गणेश नाईक परिवाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

By ऑनलाइन लोकमत | Published: May 29, 2019 11:21 PM2019-05-29T23:21:51+5:302019-05-29T23:22:30+5:30

लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली.

Arang to the citadel of Ganesh Naik family | गणेश नाईक परिवाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

गणेश नाईक परिवाराच्या बालेकिल्ल्याला सुरुंग

Next

- नामदेव मोरे
लोकसभा निवडणुकीमध्ये नवी मुंबईमधून शिवसेनेच्या राजन विचारे यांना तब्बल ८४ हजार ८७ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या ऐरोली मतदारसंघातूनही सेनेला ४४,३६३ मतांची आघाडी मिळाली. या निवडणुकीत नवी मुंबईमधील नाईकांचे बालेकिल्ले ढासळले. त्यांचा करिष्मा संपल्याचेच स्पष्ट झाले असून विधानसभा निवडणुकीमध्येही याचा फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
ठाणे लोकसभा मतदारसंघामधून राष्ट्रवादीचे माजी खासदार संजीव नाईक उमेदवारीच्या स्पर्धेमध्येही नव्हते. पक्षाने त्यांच्याऐवजी माजी पालकमंत्री गणेश नाईक यांनी निवडणूक लढवावी अशी अपेक्षा व्यक्त केली होती. पण नाईकांनीही निवडणुकीमधून माघार घेऊन आनंद परांजपे यांच्यावर उमेदवारी लादली. परांजपे यांना निवडून आणण्याची जबाबदारी नाईक परिवाराने घेतली होती. गणेश नाईक प्रत्येक सभेमध्ये राष्ट्रवादीचाच उमेदवार जिंकणार व नवी मुंबईमधून मोठे मताधिक्य देण्याच्या घोषणा करत होते. परंतु मागील पाच वर्षांमध्ये मतदारांशी संपर्क कमी झाल्यामुळे त्यांचा करिष्मा चाललाच नाही. त्यांच्या बेलापूर मतदार संघामधूनही शिवसेनेला तब्बल ३९,७२४ मतांची आघाडी मिळाली. राष्ट्रवादीला सर्वाधिक अपेक्षा ऐरोली मतदारसंघामधून होती. लोकसभा क्षेत्रामधील सहापैकी या एकाच मतदारसंघामध्ये राष्ट्रवादीचे आमदार आहेत. विद्यमान आमदार संदीप नाईक दोन वेळा येथून विजयी झाले आहेत. परंतु त्यांना लोकसभा निवडणुकीमध्ये फारसा प्रभाव पाडता आलेला नाही.
नवी मुंबई महापालिकेवर नाईक परिवाराची २५ वर्षे सत्ता आहे. यापूर्वी दोन आमदार व एक खासदार, महापौर, पालकमंत्री ही सर्व पदे त्यांच्याच घरामध्ये होती. परंतु सत्ता असताना शहरामधील एफएसआयसह प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न सुटले नसल्यामुळे त्यांना शहरवासीयांच्या नाराजीला सामोरे जावे लागले. ऐरोली मतदारसंघामध्ये दोन वेळा संधी मिळूनही आमदार संदीप नाईक यांनाही फारसा प्रभाव पाडता आलेला नाही. २०१४ मध्ये येथून राजन विचारेंना २०,४३५ मतांची आघाडी होती. २०१९ मध्ये यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. ही वाढ नाईकांची मतदारसंघावर पकड राहिली नसल्याचे स्पष्ट करणारी आहे. नाईक परिवाराचे वास्तव्य असलेल्या मतदारसंघातही त्यांना मताधिक्य मिळविता आले नाही. यापूर्वीच्या लोकसभा, विधानसभा व महापालिका निवडणुकीमधील निकालानंतर नाईक परिवाराने काहीच धडा घेतलेला नाही. शिवसेना व भाजपने मात्र मागील पाच वर्षांत ताकद वाढविण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळाचे अध्यक्षपद देण्यात आले. कोळी समाजाचे नेते रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सभापतीपद दिले. विजय चौगुले यांना वडार समाज समितीचे प्रमुख केल्याचा फायदा युतीला झाला.
>विधानसभेवर काय परिणाम?
लोकसभा निवडणुकीमध्ये शिवसेना उमेदवाराने ऐरोली विधानसभा क्षेत्रामधून तब्बल ४४,३६३ मतांची आघाडी घेतली आहे. या मतदारसंघामध्ये भाजपने रमेश पाटील यांना विधानपरिषदेचे सदस्य केले आहे. माथाडी नेते नरेंद्र पाटील यांना महामंडळ व विजय चौगुले यांना वडार समाजाच्या समितीचे अध्यक्ष केले आहे. युतीची ताकद वाढली असून विधानसभा निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीला फटका बसणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
>की फॅक्टर काय ठरला?
नाईक परिवाराचा जनसंपर्क कमी झाल्याचा फटका राष्ट्रवादीच्या उमेदवाराला बसला. संघटनात्मक बांधणी करण्यात व नवमतदारांशी योग्य संवाद ठेवण्यात माजी मंत्री गणेश नाईक व आमदार संदीप नाईकही अपयशी ठरल्याचा फायदा युतीच्या उमेदवाराला झाला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाच वर्षांमध्ये ऐरोली मतदारसंघामध्ये एक विधान परिषद सदस्य, महामंडळाचे अध्यक्ष व वडार समाज समितीचे अध्यक्षपद येथील नेत्यांकडे सोपविल्यामुळे युतीची ताकद वाढली. राज्य शासनाच्या माध्यमातून ठाणे- बेलापूर रोडवर दोन उड्डाणपूल, एक भुयारी मार्ग, शिळ - महापे रोडवर एक उड्डाणपूल व इतर विकासकामे मार्गी लावल्याचा फायदाही शिवसेना उमेदवाराला झाला.

Web Title: Arang to the citadel of Ganesh Naik family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.