CoronaVirus News in Navi Mumbai : झोपडपट्टीत कोरोनाचा हाहाकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2020 11:26 PM2020-05-20T23:26:08+5:302020-05-20T23:26:41+5:30

CoronaVirus News in Marathi and Live Updates : झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सर्वात गंभीर परिस्थिती तुर्भे स्टोअरमध्ये झाली असून ३५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत.

CoronaVirus News in Navi Mumbai: Corona's havoc in slums; An atmosphere of fear among the citizens | CoronaVirus News in Navi Mumbai : झोपडपट्टीत कोरोनाचा हाहाकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

CoronaVirus News in Navi Mumbai : झोपडपट्टीत कोरोनाचा हाहाकार; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : येथील झोपडपट्टी परिसरात कोरोनाचा हाहाकार सुरू झाला आहे. मोठ्या प्रमाणात रुग्ण सापडत असल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नेरूळ, तुर्भे ते दिघापर्यंत पसरलेला झोपडपट्टी परिसर कोरोनामुक्त करण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे.
झोपडपट्टी परिसरात कोरोना रुग्णांची संख्या काही दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. सर्वात गंभीर परिस्थिती तुर्भे स्टोअरमध्ये झाली असून ३५ पेक्षा जास्त रुग्ण आढळले आहेत. जवळपास तिघांचा मृत्यू झाला आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कामगार व इतरांना लागण झाली असून त्यांच्यामुळे सर्व वसाहतीमध्ये रुग्ण वाढत आहेत. इंदिरा नगर झोपडपट्टीमधील औषध कंपनीत काम करणारे मजूर व येथील औषध दुकानदारांनाही कोरोनाची लागण झाली. यानंतर झोपडपट्टीतील इतरांनाही लागण झाली आहे. याचप्रमाणे नेरुळ मधील शिवाजीनगर, तुर्भे परिसरातील हनुमान नगर, दिघा विभागातील बिंदू माधव नगर, कन्हैयानगर, गांधीनगर, ईश्वरनगर, साठेनगर येथेही रुग्ण सापडले आहेत. झोपडपट्टी परिसरात सोशल डिस्टन्सिंग नियमांचे काटेकोर पालन होत नाही व करताही येत नाही. तीव्र उकाड्यामुळे नागरिक घराबाहेर थांबत आहेत. छोट्या घरामध्ये पाच ते दहा नागरिक वास्तव्य करत आहेत. काही ठिकाणी स्वच्छतेचा अभाव असल्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे.
झोपडपट्टी परिसरात महानगरपालिकेने सर्वेक्षण सुरू केले आहे. जनजागृती नियमित सुरू आहे. औषध फवारणी ही केली जात आहे, अशी माहिती महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे; परंतु काही ठिकाणी औषध फवारणी योग्य प्रकारे होत नाही. रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाइन केले जात नाही, अशाप्रकारच्या तक्रारी वाढत आहेत. झोपडपट्टी परिसरात सार्वजनिक प्रसाधनगृहाचा वापर केला जातो. यामुळे प्रसाधनगृहांच्या स्वच्छतेवर विशेष लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे. सद्य:स्थितीमध्ये एलआयजी वसाहतीपेक्षा झोपडपट्टी परिसरात कमी रुग्ण आहेत; परंतु ठोस उपाययोजना केल्या नाहीत तर धारावी प्रमाणे नवी मुंबईमधील झोपडपट्टीतही कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढेल, अशी भीती व्यक्त केली जात आहे. महानगरपालिका प्रशासनाने झोपडपट्टी परिसरासाठी स्वतंत्र धोरण तयार करण्याची मागणी होत आहे.



एलआयजी वसाहतींची स्थिती बिकट
नवी मुंबईमधील झोपडपट्टीपेक्षा एलआयजी वसाहतीची स्थिती गंभीर झाली आहे. कोपरखैरणे, तुर्भे परिसरात माथाडी वसाहत व अल्पउत्पन्न गटातील वसाहत असलेल्या परिसरात कोरोनाचे रुग्ण प्रचंड वाढत आहेत. या वसाहती असलेल्या कोपरखैरणे व तुर्भे नोडमध्ये नवी मुंबईमधील सर्वाधिक रुग्ण सापडले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू
तुर्भे स्टोअर, तुर्भे नाका, हनुमान नगर, इंदिरा नगर, शिवाजी नगर, बिंदू माधव नगर, साठे नगर, ईश्वर नगर,
गांधी नगर, कन्हैया नगर.

तुर्भे स्टोअर परिसरात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाशी समन्वय साधून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. औषध फवारणी, जनजागृती व इतर अनेक उपाय केले जात आहेत.
सुरेश कुलकर्णी,
माजी स्थायी समिती सभापती

महानगरपालिकेने रुग्ण सापडलेल्या परिसरात तत्काळ औषध फवारणी केली पाहिजे. झोपडपट्टी परिसरातील नागरिकांची विशेष आरोग्य तपासणी करणे आवश्यक आहे.
अन्वर शेख,
माजी परिवहन सभापती

झोपडपट्टी परिसरासाठी महानगरपालिकेने विशेष धोरण राबविले पाहिजे. मैदान व मोकळ्या भूखंडावर स्वतंत्र क्वारंटाइन सेंटर सुरू केले पाहिजे. औषध फवारणी व इतर उपाययोजना ही प्रभावीपणे राबविणे आवश्यक आहे.
-अमित मेढकर
माजी नगरसेवक, हनुमान नगर

झोपडपट्टी परिसरात दाट लोकवस्ती आहे. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने होत आहे. महानगरपालिका प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना राबवाव्यात. सार्वजनिक प्रसाधनगृहाच्या स्वच्छतेसाठी व निर्जंतुकीकरण करण्यासाठीही उपाययोजना करणे आवश्यक आहे.
- महेश कोठीवाले, शिवसेना विभागप्रमुख

Web Title: CoronaVirus News in Navi Mumbai: Corona's havoc in slums; An atmosphere of fear among the citizens

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.