घणसोलीत दोन अनधिकृत इमारतींवर बुलडोझर; सिडको आणि महापालिकेची संयुक्त कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 15, 2020 01:08 AM2020-10-15T01:08:28+5:302020-10-15T01:08:37+5:30

जेसीबी बंद पडल्याने कारवाईला दीड तास विलंब

Bulldozers on two unauthorized buildings in Ghansoli; Joint action of CIDCO and Municipal Corporation | घणसोलीत दोन अनधिकृत इमारतींवर बुलडोझर; सिडको आणि महापालिकेची संयुक्त कारवाई

घणसोलीत दोन अनधिकृत इमारतींवर बुलडोझर; सिडको आणि महापालिकेची संयुक्त कारवाई

googlenewsNext

नवी मुंबई : अनधिकृत बांधकाम करणाऱ्यांविरोधात सिडको आणि नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने घणसोली गावठाणात धडक मोहीम सुरू केली आहे. घणसोली ‘एफ’ विभागात नव्याने आरसीसी अनधिकृत बांधकाम सुरू असलेल्या दोन इमारतींवर बुधवारी दुपारी सिडको आणि महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने कारवाई केली.

गेल्या आठ दिवसांपासून सिडकोच्या अतिक्रमण विभागाकडून घणसोली गावठाणात नवीन अनधिकृत बांधकामांचे पोलीस बंदोबस्तात सर्वेक्षण सुरू होते. या सर्वेक्षणात अनेक नवीन अनधिकृत बांधकामे सुरू असल्याच्या त्यांच्या निदर्शनास आले असल्यामुळे सर्वेक्षणानंतर घणसोलीत अर्जुन वाडी परिसरात सिडकोने बुलडोझर फिरवून कारवाईला सुरुवात केली आहे. चार मजल्यांची एक आणि दुसऱ्या इमारतीच्या तळमजल्याचे आरसीसी कॉलमचे नवीन बांधकाम सुरू असल्यामुळे या दोन्ही अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. त्यामुळे अनधिकृत बांधकाम करणाऱ्या भूमाफिया आणि विकासक दलालांचे धाबे दणाणले आहे. सिडकोच्या अतिक्रमण विभागाच्या वतीने नियंत्रक सुमन कोलगे, आरेखक शेखर तांबडे, दीपक हरवंदे तर महापालिकेच्या वतीने दोन अधिकारी उपस्थित होते. कारवाईसाठी सिडकोच्या वतीने रबाळे पोलीस ठाण्याचे ३९ कर्मचारी, ६ अधिकारी, १५ सुरक्षा रक्षक, सहा सुरक्षा अधिकारी, सीआरएफ चार जवान यांच्या उपस्थितीत पोलीस बंदोबस्तात ही कारवाई केली.

नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडे बिल्डर्सचे नाव नाही
घणसोली गावातील अर्जुनवाडी येथे जागा मालक शालन कळंत्रे यांचे अनधिकृत इमारतीचे १०० चौ. मीटर क्षेत्रफळाचे नव्याने काम सुरू होते. मात्र बिल्डर्सचे महापालिकडे नाव नसल्याची माहिती अतिक्रमण विभागाचे वरिष्ठ लिपिक विष्णू धनावडे यांनी दिली. तर तळमजल्याचे २०० ते २५० चौ. मीटरचे बांधकाम बिल्डर नीलेश शाहू आणि जागा मालक कुमार श्यामराव पाटील यांचे होते.

कारवाईला एक ते दीड तास विलंब
सिडकोने आणलेला जेसीबी बंद पडल्याने कारवाईला एक ते दीड तास विलंब झाला. अशा परिस्थितीत पालिकेच्या घणसोली अतिक्रमण विभागाची काहीच यंत्रणा सज्ज नसल्यामुळे सिडकोच्या अतिक्रमण विभागाने नाव न छापण्याच्या अटीवर तीव्र नाराजी व्यक्त केली.
 

Web Title: Bulldozers on two unauthorized buildings in Ghansoli; Joint action of CIDCO and Municipal Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.