महागृहप्रकल्पासाठी सिडकोने कंबर कसली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 9, 2019 01:12 AM2019-08-09T01:12:29+5:302019-08-09T01:12:42+5:30

९० हजार घरे : विधानसभा निवडणुकीपूर्वी शुभारंभ

CIDCO tightens the waist for the Great Depression | महागृहप्रकल्पासाठी सिडकोने कंबर कसली

महागृहप्रकल्पासाठी सिडकोने कंबर कसली

Next

नवी मुंबई : सर्वांसाठी घरे या योजनेअंतर्गत सिडकोने ९० हजार घरांच्या निर्मितीचा संकल्प सोडला आहे. त्यानुसार लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या महागृहप्रकल्पाचे औपचारिक उद्घाटन करण्यात आले. आता विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी या गृहयोजनेचा प्रत्यक्ष शुभारंभ करण्याची राज्य शासनाची योजना आहे, त्यानुसार सिडकोने जय्यत तयारी केली असून पुढील काही दिवसांत ९० हजार घरांच्या या महागृहप्रकल्पातील पहिल्या टप्प्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत न भूतो असा महाकाय गृहनिर्माण योजनेचा संकल्प सिडकोने सोडला आहे. सिडकोच्याच नव्हे तर महाराष्ट्राच्या इतिहासात प्रथमच आर्थिकदृष्ट्या मागास आणि अल्प उत्पन्न गटातील घटकांसाठी एकाच वेळी इतक्या मोठ्या प्रमाणात घरांची निर्मिती केली जात आहे. विशेष म्हणजे, सदर सर्व घरे रेल्वेस्थानकाजवळ, पार्किंग जागा, ट्रक टर्मिनल अशा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी उभारली जाणार आहेत. त्यानुसार सिडकोने नवी मुंबईतील विविध रेल्वे स्थानक परिसरातील पार्किंग, फूडकोर्ट आणि मोकळ्या भूखंडांचा अभ्यास करून त्या ठिकाणी अडीच एफएसआयच्या माध्यमातून पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत जवळपास ९० हजार घरांच्या निर्मितीची योजना आखली आहे. यात ५३ हजार घरे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी असून, उर्वरित ३७ हजार घरे अल्प उत्पन्न गटासाठी असणार आहेत. सर्वांसाठी घरे (हाउसिंग फॉर आॅल) या शीर्षकांतर्गत सदर घरांची निर्मिती खारघर, कळंबोली, नवीन पनवेल येथील बस टर्मिनल तर वाशी आणि कळंबोली येथील ट्रक टर्मिनल तसेच सानपाडा, जुईनगर, खारघर, बामणडेंगरी, खारकोपर, मानसरोवर आणि खांदेश्वर या रेल्वेस्थानकातील फोअरकोर्ट एरिया अशा शहरातील मध्यवर्ती ठिकाणी या घरांची निर्मिती केली जाणार आहे. तीन टप्प्यात उभारण्यात येणाऱ्या या गृहप्रकल्पाचा आराखडा, इमारतींचे आर्किटेक्चरल डिझाइन, प्रकल्प खर्च, मॅकेनिकल, प्लंबिंग व फायर प्रोटेक्शन आदीचा मास्टर प्लान तयार करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती करण्यात आली आहे. सानपाडा रेल्वेस्थानकाच्या दोन्ही बाजूला, जुईनगर, मानसरोवर, खांदेश्वर रेल्वेस्थानक तसेच तळोजा या परिसरातील उपलब्ध जागेवर पहिल्या टप्प्यात २१ हजार ८२१ घरे बांधण्यात येणार आहेत. त्यासाठी अलीकडेच निविदा मागवण्यात आल्या आहेत.

तीन टप्प्यांत उभारणार गृहप्रकल्प
९० हजार घरांचा हा प्रकल्प तीन टप्प्यांत उभारला जाणार आहे. तळोजा (टप्पा १), खारघर, कळंबोली व पनवेल बस टर्मिनस (टप्पा २) आणि सानपाडा, जुईनगर, खारघर, मानसरोवर, खांदेश्वर, बामणडोंगरी व खारकोपर रेल्वेस्थानक फोअरकोर्ट एरिया (टप्पा-३) अशा तीन टप्प्यांत या संपूर्ण गृहप्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे. या तिन्ही टप्प्यांतील गृहप्रकल्पाचा आराखडा तयार करण्यासाठी सल्लागार संस्थेची नियुक्ती केली जाणार आहे.

Web Title: CIDCO tightens the waist for the Great Depression

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :cidcoसिडको