बालगीतांच्या क्रिएटिव्ह उपक्रमाची देश-विदेशात भरारी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 06:49 AM2020-05-20T06:49:47+5:302020-05-20T06:50:12+5:30

लॉकडाउनमुळे अबालवृद्धांना घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बच्चेकंपनीचे मनोरंजन, विरंगुळा कसा करावा, असा प्रश्न घरातील सर्वांनाच पडला आहे.

Creative activities of nursery rhymes in the country and abroad | बालगीतांच्या क्रिएटिव्ह उपक्रमाची देश-विदेशात भरारी

बालगीतांच्या क्रिएटिव्ह उपक्रमाची देश-विदेशात भरारी

Next

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : लॉकडाउनच्या काळात बच्चेकंपनीचे मनोरंजन व्हावे तसेच मराठी भाषेविषयी त्यांच्यामध्ये आकर्षण वाढावे, यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे आणि सुलेखनकार अच्युत पालव यांनी ‘पंख शब्दांचे’ हा बालकवितांचा क्रिएटिव्ह उपक्रम सुरू केला आहे. आणि बघता बघता देश-विदेशात मराठी बालकवितांनी भरारी घेतली.
लॉकडाउनमुळे अबालवृद्धांना घरात राहण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे बच्चेकंपनीचे मनोरंजन, विरंगुळा कसा करावा, असा प्रश्न घरातील सर्वांनाच पडला आहे. टीव्ही, मोबाइलवरील त्याच त्या मालिका, गेम्सलाही मुले कंटाळली असून त्यांची एकप्रकारे घुसमट होत आहे. या मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलावे, आत्मविश्वास वाढावा, मनोरंजन व्हावे तसेच मराठी भाषेची, शब्दांची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रवीण दवणे यांच्या मनात विविध बालकविता प्रसिद्ध करण्याची कल्पना आली. कविता क्रिएटिव्ह असल्यास त्या आत्मसात करण्याचा दृष्टिकोनही सकारात्मक होईल, या उद्देशाने सुलेखनकार पालव यांच्याजवळ दवणे यांनी संकल्पना मांडली. पालव यांनाही सदर संकल्पना आवडल्याने त्यांनी तत्काळ होकार दिला. सोशल मीडियाच्या माध्यमातून मोठे लेखन करणे अवघड असून लहान मुलांसाठी कंटाळवाणे असल्याने चांगल्या बालकविता सुलेखनाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे ठरले आणि कामाला सुरुवात झाली.
कवितांना चांगल्या प्रकारे प्रतिसाद मिळाला असून लॉकडाउनच्या काळात २३ एप्रिल ते १७ मेपर्यंत विविध २५ विषयांवरील बालकविता प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. सुरुवातीपासून या कविता राज्यातील अनेक शिक्षकांच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठविण्यात आल्या होत्या आणि त्यांच्या माध्यमातून विविध शिक्षक आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचल्या. राज्यातील अनेक जिल्ह्यांत कविता पाठांतर आणि गायन स्पर्धादेखील घेतल्या जात असल्याचे अनेक शिक्षकांनी दवणे यांना कळविले आहे. राज्यातील अनेक अनाथाश्रमांतील मुलेही कवितांचा आनंद घेत असल्याचा अभिप्राय संचालकांकडून मिळत आहे. विदेशातील मराठी कुटुंबांतील लहान मुले, नागरिकांनीदेखील क्रिएटिव्ह पद्धतीने मांडलेल्या कवितांना दाद दिली असून या कवितांच्या माध्यमातून मराठीतील नवनवीन शब्दांची माहिती मिळाल्याचा अभिप्राय दिला आहे.

सोशल मीडियावर कवितांची धूम
बालकवितांच्या माध्यमातून बच्चेकंपनीचा विरंगुळा व्हावा, मराठी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार याबाबत माहिती व्हावी यासाठी सुलेखनच्या साहाय्याने प्रसिद्ध करण्यात आलेल्या ‘पंख शब्दांचे’ या कविता व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडियावर व्हायरल झाल्या असून अनेक नागरिक, लहान मुलांनी याचा आनंद घेतला आहे.

फिनलँडकडून बालकवितांची दखल
कोरोनामुळे संचारबंदीच्या काळात लहान मुलांमध्ये उत्साह वाढविण्यासाठी ज्येष्ठ साहित्यिक प्रवीण दवणे आणि सुलेखनकार अच्युत पालव यांच्या ‘पंख शब्दांचे’ या कवितांची दखल फिनलँड येथे शैक्षणिक प्रयोग करणाºया हेरंब कुलकर्णी यांनी घेतली. पुढील काही दिवसांत झूम अ‍ॅपच्या माध्यमातून होणाºया बाल साहित्य परिषदेचे निमंत्रणही दवणे यांना देण्यात आले आहे.

Web Title: Creative activities of nursery rhymes in the country and abroad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.