CoronaVirus News: कोरोनाचा धोका वाढतोय... पालकांनो, लहान मुलांना जपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 01:02 AM2021-04-04T01:02:03+5:302021-04-04T01:02:18+5:30

संपूर्ण कुटुंबालाच विळखा : निष्काळजीपणामुळे स्फोट

CoronaVirus News: The risk of corona is increasing ... Parents, take care of your children | CoronaVirus News: कोरोनाचा धोका वाढतोय... पालकांनो, लहान मुलांना जपा

CoronaVirus News: कोरोनाचा धोका वाढतोय... पालकांनो, लहान मुलांना जपा

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत अनेक धक्कादायक गोष्टी समोर येऊ लागल्या आहेत. संपूर्ण कुटुंबालाच विषाणूचा विळखा पडत आहे. लहान मुलांनाही प्रादुर्भाव होत असल्याचे निदर्शनास आले असून शहरवासियांनी स्वत:सह संपूर्ण कुटुंबीयांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. लहान मुलांना जपण्याचीही आवश्यकता निर्माण झाली आहे. 

नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. प्रतिदिन ७०० ते ९०० नवीन रुग्ण वाढत आहेत. शहरातील रुग्णसंख्या ६८ हजारपेक्षा जास्त झाली आहे. सात हजारपेक्षा जास्त रुग्णांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील खाटांची संख्या अपुरी पडू लागली आहे. मनुष्यबळ कमी पडत आहे. वाढणाऱ्या रुग्णांसाठी नवीन रुग्णालय सुरू करणे शक्य आहे. परंतु, वाढीच रुग्णालयांसाठी डाॅक्टर्स व इतर तज्ज्ञ मनुष्यबळ कसे उपलब्ध करायचे, असा प्रश्न आरोग्य विभागासमोर उभा राहिला आहे. दुसऱ्या लाटेत सर्वच वयोगटातील नागरिकांना कोरोनाचा धोका वाढत आहे.
 
पहिल्या लाटेत लहान मुलांची संख्या कमी होती. परंतु, आता लहान मुलांमध्येही झपाट्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. २५ मार्चला ० ते १० वर्षे वयोगटातील ९० सक्रिय रुग्ण शहरात होते. पुढील एका आठवड्यात यामध्ये ९८ ची भर पडून सक्रिय रुग्णांची संख्या तब्बल १८८ वर पोहोचली आहे. प्रतिदिन १५ ते २२ लहान मुलांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान मुलांना कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण जास्त असले तरी त्यांच्यामध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाणही जास्त आहे. आतापर्यंत १० वर्षे वयोगटातील फक्त एकाचाच मृत्यू झाला आहे. नवी मुंबईमध्ये एका घरातील व्यक्तीला कोरोना झाल्यानंतर त्यांच्या संपर्कात येणाऱ्या घरातील इतरांना कोरोनाची लागण होत असल्याचे निदर्शनास आले आहे. संपूर्ण कुटुंबालाच कोरोनाचा विळखा पडत असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे नागरिकांनी कोरोना होणार नाही, याची काळजी घ्यावी. नियमांचे पालन करावे. लक्षणे दिसल्यास तत्काळ तपासणी करावी, असे आवाहन महापालिकने केले आहे. 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत एका व्यक्तीस कोरोना झाल्यानंतर त्याच्या संपर्कामुळे संपूर्ण कुटुंबालाच कोरोना होत असल्याचे निदर्शनास आले आहे. लहान मुलांनाही लागण होत आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मुलांची विशेष काळजी घेण्याची आवश्यकता आहे. नागरिकांनी नियमांचे पालन करून स्वत:ला व कुटुंबीयांना कोरोनापासून वाचविले पाहिजे. 
- अभिजित बांगर, 
आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका 

लहान मुलांनाही कोरोनाची लागण होऊ लागली आहे. लहान मुलांमध्ये कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण चांगले आहे. परंतु, कोरोनाचे उपचार घेतल्यानंतर भविष्यात त्यांच्या आरोग्यावर काय परिणाम होणार, हे आताच सांगता येणार नाही. लहान मुले बरे होण्याचे प्रमाण चांगले असले तरी मुलांना कोरोना होणारच नाही, यासाठी पालकांनी योग्य काळजी घेतली पाहिले व नियमांचे पालन केले पाहिजे. 
    प्रवीण गायकवाड, बालरोगतज्ज्ञ 

Web Title: CoronaVirus News: The risk of corona is increasing ... Parents, take care of your children

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.