ऐरोली रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार; आयसीयू, सर्जिकल वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2020 01:50 AM2020-12-04T01:50:47+5:302020-12-04T01:51:09+5:30

कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना

Airoli Hospital will start at full capacity; ICU, Surgical Ward | ऐरोली रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार; आयसीयू, सर्जिकल वॉर्ड

ऐरोली रुग्णालय पूर्ण क्षमतेने सुरू होणार; आयसीयू, सर्जिकल वॉर्ड

Next

नवी मुंबई : महानगरपालिकेचे ऐरोली रुग्णालय १ जानेवारीपासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यात येणार आहे. मेडिकल, सर्जिकल वॉर्डसह आयसीयूची व्यवस्था करण्यात येणार असून याविषयी कृती आराखडा तत्काळ तयार करण्याचे आदेश आयुक्तांनी प्रशासनास दिले आहेत.

महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी ऐरोली सेक्टर ३ येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयाला गुरुवारी अचानक भेट देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त संजय काकडे व उपआयुक्त अमरिश पटनिगिरे आणि रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. वर्षा राठोड उपस्थित होत्या. २०१५ मध्ये रुग्णालय सुरू झाले. तेव्हापासून केवळ विविध आरोग्य सेवांच्या बाह्यरुग्ण सेवा (ओपीडी) उपलब्ध आहेत. मात्र प्रसूती व बालरुग्ण सेवा वगळता इतर आंतररुग्ण सेवा (आयपीडी) उपलब्ध नाहीत. याबद्दल आयुक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. या रुग्णालयाचा पूर्ण क्षमतेने वापर करण्यासाठी येथे आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध असून काही प्रमाणात डॉक्टरही उपलब्ध आहेत. त्यामुळे सध्या पॅनलवर डॉक्टर घेऊन तसेच नर्सेस व इतर आवश्यक मनुष्यबळाचे सुयोग्य नियोजन करून सर्जिकल, मेडिसिन व आयसीयू वॉर्ड्स १ जानेवारीपर्यंत सुरू करण्याच्या दृष्टीने अंमलबजावणी करण्याचे आयुक्तांनी वैद्यकीय अधीक्षक यांना निर्देश दिले. त्याबाबतचा कृती आराखडा तत्परतेने तयार करून चर्चा करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
रुग्णांना कराव्या लागणाऱ्या विविध चाचण्या सध्या आउटसोर्सिंगद्वारे करण्यात येतात. त्यातील काही चाचण्यांसाठी रुग्णांना खर्च करावा लागतो. पालिका रुग्णालयात येणारा रुग्ण हा आर्थिकदृष्ट्या सर्वसामान्य गटातील असल्याने जास्तीतजास्त प्रमाणात कराव्या लागणाऱ्या चाचण्या रुग्णालयातील लॅबमध्येच करण्याबाबत नियोजनाचे निर्देश आयुक्तांनी दिले. रुग्णालयात नवजात अतिदक्षता कक्षाची क्षमता ५ वरून १२ बेड्सची करण्याची सूचनाही केली. ऐरोली रुग्णालयात नेत्र तज्ज्ञ असून ओपीडी प्रमाणेच आयपीडीदेखील सुरू करून लहान वयातच केली जाणारी स्क्वींट सर्जरी तसेच मोतीबिंदूसारख्या सर्जरी करण्याचे नियोजन करण्यात यावे, असे निर्देशही दिले.

सुविधांविषयी प्रसिद्धीच्या सूचना
रुग्णालयात १ नोव्हेंबरपासून बाह्ययंत्रणेद्वारे डायलेसीस सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र त्याची माहिती नागरिकांना नसल्याने त्या ठिकाणी लाभार्थ्यांची संख्या कमी असल्याची नोंद घेत त्याची माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश देण्यात आले. ऐरोली रुग्णालयाच्या तळमजल्यावर ‘पोस्ट कोविड क्लिनिक’ असून त्याचीही माहिती नागरिकांना होण्यासाठी दर्शनी भागात फलकाद्वारे त्याची माहिती प्रदर्शित करावी, असेही वैद्यकीय अधीक्षक यांना सूचित करण्यात आले.

Web Title: Airoli Hospital will start at full capacity; ICU, Surgical Ward

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.