सिडकोचा हजारो सदनिकाधारकांना दिलासा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 5, 2020 12:13 AM2020-06-05T00:13:50+5:302020-06-05T00:14:00+5:30

सिडकोचा निर्णय : लॉकडाउन काळातील घरांच्या हप्त्यावरील विलंब शुल्क माफ

CIDCO's relief to thousands of flat owners | सिडकोचा हजारो सदनिकाधारकांना दिलासा

सिडकोचा हजारो सदनिकाधारकांना दिलासा

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : लॉकडाउनमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. विशेषत: गृहखरेदी व इतर प्रयोजनांसाठी बँक किंवा इतर वित्तीय संस्थांकडून कर्ज घेतलेल्या चाकरमान्यांची हप्ते भरताना परवड होत आहे. ही बाब लक्षात घेऊन सिडकोने आपल्या गृहप्रकल्पातील घरांच्या हप्त्यावरील विलंब शुल्क माफ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सिडकोच्या हजारो ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.


कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे. त्यामुळे मागील दोन महिन्यांपासून सर्व व्यवहार बंद आहेत. उद्योगधंदे ठप्प पडले आहे. याचा परिणाम म्हणून सर्व स्तरावर आर्थिक कोंडी झाली आहे. टाळेबंदीच्या पार्श्वभूमीवर सिडकोने आपल्या गृहप्रकल्पातील यशस्वी अर्जदारांना घराचे हप्ते भरण्यासाठी ३0 जूनपर्यंतची वाढीव मुदत दिली होती. असे असले तरी उद्योगधंदे बंदच असल्याने सर्वसामान्यांच्या आर्थिक परिस्थितीत फारसी सुधारणा झालेली नाही. त्यामुळे लॉकडाउनच्या काळातील घरांच्या हप्त्यावरील विलंब शुल्क माफ करावे, अशी मागणी ग्राहकांकडून केली जात होती. त्यानुसार सिडकोने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून २४ एप्रिल ते ३१ मे २0२0 या कालावधीतील विलंब शुल्क पूर्णत: माफ करण्यात आले आहे.

३0 जूनपर्यंतच्या मुदतीत जे ग्राहक आपल्या कर्जाचे हप्ते नियमित भरतील त्यांनाच या योजनेचा लाभ होईल, असेही सिडकोकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या कालावधीत ज्या ग्राहकांनी आपल्या कर्जाच्या हप्त्यासह विलंब शुल्काचाही भरणा केलेला आहे, त्यांना सदरहू रक्कम सदनिकांच्या उर्वरित देयकातून वळती करून दिली जाईल, असेसुद्धा सिडकोने स्पष्ट केले आहे.

आधी दिली होती ३० जूनपर्यंतची मुदत
च्सिडकोने आॅक्टोबर २0१८ मध्ये आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील ग्राहकांसाठी गृहप्रकल्प योजना जाहीर केली होती. त्यात यशस्वी ठरलेल्या ग्राहकांना सप्टेबर २0१९ मध्ये इरादापत्रे व ताबापत्रे देण्यात आली. यात सहा समान हप्त्यांत घराचे पैसे भरण्याचे सूचित केले होते.
च्ग्राहकांनी जानेवारी २0२0 पर्यंतच्या तीन टप्प्यांत नियमित हप्ते भरले. मात्र कोरोनामुळे शेवटच्या तीन हप्त्यांचे आर्थिक गणित बिघडले. त्यामुळे हप्ते भरण्यास मुदत मिळावी, अशी मागणी ग्राहकांनी लावून धरली. विशेष म्हणजे या प्रकरणी मुख्यमंत्र्यांकडेसुद्धा दाद मागण्यात आली होती. त्यानुसार हप्ते भरण्यासाठी ३0 जून २0२0 पर्यंतची मुदत वाढवून देण्यात आली होती.

Web Title: CIDCO's relief to thousands of flat owners

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको