CIDCO to appoint agency for home marketing; Eight companies interested | घरांच्या मार्केटिंगसाठी सिडको करणार एजन्सीची नेमणूक; आठ कंपन्या इच्छुक

घरांच्या मार्केटिंगसाठी सिडको करणार एजन्सीची नेमणूक; आठ कंपन्या इच्छुक

कमलाकर कांबळे

नवी मुंबई : घरविक्रीत मागील व्यवस्थापनाने केलेल्या चुकांमुळे सिडकोची अनेक घरे विक्रीविना पडून आहेत. त्यामुळे सिडकोला मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर येत्या काळात घरांच्या मार्केटिंगसाठी स्वतंत्र एजन्सीची नेमणूक करण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. त्यासाठी मागविलेल्या एक्स्प्रेशन ऑफ इंटरेस्टला आठ कंपन्यांनी प्रतिसाद दिला असून, यापैकी एका कंपनीची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. नियुक्त होणाऱ्या कंपनीला घरांच्या मार्केटिंगसह विक्री आणि इतर संबंधित कामे करावी लागणार आहेत.

केंद्र सरकारच्या सर्वांसाठी घरे या योजनेंतर्गत आगामी काळात ९0 हजार घरे बांधण्याचा निर्णय सिडकोने घेतला आहे. विविध नोडमध्ये प्रस्तावित असलेल्या या घरांचा आराखडा तयार केला असून, बांधकामासाठी कंत्राटदारही नेमले आहेत. विशेष म्हणजे या घरांचे मार्केटिंग व विक्रीसाठी सिडकोने पहिल्यांदाच बाह्य संस्थेची मदत घेण्याचे ठरविले आहे. मागील दोन वर्षांत सिडकोने विविध घटकांसाठी २४ हजार घरांची योजना जाहीर केली. त्याची सोडतही काढली. असे असले तरी त्यातील सात हजार घरे विक्रीविना पडून आहेत. यातील ४,४६६ घरे एमएमआरडीए क्षेत्रात काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या माथी मारण्याचा प्रयत्न सिडकोने केला. त्यासाठी ऑनलाइन अर्ज मागवून सोडतही काढली, परंतु पोलिसांनीही ही घरे नाकारली आहेत, शिवाय संगणकीय सोडतीत यशस्वी ठरलेले अनेक पोलीस कर्मचारी ही घरे घेण्यास उत्सुक नसल्याचे दिसून आले आहे.

एकूणच घर विक्रीचे सध्याचे धोरण, त्यातील अटी व शर्ती जाचक ठरत असल्याने सर्वसामान्य ग्राहक सिडकोचे घर घेण्यास फारसे इच्छुक नाहीत. त्यामुळे दुरावत चाललेल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सिडकोच्या विद्यमान व्यवस्थापनाने कंबर कसली आहे. त्याचाच एक भाग म्हणून घर विक्रीच्या पारंपरिक धोरणाला बगल देत, नवीन हायटेक धोरण अमलात आणण्याचा सिडकोचा विचार आहे. त्यानुसार, घरांची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी आणि मार्केटिंग करण्याचे सिडकोचे आगामी धोरण असणार आहे. त्यासाठी खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या नामांकित कंपनीची नियुक्ती करण्याच्या हालचाली सिडकोने सुरू केल्या आहेत. या संदर्भात या क्षेत्रात काम करणाऱ्या इच्छुक कंपन्यांकडून सिडकोने प्रस्ताव मागविले होते. त्याला आठ बड्या कंपन्यांनी प्रतिसाद दिल्याचे समजते. प्राप्त झालेल्या प्रस्तावाची सध्या संबंधित विभागाकडून चाचपणी सुरू असून, यापैकी हायटेक मार्केटिंग सेवा देणाऱ्या कंपनीची नियुक्ती केली जाणार आहे.

गृहविक्रीसाठी सर्वसमावेशक धोरण
सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. संजय मुखर्जी यांनी सध्या गृहनिर्मितीवर अधिक भर दिला आहे. विविध घटकांसाठी येत्या काळात ९0 हजार घरे निर्माण केली जाणार आहेत. तळागाळातील सर्व घटकांना ही घरे घेता यावीत, असे सर्वसमावेशक धोरण तयार करण्यात येत आहे. त्यानुसार, सिडकोचे सहव्यवस्थाकीय संचालक अश्विन मुदगल यांनी त्या दृष्टीने कंबर कसली आहे. प्रस्तावित, ९0 हजार घरांच्या माध्यमातून ग्राहकांच्या पारंपरिक अडचणी व तक्रारींना कात्री लावण्याचे सकारात्मक प्रयत्न केले जात आहेत.

Web Title: CIDCO to appoint agency for home marketing; Eight companies interested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.