CoronaVirus News : शहरात तोतया संघटनांचा सुळसुळाट; कारवाईकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2020 11:38 PM2020-06-21T23:38:52+5:302020-06-21T23:39:09+5:30

मुळात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी अशा बोगस संघटनांवर कारवाईचे आदेश देऊनही त्यांना पाठीशी घातले जात आहे.

CoronaVirus News : The proliferation of totaya organizations in the city; Ignore the action | CoronaVirus News : शहरात तोतया संघटनांचा सुळसुळाट; कारवाईकडे दुर्लक्ष

CoronaVirus News : शहरात तोतया संघटनांचा सुळसुळाट; कारवाईकडे दुर्लक्ष

Next

सूर्यकांत वाघमारे
नवी मुंबई : कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा गैरफायदा घेत, शहरात पुन्हा एकदा तोतया संघटना सक्रिय झाल्या आहेत. त्यांच्याकडून पोलिसांसह राजकारण्यांना कोविड योद्ध्यांच्या प्रमाणपत्राची खैरात वाटली जात आहे. मुळात दोन वर्षांपूर्वी तत्कालीन गृहराज्यमंत्र्यांनी अशा बोगस संघटनांवर कारवाईचे आदेश देऊनही त्यांना पाठीशी घातले जात आहे.
नवी मुंबईसह देशभरात कोरोनाने थैमान घातले आहे. या दरम्यान अनेक जण अडचणीत अडकलेल्यांना मदतीचा हात देत आहेत. त्यांच्या कार्याची प्रशंसा करून काही तोतया संघटना आपला जम बसवू पाहत आहेत. त्याकरिता कोविड योद्धा प्रमाणपत्रांची खैरात वाटली जात आहे. पोलीस, माजी नगरसेवक, सक्रिय राजकारणी यांना या प्रमाणपत्रांच्या मोहात पाडले जात आहे. मुळात डॉक्टर, सफाई कामगार, अग्निशमन दल, तसेच इतर आपत्कालीन यंत्रणेच्या कामगारांना शासनाने ‘कोविड योद्धा’ असे संबोधले आहे. त्याचाच वापर सरसकट केला जात आहे. त्यात काही संघटनांची सूत्रे बिहारमधून हालत असल्याचेही समोर आले आहे. त्यात काही तोतया पत्रकार व त्यांच्या संघटनांचादेखील भर पडला आहे.
त्यांच्याकडून पोलीस व राजकीय व्यक्तींच्या सोशल मीडियावरील हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. ज्यांच्याकडून लॉकडाऊन दरम्यान कोणालाही मदत केल्याचे फोटो दिसल्यास त्यांना संपर्क साधून हितसंबंध जोपासत ‘कोविड योद्धा’ प्रमाणपत्राचे वाटप केले जात आहे. त्यामुळे प्रत्यक्षातले कोविड योद्धे समाजाच्या नजरेआड जात असून, भलत्याच व्यक्ती कोविड योद्धे म्हणून सन्मान मिळवत आहेत, परंतु पोलीस ठाण्यातही अशा बोगस संघटनांचे पदाधिकारी सर्रासपणे वावरत असतानाही कारवाई होत नसल्याने पोलीस त्यांच्या मोहात पडल्याचे दिसून येत आहे.
मानवाधिकार व भ्रष्टाचार निर्मूलन या शासनाच्या संस्था असल्याने त्याच नावाचा वापर करून भ्रष्टाचाराला खतपाणी घालणाऱ्या तोतया संघटना सक्रिय आहेत. त्यांच्याकडून गैरप्रकार होत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने २०१८ मध्ये प्रसिद्ध केले होते. त्याची दखल तत्कालीन गृहराज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी घेतली होती. राज्यभराची अशा तोतया संघटनांचा शोध घेऊन कारवाई करण्याच्या सूचना त्यांनी पोलीस महासंचालकांना दिल्या होत्या. या दरम्यान पनवेलमधून व्यावसायिकांकडून खंडणी उकळणाºया अशाच बोगस संघटनेच्या टोळीला अटक केली होती. त्यानंतर मात्र शहरातून काही प्रमाणात बोगस संघटनांच्या उघड हालचालींना आळा बसला होता, परंतु कोरोनामुळे अशा संघटना पुन्हा सक्रिय झाल्या आहेत.

Web Title: CoronaVirus News : The proliferation of totaya organizations in the city; Ignore the action

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.