होईल व कामे वेळेत होतील. उद्योजकांना महापेपर्यंत जाण्यासाठीचा वेळ वाचेल व महत्त्वाच्या कामांची रखडपट्टी थांबणार आहे. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने यासाठी पाठपुरावा केला आहे. एमआयडीसी प्रशासन व शासनाकडेही पाठपुरावा सुरू केला आहे. 

तळोजा औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांना ना हरकत प्रमाणपत्र, कर्ज तारण व भूखंडाशी सर्व व्यवहारांसाठी एमआयडीसीच्या महापे कार्यालयात जावे लागते. महापेऐवजी पनवेल कार्यालयाशी जाेडले जावे, अशी मागणी आम्ही केली आहे. यामुळे कामे अधिक वेगाने होतील.
- सतीश शेट्टी, 
अध्यक्ष, तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशन

महापे विभागीय कार्यालयअंतर्गत एमआयडीसीचा तपशील
एमआयडीसी     उद्योग
ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहत    ५५०३
तळोजा     १६२२
पातळगंगा     १०६
अतिरिक्त पातळगंगा     ५२६

पनवेल विभागीय अंतर्गत एमआयडी -
एमआयडीसी    उद्योग
महाड     ७७१
अतिरिक्त महाड     २०७
रोहा     १७२
विले भागड     ६४९
नागठाणे     ६
उसर     २
 

Web Title: Entrepreneurs in Taloja want Panvel divisional office, office in Mahape is inconvenient

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.