आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे

By ऑनलाइन लोकमत | Published: February 27, 2021 04:22 PM2021-02-27T16:22:08+5:302021-02-27T16:22:42+5:30

फ्लिपकार्टवर बनावट ऑर्डर देऊन आलेल्या पार्सल मधून वस्तू चोरून त्यात साबण भरून परत पाठवणाऱ्या तिघांना पोलीसांनी अटक केली

Employees of Flipkart loot expensive items through fake orders | आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे

आधी बनावट पत्त्यावर पार्सलची ऑर्डर, रिटर्नमध्ये कांदे, बटाट्यांची पॅकिंग; फ्लिपकार्टच्या टीम लीडरचे कारनामे

googlenewsNext

नवी मुंबई : फ्लिपकार्टवर बनावट ऑर्डर देऊन आलेल्या पार्सल मधून वस्तू चोरून त्यात साबण भरून परत पाठवणाऱ्या तिघांना पोलीसांनी अटक केली आहे. तिघेही फ्लिप कार्ट चे कर्मचारी असून एकाने वर्षभरापूर्वी नोकरी सोडली आहे. चुकीच्या पत्त्यावर बनावट ऑर्डर करून चोरलेल्या वस्तू ते स्वतःसाठी वापरत होते. 

ऑनलाईन वस्तू मागवून पत्ता चुकीचा असल्याच्या बहाण्याने पार्सल परत पाठवताना त्यामधील मूळ वस्तूंची चोरी करणारे रॅकेट उघडकीस आले आहे. यासंदर्भात कोपर खैरणे पोलिसांना माहिती मिळाली होती. त्यानुसार वरिष्ठ निरीक्षक प्रदीप तिदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक निलेश येवले, हवालदार गणपत पवार, गणेश चौधरी, किरण बुधवंत, गणेश गिते, निलेश निकम आदींचे पथक तयार करण्यात आले होते. अधिक चौकशीत हाती आलेल्या माहिती नुसार येवले यांच्या पथकाने घणसोली सेक्टर १ येथून वाजीद शकील मोमीन (२४) याला ताब्यात घेतले होते. चौकशी दरम्यान तो वापरत असलेल्या आयफोन बद्दल पोलिसांनी विचारणा केली असता संपूर्ण प्रकार उघडकीस आला. यानुसार मोमीन याच्यासह संघपाल मोरे (२९) व जयंत उगले (२७) यांनाही अटक करण्यात आली. तिघेही फ्लिप कार्ट चे कर्मचारी असून त्यापैकी उगले याने वर्षभरापूर्वी नोकरी सोडली आहे. मोमीन हा ऑफलोड टिम लीडर असल्याने चुकीच्या पत्त्यामुळे एखादे पार्सल परत आल्यास त्याची माहिती त्याला असायची. 

यामुळे त्यानेच पाहिजे असलेल्या वस्तूंची चुकीच्या पत्त्यांवर ऑर्डर करण्यास सुरवात केली. हे पार्सल परत आल्यानंतर ते घरी नेवून त्यातली मूळ वस्तू काढून घेऊन आतमध्ये साबण अथवा इतर वस्तू भरून पार्सल कंपनीला परत पाठवण्यास सुरवात केली होती. मात्र अद्याप पर्यंत हि बाब फ्लिप कार्ट कंपनीच्या निदर्शनास आली नव्हती. मात्र कोपर खैरणे पोलिसांनी या रॅकेटचा उलगडा केल्यानंतर फ्लिपकार्ट च्या अधिकाऱ्यांना त्याची माहिती देऊन त्यांच्या तक्रारीद्वारे तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या तिघांकडून सुमारे ८ लाख २४ हजाराच्या महागड्या वस्तू जप्त केल्याचे पोलीस उपायुक्त सुरेश मेंगडे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी सहायक आयुक्त विनायक वस्त व इतर अधिकारी उपस्थित होते. आरोपींकडून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये ४ आयफोन तसेच इतर महागडे फोन, आयपॅड, महागडी घड्याळे व कॅमेरे यांचा २५ हुन अधिक वस्तूंचा समावेश आहे. फ्लिपकार्ट वर बनावट ऑर्डर करून पार्सल मधून चोरलेल्या या सर्व वस्तूंचा ते स्वतःसाठी वापर करत होते. 

Web Title: Employees of Flipkart loot expensive items through fake orders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.