पनवेल ग्रामपंचायतींत 78.52 टक्के मतदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 12:48 AM2021-01-16T00:48:02+5:302021-01-16T00:48:25+5:30

१८६ जागांसाठी ३९० उमेदवार रिंगणात : केंद्रावर आशासेविकांची नियुक्ती, ५५,२९७ मतदारांनी बजावला हक्क

78.52 percent polling in Panvel Gram Panchayat | पनवेल ग्रामपंचायतींत 78.52 टक्के मतदान

पनवेल ग्रामपंचायतींत 78.52 टक्के मतदान

Next

लोकमत न्यूज नेटवर्क 
पनवेल : पनवेल तालुक्यातील २२ ग्रामपंचायतींसाठीचे मतदान शुक्रवारी १५ जानेवारी रोजी पार पडले. २२ ग्रामपंचायतींच्या १८६ जागांसाठी ३९० उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले.. तालुक्यात शांततेत मतदानाची प्रक्रिया पार पडली. पनवेलमध्ये ७८.५२ टक्के मतदानाची नोंद झाली.            
पनवेलमधील २४ ग्रामपंचायतींपैकी आकुर्ली व खानावले या दोन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने २२ ग्रामपंचायतींसाठी या निवडणुका पार पडल्या. ५५,२९७ मतदारांचा समावेश होता. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून मतदान केंद्रावर आशा वर्करची नियुक्ती करण्यात आली होती. मतदानाचा हक्क बजावणाऱ्या मतदारांना यावेळी थर्मल स्कॅनिंग तसेच सॅनिटायझर वापरूनच केंद्रात प्रवेश देण्यात आला. 

२२ ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रावर पोलिसांचा बंदोबस्त ठेवण्यात आला. ९४ मतदान केंद्रांवर एकूण ५६४ कर्मचारी कार्यरत होते. प्रथमच पनवेल तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुका शांततेत पार पडल्या. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. परिमंडळ दोन कार्यक्षेत्रात एकूण ७५० पोलिसांचा फौजफाटा पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांनी ठेवला होता. मतदारांमध्ये यावेळी मोठा उत्साह पाहायला मिळाला. तरुणांसह जेष्ठ नागरिक देखील मतदानाला मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडले होते. १८६ जागांसाठी ३९० जणांचे भवितव्य मतदान पेटीत कैद झाले आहे. १८ जानेवारी रोजी मतमोजणी होणार आहे. तेव्हा २२ ग्रामपंचायतींमधील चित्र स्पष्ट होणार आहे.

या २२ ग्रामपंचायतींसाठी मतदान
केवाळे, वलप , कोळखे , वाकडी, वारदोली, उमरोली, हरिग्राम, उसर्ली खुर्द , वाजे, बारवई, सांगुर्ली, मोर्बे, देवळोली, आपटा, खैरवाडी, खाणाव, नानोशी, पालेबुद्रुक, सावळे, साई, पोसरी, पालीदेवद.

ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड
मतदानावेळी चार केंद्रांवर ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. पाली देवद, वाजे आणि वारदोली या मतदान केंद्रांसह सांगुर्ली मतदान केंद्रावर देखील अशीच समस्या उद्भवली होती. यावेळी तत्काळ ईव्हीएम तांत्रिक बिघाड दूर करण्यात आला.

संपूर्ण तालुक्यात शांततेत मतदान पार पडले. कोणत्याही ठिकाणी अनुचित प्रकार घडला नाही. चार ठिकाणी ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड झाला होता. तो त्वरित दुरुस्त करण्यात आला.
-विजय तळेकर, तहसीलदार /
निवडणूक निर्णय अधिकारी, पनवेल 

Web Title: 78.52 percent polling in Panvel Gram Panchayat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.