Corporator tanuja madhavi joined ncp in the presence of sharad pawar in Navi Mumbai | 'धक्के पे धक्का'!; भाजपला लागली 'मेगा गळती', आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेवर

'धक्के पे धक्का'!; भाजपला लागली 'मेगा गळती', आणखी एक नगरसेविका राष्ट्रवादीच्या वाटेवर

नवी मुंबई -नवी मुंबई महानगर पालिकेच्या निवडणुका तोंडावर येऊन ठेपल्या असतानाच भाजपला गळती लागल्याचे चित्र आहे. आता भाजपच्या आणखी एका नगरसेविकेने भाजपला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादी काँग्रेसचे घड्याळ हातात बांधले आहे. भाजप नगरसेविका तनुजा मढवी यांनी आज राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. 

तनुजा मढवी यांनी आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने आमदार गणेश नाईक यांच्या गडाला पुन्हा एकदा धक्का दिल्याचे बोलले जात आहे. आतापर्यंत येथे भाजपच्या तब्बल 14 नगरसेवकांनी भाजपला रामराम ठोकला आहे.

तत्पूर्वी, भाजपच्या नगरसेविका दिव्या गायकवाड आणि माजी नगरसेवक वैभव गायकवाड  यांनी 5 जानेवारीला राष्ट्रवादीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. शरद पवार यांच्या उपस्थितीत त्यांचा राष्ट्रवादी प्रवेश झाला होता. या नगरसेवकांचा राष्ट्रवादीतील प्रवेश म्हणजे भाजपला मोठा धक्का मानला जात आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपच्या तीन नगर सेवकांनी शिवसेनेचा भगवा हाती घेतला होता. शिवसेनेच्या धक्क्यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपला धक्के द्यायला सुरुवात केली की काय? असे चित्र नवी मुंबईत दिसत आहे.
 

Web Title: Corporator tanuja madhavi joined ncp in the presence of sharad pawar in Navi Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.