CoronaVirus News: शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 01:34 AM2021-04-09T01:34:16+5:302021-04-09T01:34:31+5:30

आयसीयूमध्ये जागा नाही : ४२४८ खाटांची सुविधा; आरोग्य विभागावरील ताण वाढला

CoronaVirus News: Lack of beds in Corona hospitals in the city | CoronaVirus News: शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता

CoronaVirus News: शहरातील कोरोना रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता

Next

- नामदेव मोरे

नवी मुंबई : शहरामध्ये कोरोनाची स्थिती हाताबाहेर जाऊ लागली आहे. मनपा व खासगी रुग्णालयांमध्ये ४२४८ रुग्णखाटा उपलब्ध असून सक्रिय रुग्णांची संख्या १०४४५ झाली आहे. आयसीयू युनिटमध्ये जागाच उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांची गैरसोय होऊ लागली आहे. आयसीयू युनिट वाढविण्यासाठी आरोग्य विभागाला कसरत करावी लागत आहे. हॉस्टेल, मनपा शाळांचेही कोरोना उपचार केंद्रांमध्ये रूपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नवी मुंबईमध्ये कोरोनाची दुसरी लाट घातक ठरली आहे. १ मार्चपासून ३८ दिवसांमध्ये तब्बल १८३६७ नवीन रुग्ण वाढले आहेत. प्रतिदिन एक हजारपेक्षा जास्त रुग्ण वाढत असून त्यांना उपचार मिळवून देताना प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागत आहे. शहरातील जवळपास सर्व रुग्णालयांमधील आयसीयू युनिट फुल्ल झाली आहेत. आयसीयूमध्ये जागा उपलब्ध होत नसल्यामुळे रुग्णांना उपचार कसे मिळवून द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. रुग्णालयांमध्ये जागा मिळत नसल्यामुळे रुग्णांचे नातेवाईक, राजकीय कार्यकर्ते व महापालिकेच्या आरोग्य विभागालाही तारेवरची कसरत करावी लागत आहे. एकूण रुग्णांपैकी जवळपास ७ हजार रुग्णांवर घरीच उपचार करण्यात येत आहेत. अशीच स्थिती राहिली तर मृत्यूचे प्रमाण वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

महानगरपालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी स्वत: सर्व खासगी रुग्णालयांशी संवाद साधून आयसीयू युनिट वाढविण्यास प्राधान्य दिले आहे. डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयात प्रतिदिन १० ते १५ आयसीयू युनिट वाढविले जात आहेत. तेरणामध्ये १०, रिलायन्समध्ये १०, अपोलोमध्ये १३, इंद्रावतीमध्ये १२ आयसीयू बेड वाढविण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे. याशिवाय जनरल बेड वाढविण्यासही प्राधान्य दिले जात आहे. अचानक रुग्णांची संख्या वाढल्यामुळे सर्वांना उपचार मिळवून देताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. महानगरपालिकेने नवीन केंद्र सुरू करण्यासाठीही हालचाली सुरू केल्या आहेत. वाशीतील प्रदर्शन केंद्र, खारघरमधील दोन हॉस्टेलमध्ये केंद्र सुरू केले जाणार असून इंडिया बूलमध्ये १ हजार बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे.

शाळांमध्ये नवीन कोरोना केंद्र
महानगरपालिकेने शहरात नवीन कोरोना उपचार केंद्र सुरू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. महानगरपालिकेच्या चार शाळांमध्ये कोरोना उपचार केंद्र सुरू केले जाणार आहे. दाेन हॉस्टेलमध्ये ४०० बेडची व्यवस्था केली जाणार 
आहे. 

नवी मुंबईमध्ये सर्व रुग्णांना उपचार मिळवून देण्यासाठी प्रशासन दक्ष आहे. आयसीयू युनिट वाढविण्यात येत आहेत. मनपा व खासगी रुग्णालयांमधील बेडची क्षमता वाढविली जात असून नवीन केंद्रही सुरू केली जात आहेत. मनपा शाळा, खारघरमधील हॉस्टेलमध्येही नवीन केंद्र सुरू केली जात आहेत.
- अभिजित बांगर,आयुक्त 


रुग्णालयनिहाय बेड
रुग्णालय    एकूण    शिल्लक 
एमजीएम सानपाडा     ७५    १
राधास्वामी सत्संग भवन     ३६३    ५२
ओजस                          १४      ०
क्रिटीकेअर                 २२      ०
ग्लोबल                         २१      ०
डिवाईन                         ३५    ६
श्री हॉस्पिटल                 २०    ०
साई सेवा हॉस्पिटल          २०    ०
क्रिडेन्स                         ११    ११
सिडको वाशी                 ४०७   १५३
रिलायन्स आयटी पार्क     १००     ६
ईटीसी वाशी                 २००    ३३
निर्यात भवन एपीएमसी     ३१२    ४
स्वामी विवेकानंद सेंटर     १०८    १५
ऐराली समाजमंदिर            ९०    ९०
आगरी कोळी भवन            ६०    ६०

रुग्णालयनिहाय बेड
रुग्णालय    एकूण    शिल्लक
तेरणा                 ९५    २            
फोर्टीज                 ८५    ०
रिलायन्स                 ११०    ०
एमजीएम सीबीडी     ६६     ०
एमपीसीटी                 ८३     ०
अपोलो                 १६०   १
पीकेसी                 ४४    ५
इंद्रावती                 ९०     ०
सनशाईन                 ३३     २
डी.वाय. पाटील     ४००   २०३
सिडको प्रदर्शन केंद्र     ७०२   १७४
हेरीटेज ऐरोली                 १०    १
न्यू मिलेनीयम                 २०    ०
न्यू मानक                 ४०     ४
लक्ष्मी घणसोली              १५     ०
फ्रीझन                          १९     ०
व्हीनस                          १२      ३
निर्मल कोपरखैरणे            १३        ०
राजपाल                 २१      ०
सिद्धीका कोपरखैरणे     ५        ०
एमजीएम वाशी                १०५    ०

Web Title: CoronaVirus News: Lack of beds in Corona hospitals in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.