नवी मुंबई शहरातील सिग्नल यंत्रणेचा उडाला बोजवारा; टायमिंगच्या उपकरणात बिघाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:21 AM2020-12-04T01:21:29+5:302020-12-04T01:21:52+5:30

वाहनचालकांचा उडतोय गोंधळ , नवी मुंबईमधील प्रत्येक महत्त्वाच्या चौकामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे.

Disruption of signal system in Navi Mumbai city; Breakdown of timing equipment | नवी मुंबई शहरातील सिग्नल यंत्रणेचा उडाला बोजवारा; टायमिंगच्या उपकरणात बिघाड

नवी मुंबई शहरातील सिग्नल यंत्रणेचा उडाला बोजवारा; टायमिंगच्या उपकरणात बिघाड

Next

नवी मुंबई : स्मार्ट सिटीचा दावा करणाऱ्या नवी मुंबईमधील सिग्नल यंत्रणेचा बोजवारा उडाला आहे. सिग्नलमधील टायमिंगचे उपकरण बिघडले असून अनेक ठिकाणचे सिग्नल व्यवस्थित चालत नाहीत. यामुळे वाहनचालकांचा गोंधळ उडत असून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 

नवी मुंबईमधील प्रत्येक महत्त्वाच्या चौकामध्ये वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी सिग्नल यंत्रणा बसविण्यात आली आहे. पामबीच रोड, वाशीतील शिवाजी चौक, महामार्ग व इतर महत्त्वाच्या ठिकाणी सिग्नलमध्ये टायमिंग यंत्रणा बसविण्यात आली आहे. सिग्नल किती वेळ सुरू राहणार याची माहिती वाहनचालकांना मिळावी यासाठी टायमिंगची सुविधा उपलब्ध केली आहे. परंतु मागील काही दिवसांपासून पामबीच रोडवरील आगरी कोळी भवन, सारसोळे जंक्शन, मोराज सर्कल, वाशी सेक्टर १७ मधील दोन सिग्नल, महामार्गावरील वाशीमधील सिग्नल, शिवाजी चौक व इतर अनेक महत्त्वाच्या सिग्नलच्या टायमिंगचे उपकरण नादुरुस्त झाले आहे. यामुळे सिग्नल नक्की किती वेळ असणार हे लक्षात येत नाही. परिणामी, सिग्नलचे नियम तोडून वाहने चालविण्यात येत आहेत. अनेक सिग्नल वारंवार बंदही होत आहेत. यामुळेही वाहतुकीचा बोजवारा उडत आहे.

पामबीच रोड व इतर महत्त्वाच्या ठिकाणच्या सिग्नलमधील टायमिंगची यंत्रणा नादुरुस्त असूनही ठेकेदाराकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. वास्तविक, प्रतिदिन प्रत्येक सिग्नल व्यवस्थित सुरू आहे की नाही हे मनपाच्या विद्युत विभागाने पाहणे आवश्यक आहे. ठेकेदारानेही ते पाहून आवश्यक ती दुरुस्ती तत्काळ केली पाहिजे. परंतु नागरिकांनी तक्रारी करूनही दुरुस्ती वेळेत होत नसल्यामुळे वाहनधारकांनी नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे. सिग्नल व्यवस्थित नसेल तर वाहतूककोंडी वाढण्याची व अपघात होण्याची शक्यता आहे.

अपघात झाल्यास जबाबदार कोण?
सिग्नल व्यवस्थित चालत नसल्यामुळे वारंवार वाहतूककोंडी होत आहे. गंभीर अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. भविष्यात सिग्नल बंद असल्यामुळे एखादा गंभीर अपघात झाल्यास त्याला जबाबदार कोण? असा प्रश्न विचारला जात आहे. अपघातजन्य परिस्थिती निर्माण केल्याबद्दल ठेकेदारावर कारवाई करावी, अशी मागणीही केली जात आहे.

सिग्नल यंत्रणा व्यवस्थित चालत नसेल तर तत्काळ पाहणी करून ठेकेदारास दुरुस्तीच्या सूचना दिल्या जातील. याविषयी विनाविलंब कार्यवाही केली जाईल.    - सुनील लाड, कार्यकारी अभियंता, महानगरपालिका

Web Title: Disruption of signal system in Navi Mumbai city; Breakdown of timing equipment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.